For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कोल्हापूरच्या मानसिकतेचा कौल!

06:19 AM Oct 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोल्हापूरच्या मानसिकतेचा कौल
Advertisement

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल हा केवळ एका सहकारी संस्थेवरील सत्तासंघर्षाचा निकाल नाही, तर तो कोल्हापूरच्या राजकीय मानसिकतेचा, स्वाभिमानाचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरील विश्वासाचा कौल आहे. एका बाजूला राज्यातील सत्तेची सर्व ताकद, मंत्री, खासदार, आमदार आणि राजकीय प्रभावाची मोठी फळी; तर दुसऱ्या बाजूला आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडी. कागदावर सत्ताधारी महायुतीचे पारडे जड दिसत असतानाही या लढतीत समविचारी आघाडीने मिळवलेले यश अनेक राजकीय समीकरणांचा नव्याने विचार करायला लावणारे आहे.

Advertisement

राजकारणात सत्ता महत्त्वाची असतेच; मात्र सत्तेपेक्षाही लोकांचा विश्वास मोठा असतो, हे या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि तोच आपली खरी शक्ती आहे, ही भावना संघटनेत रुजवणे, हे राजकीय यशाचे महत्त्वाचे सूत्र आहे. सतेज पाटील यांनी गोकुळच्या लढाईत याच सूत्राचा प्रभाव दाखवून दिला. निवडणुकीत केवळ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लावून विजय मिळत नसतो, तर गावोगावच्या कार्यकर्त्यांना आपलेपणाची जाणीव करून द्यावी लागते. त्यांना निर्णयप्रक्रियेत स्थान द्यावे लागते आणि संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागते. सतेज पाटील यांच्या राजकारणाचे वेगळेपण याच कार्यकर्ता-केंद्रित दृष्टिकोनात शोधता येते. कागदावर कमकुवत वाटणाऱ्या समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी एकत्र ठेवले, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आणि बलाढ्या सत्तेला आव्हान देण्याची उमेद दिली. गोकुळचे महत्त्व लक्षात घेतले, तर या विजयाचे राजकीय वजन अधिक स्पष्ट होते. गोकुळ म्हणजे केवळ दूध संकलन आणि विक्री करणारी संस्था नव्हे; ती कोल्हापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी आहे. हजारो दूध उत्पादक शेतकरी, गावोगावच्या दूध संस्था, वाहतूकदार, वितरक आणि कर्मचारी यांच्या आर्थिक हितसंबंधांची साखळी या संस्थेशी जोडलेली आहे. प्रतिदिन लाखो लिटर दूध संकलित करणाऱ्या आणि मोठी वार्षिक उलाढाल असलेल्या गोकुळचे नियंत्रण म्हणजे सहकार क्षेत्रातील आर्थिक आणि राजकीय प्रभावाचे केंद्र. गुजरातच्या अमूलसारख्या देशव्यापी ब्रँडशी स्पर्धा करताना गोकुळला आपली बाजारपेठ, विश्वासार्हता आणि स्थानिक दूध उत्पादकांशी असलेले नाते जपावे लागते. त्यामुळे या संस्थेची सत्ता कोणाकडे असावी, हा प्रश्न केवळ संचालक मंडळाच्या निवडीपुरता मर्यादित राहत नाही. दूध उत्पादकांचे हित, संस्थेची स्वायत्तता, त्या संस्थेचे स्वतंत्र अस्तित्व टिकून राहणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेची दिशा यांचाही तो प्रश्न बनतो. इथेच सुप्त संघर्ष होता जो महायुतीचे नेते जाणू शकले नाहीत. या निवडणुकीचा संघर्ष न्यायालयापर्यंत पोहोचला. दूध संस्थांची पात्रता, मतदार यादी आणि मतदानाच्या अधिकारावरून निर्माण झालेल्या वादांमुळे निवडणूक प्रक्रिया कायदेशीर कसोटीवर तपासली गेली. उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत झालेल्या लढाईने या निवडणुकीचे गांभीर्य वाढवले. न्यायालयीन प्रक्रियेतून मार्ग काढत निवडणुकीपर्यंत पोहोचणे, कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे आणि प्रतिकूल परिस्थितीत संघटन टिकवणे, ही समविचारी आघाडीसाठी मोठी परीक्षा होती. अशा वेळी केवळ राजकीय घोषणा पुरेशा नसतात; कार्यकर्त्यांच्या मनात नेतृत्वाविषयी विश्वास असावा लागतो. निवडणूक जिंकण्यापूर्वी कार्यकर्त्यांचे मन जिंकणे आवश्यक असते, याची प्रचिती या संघर्षातून आली. कोल्हापूरच्या राजकीय मानसिकतेचा विचार करताना येथील स्वाभिमानी परंपरेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सहकार चळवळ, शेतकरी संघटना, स्थानिक नेतृत्व आणि जनतेशी थेट नाळ जोडणारे राजकारण ही कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनाची वैशिष्ट्यो आहेत. येथे सत्तेचा प्रभाव असला, तरी तोच अंतिम निर्णय ठरवतो असे नाही. स्थानिक प्रश्नांची जाण, कार्यकर्त्यांशी असलेले नाते आणि नेतृत्वाची विश्वासार्हता यांनाही मतदार महत्त्व देतात. म्हणूनच राज्यातील सत्ताधारी पक्षांनी एकत्रित ताकद लावली, तरी त्याचे रूपांतर विजयात होईलच, असे नाही. गोकुळच्या निकालातून हाच राजकीय धडा पुढे आला आहे. स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील, खासदार उदयसिंहराव गायकवाड आणि लोकनेते खासदार बाळासाहेब माने यांनी कोल्हापूर जिह्यात उभे केलेल्या राजकारणाचा पाया तळागाळातील कार्यकर्त्यांवरील विश्वासात होता. सामान्याला सोबत घेऊन त्याला नेतृत्वाची संधी देणे, त्याच्या अडचणींशी जोडलेले राहणे आणि त्याला राजकीय प्रक्रियेचा भाग बनवणे, ही त्या परंपरेची ताकद होती. काँग्रेसनेही दीर्घकाळ याच तत्त्वाच्या आधारावर व्यापक जनाधार निर्माण केला. मात्र, पक्ष जेव्हा आपल्या मूळ प्रवाहापासून दूर गेला, तेव्हा त्याची राजकीय किंमत वेळोवेळी काँग्रेसलादेखील मोजावी लागली. हा इतिहास आहे आणि तो इथल्या सर्वसामान्य माणसांनी घडवून दाखवला आहे. जेव्हा काँग्रेस संपूर्ण देशावर राज्य करत होती तेव्हा कोल्हापूर वेगळे अस्तित्व राखून होते आणि वेळोवेळी त्या अस्तित्वाची ते जाणीव करून देत होते. त्यामुळे महायुतीच्या सत्ता काळात आलेला हा निकाल त्या परंपरेतला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.