संचिताचे भांडे
पूर्वी स्वयंपाकघराला चूलघर असे म्हणत. घरामधले संरक्षक दैवत म्हणजे चूल. घरादाराची ही प्राणशक्ती. पण सद्यकाळात स्वयंपाकघराशिवाय घरे निर्माण होत आहेत. काळाला अनुरूप कमी प्रमाणात असलेली भांडीकुंडी आणि कमीत कमी जागा व्यापणारे टिचभर स्वयंपाकघरही आता माघार घेते आहे. काळाची हाक ऐकून मनाचे बोट धरून पुढे पुढे जायचे म्हटले तरी एका पिढीचे संस्कारी स्त्राrमन स्वयंपाकघरामधल्या भांड्याकुंड्यांना अजूनही चिकटून बसले नाही तरच नवल! कारण ती ओढ नैसर्गिक आहे.
पूर्वी स्वयंपाकघराला चूलघर असे म्हणत. घरामधले संरक्षक दैवत म्हणजे चूल. घरादाराची ही प्राणशक्ती. चैतन्य आणि आनंद पसरवत जिभेला तृप्त करणारी चूलमाय स्त्रियांना एकेकाळी प्रिय होती. कुणा एखाद्याचे घर पहायला प्रथम जायचे म्हणजे मांडून ठेवलेले चूलघरच बघायचे. कारण तिथे घरामधल्या संपन्नतेची ओळख होत असे. डाळ, तांदूळ, ज्वारी, गहू, डाळी भरून ठेवलेले धान्याचे वेगवेगळ्या आकाराचे डबे. दुधाचा तो टोप. दही विरजवण्यासाठी शकुंतला भांडे. दह्याची लोटी. दहीभात कालवायला वाटके. चिवडा करण्यासाठी घमेले. डाळ, तांदूळ भिजवण्यासाठी दगडी भाताची तपेली, तिखटमीठ मसाल्यासाठी पाळे. पोळ्या, भाकरी ठेवण्यासाठी दुरडी. खाऊ ठेवायला पेढेघाटी डबा. शिवाय कडीकोंड्याचे डबे शिदोरीसाठी ते वेगळेच. पाणी साठवण्याची भांडी म्हणजे गुंड, घागर, चरवी, बंब असे. छोटी पातेली म्हणजे गंजोली. ताटे, वाट्या, पेले, फुलपात्र, गडवे, लोट्या, तांबे अशा विविध प्रकारच्या भांड्यांनी सजलेले चूलघर आणि ते सांभाळणारी प्रसन्न अन्नपूर्णा. हे घराचे वैभव होते. काळ नावाच्या जादूगाराची पावले वेगवान असतात याचे वास्तव आज अनुभवायला येते आहे. सद्यकाळात स्वयंपाकघराशिवाय घरे निर्माण होत आहेत. काळाला अनुरूप कमी प्रमाणात असलेली भांडीकुंडी आणि कमीत कमी जागा व्यापणारे टिचभर स्वयंपाकघरही आता माघार घेते आहे. काळाची हाक ऐकून मनाचे बोट धरून पुढे पुढे जायचे म्हटले तरी एका पिढीचे संस्कारी स्त्राrमन स्वयंपाकघरामधल्या भांड्याकुंड्यांना अजूनही चिकटून बसले नाही तरच नवल! कारण ती ओढ नैसर्गिक आहे. भांडीगल्लीत असणारी भांड्यांची दुकाने आजही स्त्रियांना तेवढीच भुरळ घालतात. श्रम, कष्ट हलकी करणारी सहज, सोपी भांडी लोकप्रिय आहेत.
मौखिक परंपरेने चालत आलेली एक कथा आहे. एकदा एक जावईबापू पहिल्यांदा सासुरवाडीला आले. सासूबाईंना जावईबापूंचे अगत्य करताना त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असे झाले. त्यांना आठवले की लेकीने बोलता बोलता सांगितले होते की पतीराजांना धिरडी फार आवडतात. झाले. सासुबाईंनी हौसेने धिरड्याचे पीठ भिजवले आणि तवा चुलीवर ठेवला. पहिले धिरडे बिघडले. नंतरही तोच प्रकार. धिरडी नीट जमेना. बैठकीमध्ये बसलेल्या जावईबापूंना भूक धरवत नव्हती. त्यांनी हळूच स्वयंपाकघरात डोकावून बघितले तर काय? सासुबाई घामाघुम झालेल्या होत्या आणि गोळा झालेल्या धिरड्यांचा परातीत ढीग पडला होता. जावईबापू काय झाले असेल ते समजून गेले. ते सासूबाईंना म्हणाले, ‘मामी, माझी आई धिरडी करताना तवा चुलीवर ठेवून मागच्या अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनाला एक प्रदक्षिणा घालून मग धिरडं तव्यावर घालते. तेव्हा ते छान अलगद निघतं’. सासूबाई म्हणाल्या, ‘असं होय? तुळसाबाईंचा आशीर्वाद घेतला की धिरड्यासारखा पदार्थ छान जमतो का?’ जावईबापूंनी मान डोलावली. सासूबाईंनी जावईबापूंच्या सांगण्याप्रमाणे केले आणि काय आश्चर्य? धिरडी छान जमू लागली. जावईबापू मनातल्या मनात हसले. जावईबापू घरी आल्याच्या आनंदात, त्यांना लवकर खाऊ घालण्याच्या नादात, सासूबाई तवा गरम होण्यापूर्वीच धिरडे घालत होत्या. ते त्या विसरूनच गेल्या होत्या. लोखंडी तवा लुप्त झाला आणि कुठलाही पदार्थ तव्याला चिकटून बिघडणार नाही अशी खात्री देणारी निर्लेप भांडी बाजारात आली. नातीसुद्धा निर्लेप झाली. न चिकटणारी, एकमेकांना स्वत:चा पुरेसा अवकाश देणारी, कुठेही न गुंतणारी, स्वत:मध्ये रमणारी, अळवावरच्या पाण्यासारखीअलगद निसटून जाणारी.
स्वयंपाकघरातील भांडी आणि आहार यांचा जवळचा सुमधुर संबंध आहे. त्याचे काही नियम आहेत. दुधाचे भांडे इतर कशासाठीही वापरायचे नाही. मातीच्या भांड्यात जर गाईचे दूध तापवले तरच त्याचे अंतर्मूल्य टिकते. कांदा चिरलेली विळी वेगळी ठेवावी. कारण कांदा देवाच्या नैवेद्यात निषिद्ध आहे. स्टेनलेस स्टीलची भांडी वापरायला सुरुवातीला समाजात विरोध झाला कारण धातूचा अंश भांड्यामध्ये उतरतो. म्हणून तांबे, पितळ, चांदी यांना आजही मान आहे. त्याप्रमाणेच भांड्यात शिजवलेल्या पदार्थांचे अंश देखील भांड्यांना चिटकून असतात. म्हणून अध्यात्मात भांड्यांच्या शुद्धतेवर भर दिलेला आहे. आहार आणि उपासना यांचा जवळचा संबंध लक्षात घेऊन नव्या कोऱ्या भांड्यांमध्येच अधिकारी व्यक्तींसाठी अन्न शिजवण्याचा प्रघात आजही प्रचलित आहे. भांड्यांवर संस्कार होतात. भांड्यांवर संस्कार असतात. पिढ्यानपिढ्या नैवेद्यासाठी अन्न शिजवणारी भांडी आजही काही घरांमध्ये आहेत आणि ती पवित्र आहेत. भांड्यांमध्ये अन्नाचे सत्व उतरते म्हणून मांसाहार शिजवलेल्या भांड्यांमध्ये शाकाहारी लोकांनी अन्न शिजवू नये असे म्हणतात. साधन काळामध्ये साधकांची अन्न शिजवण्यासाठी असणारी भांडी, जेवणाचे पात्र, पाणी पिण्याचे फुलपात्र वेगळे, स्वतंत्र असावे असे संकेत आहेत. देवाच्या नैवेद्यासाठी ताट स्वतंत्र निराळे असावे. त्यात कोणी जेवू नये व इतर कारणासाठी ते वापरू नये असे शास्त्र सांगते. जात्यावरती धान्याचे पीठ दळताना जुन्या बायकांनी ओव्या गाऊन आपले मन व्यक्त केले. त्यांचा भक्तीभाव एवढ्या उच्च स्तराचा होता की त्यांना पुढचा जन्म चक्क भांड्यांचा घ्यावासा वाटला आहे. परंतु ते भांडे कुठे असावे? तर विठुरायाच्या राउळात. त्याच्या सदैव सानिध्यात. ओवी गाणारी मालन म्हणते, ‘पंढरपुरीची मी ग व्हयीन परात ।विठूच्या पंगतीला वाढीन साखरभात ।’ विठुराया तर भावभक्तीचा भुकेला आहे. तो काय करतो? तर ‘रुक्मिणीच्या मंदिरी हायेती चांदीचे गडवे पेले’ ।रुक्मिणी राजकन्या आहे. तिचा थाट श्रीमंती आहे. परंतु विठू जेव्हा जनाबाईंच्या घरी जातो. तेव्हा काय करतो? तर, ‘जनाबाईंच्या घरी देव मोग्याने पाणी प्याले’। तो साध्या भांड्याने पाणी पितो.
घरात भांडणे झाली की भांड्यांची आदळआपट ही ठरलेली असे. कुटुंबात आपसात पटले नाही की भांड्याला भांडं लागणारच. निभावून न्या असा सल्ला आजही दिला जातो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, खरकटी, चिकट भांडी ही पाण्यात भिजत घालावी लागतात तेव्हा कुठे ती स्वच्छ निघतात. त्याचप्रमाणे शरीरस्थित असलेले मनाचे भांडे हे भगवंताच्या नामात भिजत घातले की प्रारब्धाचे चिकटलेले खरकटे लवकर निघून जाते आणि मन स्वच्छ होते. दत्तावतारी संत प.पू. नाना महाराज तराणेकर म्हणतात, ‘सद्गुरूंच्या जवळ अमृत असते. आपल्या संचिताप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे भक्त भांडे घेऊन सद्गुरूजवळ जातात. कुणाजवळ बुडकुले तर कुणाजवळ तांब्या, पातेली असते. एक गोष्ट मात्र नक्की की भांडे छोटे असो वा मोठे, त्यात सद्गुरूंकडून अमृत नक्की मिळते. संचिताचे भांडे मोठे असावे म्हणून नामस्मरण करावे. समस्त स्त्राr वर्गाला भांड्यांबद्दल विशेष ममत्व असणाऱ्या काळात त्या छोट्या उदबत्तीच्या घरावरही स्वत:चे नाव टाकून घेत. कारण कुटुंबात पुढे वाटणी झाली तर भांड्यांवर हक्क राहिला पाहिजे. आता नव्या पिढीचा नवा धडा आहे, ‘युज अँड थ्रो.’ वापरा आणि फेका. भांडी त्याला अपवाद नाहीत. घरातही भांडी हवीतच असा आग्रह नाही. ती भाड्याने उसनी आणता येतात. ‘युज अँड थ्रो’ संस्कारा-व्यवहारात मिसळून रक्तात उतरला आहे. माणसेसुद्धा गरज असेल तेव्हा हवी तशी वापरा आणि नंतर खुशाल नाती तोडून टाका. छोटेसे भांडे ते काय! परंतु ते माया, ममता, जिव्हाळा, प्रेम, ओलावा हे शिकवते. म्हणून त्याला आजच्या काळातही मोल आहे.
-स्नेहा शिनखेडे