For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिग्गजांना सतावतेय पराभवाची भीती

05:33 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
दिग्गजांना सतावतेय पराभवाची भीती
Advertisement

जनता घेणार 2,290 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव दोन मतदारसंघांमधून लढवत आहेत निवडणूक

Advertisement

तेलंगणातील सर्व 119 विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी स्वत:चा विजय निश्चित करण्यासाठी जोरदार प्रचार केला आहे. राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहेत. निवडणुकीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन समवेत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सिद्दीपेट : बीआरएसचे हरीश लक्षवेधी उमेदवार

Advertisement

तेलंगणा निवडणुकीत सिद्दीपेट मतदारसंघावर सर्वांची नजर आहे. या मतदारसंघात 2009 पासून बीआरएसचा दबदबा आहे. बीआरएसचे दिग्गज नेते तनरु हरीश राव हे सिद्दीपेट मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आले आहेत. बीआरएसने पुन्हा हरीश राव यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विजयाचा चौकार लगावण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. तनरु हरीश राव हे केसीआर सरकारमध्ये अर्थ, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री देखील आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने डी. श्रीकांत रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.

सिर्सिल्ला : केटीआर विरुद्ध रेड्डी

तेलंगणा निवडणुकीत सिर्सिला मतदारसंघही लक्षवेधी ठरला आहे. या मतदारसंघातून बीआरएस उमेदवार आणि केसीआर यांचे पुत्र के.टी. रामा राव मैदानात आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या विरोधात भाजपने राणी रुद्रम्मा रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने कोडम करुणा महेंद्र रेड्डी यांना तिकीट दिले आहे. मागील निवडणुकीत केटीआर यांनी सुमारे 90 हजार मतांनी विजय मिळविला होता.

चंद्रायणगुट्टा : ओवैसी यांचा बालेकिल्ला

चंद्रायणगुट्टा हा मतदारसंघ एआयएमआयएमचा बालेकिल्ला मानला जातो. राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यत या मतदारसंघात ओवैसी यांचाच पक्ष विजयी होत राहिला आहे. 2018 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून अकबरुद्दीन ओवैसी यांनी भाजपच्या शहजादी सैयद यांचा 80 हजार मतांनी पराभव केला होता. एआयएमआयएमने यावेळी अकबरुद्दीन यांचे पुत्र नूरुद्दीन ओवैसी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने या मतदारसंघात मुप्पी सीताराम रेड्डी तर बीआरएसने सीताराम रेड्डी यांना तिकीट दिले आहे. तर काँग्रेसने बोया नागेश नरेश यांना मैदानात उतरविले आहे.

ज्युबली हिल्स : कॅप्टन विरुद्ध ओवैसी

ज्युबली हिल्स मतदारसंघ यावेळी अत्यंत चर्चेत आहे. या मतदारसंघात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन हे काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर बीआरएसचे वर्तमान आमदार मगंती गोपीनाथ आणि एआयएमआयएमचे मोहम्मद राशेद फराजुद्दीन यांचे आव्हान आहे. तर भाजपने लंकाला दीपक रे•ाr यांना मैदानात उतरविले आहे. मागील निवडणुकीत एआयएमआयएमने येथे उमेदवार उभा केला नव्हता.

गजवेल : केसीआर विरुद्ध इटाला राजेंद्र

तेलंगणा निवडणुकीत गजवेल हा मतदारसंघ विशेष चर्चेत आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे निवडणूक लढवत आहेत. तेलंगणाच्या स्थापनेपासून दोन्ही विधानसभा निवडणुकीत गजवेल मतदारसंघात केसीआरच विजयी झाले आहेत. यावेळी भाजपने त्यांच्या विरोधात इटाला राजेंद्र यांना मैदानात उतरविले आहे. तर काँग्रेसने थुमकुंटा नरसा रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.

कामारेड्डी : केसीआर विरुद्ध रेड्डी

कामारेड्डी मतदारसंघात मुख्यमंत्री केसीआर निवडणूक लढवत आहेत. केसीआर यांच्या विरोधात भाजपने व्यंकट रमण रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने रेवंत रेड्डी यांना मैदानात उतरविले आहे. केसीआर यावेळी दोन मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत आहेत. गजवेल येथे एकूण 40 तर कामारेड्डीमध्ये 39 उमेदवार उभे आहेत.

Advertisement
Tags :

.