For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उदंड झाली वाहनं !

06:26 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
उदंड झाली वाहनं
Advertisement

सध्या भारतात वाहन क्षेत्राला विलक्षण तेजी आलीय अन् भारतीयांच्या खिशात खुळखुळणारा पैसा, बदलत्या परिस्थितीनुसार पदरी दुचाकी वा कार असण्याची वाढती गरज, युवावर्गाची नि धनिकांची महागड्या वाहनांची ‘क्रेझ’ यामुळं दिमाखात वाहन झळकणाऱ्या घरांची संख्या वधारत चाललीय...त्याभरात रस्त्यांवर माणसं कमी नि वाहनं जास्त असं चित्र उभं राहू लागलेलं असून त्यातून वाट काढत जायचं कसं हा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय...यातून जन्म मिळू लागलाय तो अनेक समस्यांना. त्यात वाढतं प्रदूषण, वाहतूक कोंडी या बाबी अग्रक्रमांकावर. ही समस्या महानगरांत आणि अन्य शहरांत फारच तीव्रतेनं भेडसावत असली, तरी आता शहरीकरणाच्या दिशेनं झपाटल्याप्रमाणं झेपावणारी गावंही त्यापासून काही फारशी दूर नाहीत. असं असलं, तरी नवीन वाहनं घेण्याकडे असलेला कल काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. प्रवासी कार्सना विक्रीच्या बाबतीत गेल्या वर्षी नवीन उच्चांक नोंदविता आलाय तो उगाच नव्हे...

Advertisement

कोलकात्यात ‘फ्री फॉर ऑल’...

? भारतातील महानगरांचा विचार करता कार्सचं सर्वाधिक प्रमाण (किलोमीटरमागं घनता) दिसून येतं ते पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरात. हा आकडा प्रति किलोमीटर 2 हजार 448 इतका मोठा...या पार्श्वभूमीवर रहदारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं या शहरातील प्रवास आता नेहमीपेक्षा जास्त वेळ खाऊ लागलाय. गेल्या पाच वर्षांत एका फेरीसाठी लागणाऱ्या वेळेत दुप्पट वाढ झालीय...वैयक्तिक वाहनांच्या संख्येत झपाट्यानं झालेली वाढ आणि सार्वजनिक वाहतुकीतील घट यास प्रामुख्यानं कारणीभूत. हा परिणाम ‘कोव्हिड’ महामारीचा. मार्च, 2020 ते मे, 2022 दरम्यान शहरातील ताफा तब्बल 78 हजार 102 कार्सनी फुगला...

Advertisement

? कोलकात्यात आता जवळपास 45.3 लाख वाहनं रस्त्यांच्या 1 हजार 850 किलोमीटर क्षेत्रातून धावताना दिसतात...दिल्लीत जरी त्याहून जास्त वाहनं (1 कोटी 32 लाख) असली, तरी तेथील रस्त्यांचं क्षेत्र हे कोलकाताहून तिप्पट म्हणजे 33 हजार 198 किलोमीटर इतकं. यामुळं देशाच्या राजधानीतील घनता प्रति किलोमीटर 400 पेक्षा कमी...सध्या कोलकात्यात आहेत 6.5 लाख दुचाक्या...

मुंबईत उदंड झाल्या दुचाक्या...

? मुंबईतील दुचाक्यांची संख्या मागील वर्षातील आकडेवारीनुसार 27 लाखांवर पोहोचलीय. ही घनता प्रति किलोमीटर 1 हजार 350 इतकी असून देशाचा विचार करता हे प्रमाण सर्वाधिक...शहरांतील घनतेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर विसावलंय ते 24.5 लाख दुचाकी वाहनांसह पुणे शहर. सदर प्रमाण प्रति किलोमीटर 1 हजार 112 दुचाक्या इतकं...त्यातुलनेत, चेन्नई, बेंगळूर, दिल्ली आणि कोलकाता येथील घनता प्रति किलोमीटर 1 हजारापेक्षा कमी.

? 2017 मधील 19 लाखांवरून गेल्या सहा वर्षांत मुंबईत दुचाकींची संख्या 8 लाखांनी वाढलीय. 2018 मध्ये 2017 च्या तुलनेत किलोमीटरमागे 100 वाहनांची, तर 2019 साली 75 आणि 2020 मध्ये 50 दुचाकींची भर पडली. 2021 नि 2022 साली वृद्धीचा हा आकडा 75 असा राहिला...सणासुदीच्या काळात येथे ‘बाइक्स’च्या खरेदीला ऊत येत राहिलेला असून मुंबापुरीत दुचाकी नोंदणी वाढल्यानं भर पडलीय ती गर्दी अन् प्रदूषणात. शिवाय पार्किंगच्या समस्या निर्माण होण्याबरोबर बेफिकीरपणे दुचाकी चालविण्याचा प्रकारही वाढीस लागलाय...

बेंगळूरमध्येही तुफानी वाढ...

? गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात समोर आलेल्या आकडेवारीनुसार, बेंगळूर शहरात होती ती वाहतूक खात्यात ‘नॉन-ट्रान्सपोर्ट व्हेइकल्स’ म्हणून नोंदणीकृत झालेली 99.8 लाख वाहनं. त्यापैकी 75.6 लाख दुचाक्या आणि 23.1 लाख कार्स. वैयक्तिक वाहन म्हणून त्यांची नोंदणी करण्यात आली होती...गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दररोज सरासरी 1 हजार 300 नवीन मोटरसायकल्स व स्कूटर्स, तर 409 कार्स रस्त्यावर आल्या. हे प्रमाण पाहता अन् दसरा-दिवाळीत झालेली तुफानी खरेदी पाहता एकूण आकडा आता 1 कोटीच्या पार गेलेला असेल हे सांगण्यास कुणा तज्ञाची गरज नाही...

? गेल्या वर्षी 30 सप्टेंबरपर्यंत बेंगळूरमध्ये होती एकूण 1.1 कोटी वाहनं. शहरातील वाहनांच्या संख्येनं 2012-13 मधील 55.2 लाखांवरून ही झेप घेतली...याच कालावधीत संपूर्ण कर्नाटकातील नोंदणीकृत वाहनांची संख्या जवळपास 1.5 कोटींवरून उ•ाण करून 3 कोटींहून अधिक झाली. राज्यात नोंदणी झालीय ती 2.2 कोटी दुचाक्या आणि 45 लाख चारचाकी वाहनांची...

दुचाक्यांमध्ये भारत जगात अव्वल...

? भारत आता जगाचा विचार करता दुचाक्यांच्या बाबतीत अग्रक्रमांकावर जाऊन बसलाय. त्यानंतर क्रमांक लागतो तो इंडोनेशियाचा...प्रवासी कार्सच्या विभागात आपण आठव्या क्रमांकावर असून चीन, अमेरिका नि जपान हे पहिल्या तीन क्रमांकांचे मानकरी...

? सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांत मिळून 2020 मध्ये भारतात होती 32.63 कोटी वाहनं अन् त्यापैकी जवळपास 75 टक्के दुचाक्या. गेल्या तीन वर्षांत दोन कोटींहून अधिक वाहनांची नोंदणी झाली असून 2023 च्या जुलैपर्यंत एकूण संख्या पोहोचली होती 34.8 कोटीच्या घरात...

? सरकारी आकडेवारीनुसार, जुलै, 2023 पर्यंत सर्वाधिक नोंदणीकृत वाहनं होती ती महाराष्ट्रात (3.78 कोटी). त्यानंतर उत्तर प्रदेश (3.49 कोटी) आणि तामिळनाडूचा (3.21 कोटी) क्रमांक. 10 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये दिल्ली जवळपास 1.32 कोटी नोंदणीकृत वाहनांसह पहिल्या, तर बेंगळूर दुसऱ्या स्थानावर....

कुटुंबांच्या वाहनांच्या मालकीत गोवा आघाडीवर...

? गोवा हा छोटासा असला, तरी अनेक बाबतींत आघाडीवर असून त्यापैकी एक म्हणजे प्रत्येक घरामागं दुचाक्या नि कार्सच्या मालकीचं प्रमाण...‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणा’नुसार, सर्व भारतीय कुटुंबांपैकी 7.5 टक्के कुटुंबांकडे चारचाकी वाहनं, तर 49.7 टक्के कुटुंबांकडे दुचाकी आहे. मात्र गोव्यातील 45.2 टक्के कुटुंबांच्या दारात कार, तर 86.7 टक्के कुटुंबांच्या घरासमोर दुचाकी दिसते...चारचाकी वाहनांच्या बाबतीत 24.2 टक्क्यांसह केरळ, तर दुचाक्यांचा विचार करता 75.6 टक्क्यांसह पंजाब दुसऱ्या क्रमांकावर...

प्रवासी कार्स प्रथमच 40 लाखांच्या पार...

? विश्लेषण केल्यास या परिस्थितीमागची कारणं सहज लक्षात येतील...2023 मध्ये ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स’च्या जोरावर प्रवासी कार्स उद्योगानं प्रथमच ओलांडला तो तब्बल 40 लाख विक्रीचा टप्पा. ही वृद्धी 2022 शी तुलना केल्यास आठ टक्के. तथापि कंपन्यांना 2024 मध्ये वाढलेले व्याजदर आणि पूर्ण करायची मागणी राहिलेली नसल्यामुळं हे क्षेत्र फार मोठ्या वाढीची नोंद करणं अशक्य असं वाटायला लागलंय...

? 2023 मध्ये प्रवासी कार्सच्या विक्रीनं नोंद केली ती तब्बल 41.1 लाख युनिट्सची, तर 2022 साली हा आकडा होता 37.9 लाख. कोव्हिड महामारीनं देशात प्रवेश केल्यानंतर आस्थापनांनी टाळेबंदी देखील जाहीर केली होती. परंतु त्यानंतर अपेक्षेहून किती तरी जास्त, अक्षरश: 360 अंशांत हे क्षेत्र फिरलं. ‘कोव्हिड’च्या वेळी सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्रीला ‘ब्रेक’ लागला होता अन् त्यामुळं अनेक मॉडेल्सची प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत गेली. त्यात समावेश होता ‘महिंद्रा’, ‘मारुती’, ‘ह्युंदाई’, ‘किया’, ‘टाटा मोटर्स’सारख्या नामवंत आस्थापनांचा. परंतु हा ‘बॅकलॉग’ जवळपास संपलाय...

? ‘मारुती सुझुकी’चे सिनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (सेल्स अँड मार्केटिंग) शशांक श्रीवास्तव यांच्या मते, 2024 मध्ये दर्शन घडेल ते एकेरी आकड्यातील वृद्धीचं...वाहन क्षेत्राचा उत्साह वाढविणारी बाब म्हणजे 2023 वर्षात खपलेल्या कार्सची सरासरी किंमत 11.5 लाख रुपये राहिली. 2022 मध्ये ती 10.6 लाख रुपये, तर आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 8.2 लाख रुपये इतकी होती. विश्लेषकांच्या मतानुसार, त्यामागचं कारण म्हणजे ग्राहकांना वाहनात जास्तीत जास्त सोयी हव्या असून वाढलेल्या किमती नि ‘एसयूव्हीं’चा खप यामुळं आस्थापनांना ‘बल्ले बल्ले’ म्हणण्याची संधी लाभलीय...

? संपलेल्या वर्षात ‘मारुती’नं नोंद केली ती विक्रमी 20 लाख युनिट्सच्या खपाची व त्यात समावेश होता 2.7 लाख निर्यात केलेल्या युनिट्सचा...दक्षिण कोरियाच्या ‘ह्यंgदाई’नं सुद्धा 9 टक्क्यांच्या वृद्धीसह भारतात प्रवेश केल्यानंतर प्रथमच 6 लाखांचा टप्पा ओलांडलाय...

वर्ष          प्रवासी कार्सचा खप            बदललेली टक्केवारी

2020       24.3 लाख             उणे 18 टक्के

(2019 शी तुलना केल्यास)

2021       30.8 लाख             27 टक्के वृद्धी

2022       37.9 लाख             23 टक्के वाढ

2023       41.1 लाख             8.4 टक्के वृद्धी

संकलन : राजू प्रभू

Advertisement
Tags :

.