For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्मरणाचे मोल

06:16 AM Apr 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्मरणाचे मोल
Advertisement

नवविधा भक्तीमध्ये ‘स्मरण’ ही सर्वश्रेष्ठ भक्ती मानली आहे. त्यालाच ‘अनुसंधान’ हे दुसरे नाव आहे. मनात वसलेल्या परमेश्वराशी सतत चाललेला संवाद म्हणजे अनुसंधान. त्यामुळे मी, माझे या कोशातून माणूस बाहेर पडतो. त्यातून कर्ममुक्ती सहज साधते.

Advertisement

सावता माळी, सेना न्हावी, गोरा कुंभार, नरहरी सोनार ही मंडळी विठ्ठलाशी एवढे अनुसंधान राखून होती की त्यामुळे त्यांच्या कर्माचा दर्जा बदलून गेला. त्यांचे प्रत्येक कर्म ही विठ्ठलपूजा ठरली. संत जनाबाईंचा एक सुरेख अभंग आहे- ‘देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते, देव देते, देव घेते, देवासवे व्यवहारीते, देव येथे, देव तेथे, देवाविण नाही रिते, जनी म्हणे विठाबाई, भरून उरली आंतरबाही’. प्रत्येक क्षणी देवाचे अस्तित्व अनुभवणे, जाणवणे ही ब्रह्मस्वरूप अवस्था म्हणजे उच्च कोटीतील अनुभूती.

संत जनाबाईंचे मन म्हणजे पांडुरंग. त्यामुळे त्या सुखदु:खापासून वेगळ्या झाल्या. अनुकूलता, प्रतिकूलता याची जाणीव त्यांना उरली नाही. म्हणून त्यांची विठुरायाबद्दल काहीही तक्रार नाही. दिवस-रात्र लाभलेल्या नित्य सहवासामुळे त्या भांडणाचा सूर कधीकधी लावतात खरा; पण तेव्हाही त्याला सोडून देण्याची भाषा न करता त्या म्हणतात, ‘हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीयेला.’ जनाबाई त्याला हृदयात कोंडून इशारा देतात, ‘जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला.’ ही अवस्था निर्माण होणे अशक्य नसले तरी सुघडही नाही. संत जनाबाई या संत नामदेवांच्या दासी. नामदेवांचे कुटुंब चौदा जणांचे होते. त्यात पंधरावी दासी जनी. या संयुक्त कुटुंबात संत नामदेवांचे आई-वडील, चार मुले, चार सुना, लेकी दोघीजणी. सर्वजण विठ्ठलभक्त. या सर्वांची अभंगरचना उपलब्ध आहे. या सर्वांचेच विठ्ठलाशी अनुसंधान होते. नामदेवांची आई गोणाई. तिच्या हातचा पाहुणचार घेण्यासाठी दिवाळीला प्रत्यक्ष पांडुरंग तिच्या घरी आले होते. साक्षात विठ्ठलाला तिने अभ्यंगस्नान घातले. तिची वृत्ती विठ्ठलपायी स्थिर असूनही ती विठोबाची तक्रार करताना दिसते. आपल्या मुलाला नामदेवाला या विठ्ठलानेच फूस लावून बिघडवले म्हणून हा संसारात न रमता विठ्ठल पूजेत रममाण होतो. याचा तिला राग येतो. ती म्हणते, ‘विश्वजनमोहना कपटीया नारायणा।काय देवपणा मिरवतोसी। दर्शना आलीया हृदयी संचरशी देहभाव घेसी हिरोनिया । या विश्वा वेगळे नवल तुझे करणे।सांगावे गाऱ्हाणे कोणापासी’। गोणाईच्या अंतरंगात विठ्ठल नटला असला तरी मनामधला एक कोपरा प्रपंचाने व्यापला आहे. त्यामुळे व्यवहार काही सुटत नाही. देहभाव हिरावून घेणाऱ्या विठ्ठलाला म्हणून त्या रागावतात.

Advertisement

अनुसंधानात भक्ताला भक्तीचे पिसे लागते आणि देहभाव लोपतो. पूजनीय कलावतीआई यांची गोष्ट आहे. एकदा पूजेसाठी लागणारे फुलांचे हार त्या करीत होत्या. हार, मूर्ती, मनातला भाव यात त्या एवढ्या तल्लीन झाल्या की स्व भाव विसरून गेल्या. त्या हार करीत असताना एक शिष्या त्यांच्या तळपायाला तेल चोळीत होती. हार तयार झाल्यावर त्या तिला म्हणाल्या, ‘तू पायाला तेल चोळीत बस. मी कृष्णाला हार घालून येते.’ ही स्मरणभक्ती म्हणजे तादात्म्य. संत तुकाराम यांची पत्नी आवली ही जरी वरवर भांडखोर दिसत असली, पतीशी भांडत असली तरी अंत:करणात ती पतीशी एकरूप झाली होती. पतीशिवाय तिला दुसरे विश्व नव्हते. भंडारा डोंगरावर पतीसाठी भाजी भाकरी घेऊन जाणाऱ्या आवलीच्या पायात काटा रुतला. नामस्मरणात दंग असलेल्या आपल्या भक्ताच्या संसाराची चिंता शेवटी विठ्ठलालाच. बालरूप घेऊन तो तिच्यासमोर उभा ठाकला. हळुवारपणे पायातला काटा काढणाऱ्या त्या बाळाबद्दल आवलीच्या मनात माया दाटून आली. ‘नाव काय रे तुझं?’ तिने विचारले. तो हसून म्हणाला. ‘विठा’. ‘अरे काळ्या तू इथे प्रगटलास होय?’ असे म्हणत तिने डोळे झाकून घेतले तेव्हा आतमध्येही तोच दिसू लागला. घरीदारी, जनामनात, अंत:करणात तोच काळा विठ्ठल पांडुरंग. हा सत्संगाचा परिणाम. पतीशी एकरूपता साधल्याने तो विठूही तिच्या अवतीभवती वावरू लागला. पतीचे अखंड ध्यान व स्मरण ही भारतीय स्त्राrची परंपरा.

स्मरण असणे आणि स्मरण ठेवणे यात सूक्ष्म फरक आहे. निरपेक्ष प्रेमाचा धागा गुंडाळत गुंडाळत शेवटी चटकन तो बंधमुक्त करतो. अनुसंधान ही तर अंत:करणाची अवस्था आहे. तो कर्माचा भाग नाही. माझेपण निसटून गेले. तू, तुझे उगवले की जग आपले वाटते आणि स्मरण असतेच असते. काही गोष्टींचे स्मरण मात्र ठेवावे लागते. स्वत:मध्ये रमणाऱ्या जिवाला मान वळवून पाठमोरा काळ दाखवावा लागतो. म्हणून स्मृतिदिन, श्राद्ध यांचे बंधन पूर्वजांनी घालून दिले. कृतज्ञता हे एक जीवनमूल्य आहे. माणूस उपकारकर्त्यापेक्षा अपकर्ता लक्षात ठेवतो. स्वत: केलेल्या उपकाराचे त्याला कधीही विस्मरण होत नाही. म्हणून तर जयंती, पुण्यतिथी उत्सव हे साजरे होत असतात.

स्वामी विवेकानंदांचे कार्य हे अजरामर आहे. आता काळ कितीतरी पुढे गेला, मूल्यांची पडझड झाली, जुने सारे नष्ट झाले तरीही जगण्याच्या लढाईसाठी बळ घ्यायला आम्हाला स्वामी विवेकानंदांच्या विचारांकडे वळलेच पाहिजे हे समाजाला पटते आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ‘विवेकानंद ही व्यक्ती गेली तरी विवेकानंद हा विचार कायम राहणार आहे.’ त्यांनी सांगितले होते की ‘प्रत्यक्ष जिवंत असलेल्या परमेश्वराची पूजा करा. अजून पन्नास वर्षे एकही मंदिर बांधले नाही तरी चालेल. आता पन्नास वर्षे भारतमाता हेच तुमचे मंदिर आहे. हीच तुमची देवता होऊ दे. भारतातील गोरगरीब जनतेला परमेश्वर म्हणून तिची पूजा करा.’ स्वामीजींनी दिलेल्या या महान संदेशाची आज तीव्रतेने गरज आहे. आजच्या संदर्भात जेव्हा आपण स्वामी विवेकानंद समजून घेतो तेव्हा अंतर्मुख होत समाज स्वामीजींच्या विचारांकडे प्रवृत्त होतो आहे ही सकारात्मक बाब आहे. हे स्मरण सतत आवश्यक आहे. आयुष्यात येणाऱ्या, जाणाऱ्या, उसवणाऱ्या थांबून असणाऱ्या काही आठवणी मात्र वेळीच वजा झाल्या पाहिजेत. नाही का? नाहीतर स्मरणाची धग आयुष्याला काजळी आणते.

महर्षी विनोबा भावे म्हणायचे, भूतकाळ हा पांगळा असतो आणि भविष्यकाळ आंधळा. म्हणून फक्त वर्तमानाचे स्मरण असावे. विनोबांनी विस्मरणाचे प्रयोग केले. ते म्हणत, विनोबा आठवले नाही तर विसरले आहे. विनोबा भूतकाळाचे ओझे होऊ देत नाही. मनुष्याचा देह हा काळाचा मेवा आहे. तो जाणारच आहे. उरेल काय? तर फक्त स्मरण. प्रा. राम शेवाळकर असे म्हणत की ‘आयुष्यात सुखाचे, दु:खाचे दोन्ही प्रसंग येतात. त्यातील सुखाचे पंख सक्षम असल्यामुळे त्याला उडून जाण्याची घाई असते. दु:खाचे पाय पंगू असल्याने त्याला निघून जायला उशीर लागतो. म्हणून सुख आठवणीपुरते उरते. तर दु:खाच्या आठवणींचे प्रदर्शन मांडले जाते.’ ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ ही अवस्था अनुभवायला म्हणून तर फक्त त्या सृष्टीकर्त्या आनंदनिधान परमेश्वराचे स्मरण असायला हवे.

स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.