स्थानिक फुटबॉलपटूंचा भाव वधारला
नव्या कोल्हापूरी फुटबॉल हंगामातील चित्र : 30 हजाराचे मानधन आता गेले दीड लाखांपर्यंत, संघ बांधणीसह इतर खर्चही 20 लाखाच्या आसपास, परराज्यातील 47 खेळाडूंवर कोटींच्या घरात वर्षाव
संग्राम काटकर /कोल्हापूर
यंदा छत्रपती शाहू स्टेडियममध्ये रंगणाऱ्या फुटबॉल हंगामासाठी परदेशी खेळाडूंना केएसएनेच बंदी केल्याने कोल्हापुरातील स्टार फुटबॉलपटूंची चांदी होईल, असे दिवस आले आहेत. गतहंगामात वरिष्ठ फुटबॉल संघातून 25 ते 30 हजार रुपये मानधनावर खेळलेल्या स्टार खेळाडूंचा दर चांगलाच वधारला आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसार 40 हजारपासून 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत मानधन देण्याचे मान्य करत सोळाही संघ व्यवस्थापनाने फुटबॉल संघ स्ट्राँग केला आहे. परराज्यातील 47 राष्ट्रीय खेळाडूंनाही संघात स्थान देताना प्रत्येक महिन्याला 30 ते 50 हजार रुपये प्रमानधन देण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला परराज्यातील खेळाडूंसाठी दरमहिना याप्रमाणे पुढील सहा महिने 6 ते 8 लाख रुपये तर स्थानिक स्टार खेळाडूंसाठी 6 ते 7 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
गतवर्षीचा फुटबॉल हंगाम संपल्यानंतर काहीच दिवसांनी केएसएचे पेट्रन-इन-चिफ श्रीमंत शाहू छत्रपती व केएसए अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी पुढील हंगामात परदेशी खेळाडूंना खेळण्यात बंदी घातली. चांगल्या स्थानिक खेळाडूंना मैदान गाजवण्याची संधी मिळावी, एवढीच त्यामागची भावना आहे, असे परदेशी खेळाडूंना बंदी घालताना मालोजीराजे यांनी जाहीर केले होते. परदेशी खेळाडूंना बंदी घालतानाच मात्र त्यांनी कोल्हापूर जिह्याबाहेर व भारतातील तीन खेळाडूंना संघातून खेळवण्यास अनुमती दिली. त्यामुळे वरिष्ठ 16 संघांना स्थानिक व देशभरातील खेळाडूंची मोट बांधूनच संघ मजबूत करावा लागणार हे स्पष्ट झाले होते. याचवेळी डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या फुटबॉल हंगामात कोणत्या संघातील स्टार खेळाडूंना आपल्या संघात घ्यायचे याची चर्चा संघ व्यवस्थापनात दबक्या आवाजाने केली जात होती. राष्ट्रीय पातळीवरील स्टार फुटबॉलपटूंचीही शोधाशोध संघ व्यवस्थापनाने सुरू केली होती. यातून महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, केरळ, मणिपूर, ओडीशा, पश्चिम बंगाल या 8 राज्यांमधील दर्जेदार खेळाडू संघ व्यवस्थापनाच्या नजरेस आले. व्यवस्थापनाने काही खेळाडूंचे मैदानातील व्हिडीओ पाहिले तर काही खेळाडूंची अज्ञातस्थळी कौशल्य चाचणी ही घेतली. यातून मैदानातील प्लेसनुसार स्थानिक व परराज्यातील खेळाडूंची मोट बांधून संघ तयार करण्यावर भर दिला गेला.
संघ बांधणीसाठी मोठ्या खर्चाची तयारी
संघांची बांधणी करताना सर्व संघांसमोर स्थानिक व परराज्यातील खेळाडूंना फुटबॉल हंगामासाठी किती मानधन द्यायचे हा प्रश्न उभारला होता. या प्रश्नाच्या सोडवणूकीबरोबरच फुटबॉल हंगामावर आपल्याच संघाचे वर्चस्व रहावे, यासाठी संघात नव्याने घेतल्या जाणाऱ्या स्थानिक व परराज्यातील खेळाडूंवर जास्तीत जास्त पैसे लावण्याचीही तयारी संघ व्यवस्थापनाने ठेवली. त्यानुसार 15 ते 20 लाख ऊपयांची व्यवस्था व्यवस्थापनाकडून करण्यात आली. संघ बांधणीसाठी प्रत्यक्ष हालचाली सुऊ झाल्या तेव्हा संघातून खेळण्यासाठी स्थानिक स्टार खेळाडूंनी संपूर्ण हंगामासाठी 70 हजार रुपयांपासून ते लाख-दीड लाख ऊपये संघ व्यवस्थापनाकडे मागायला सुऊवात केली. या मागणीत बारगेनिंग करण्याबरोबरच मैदानातील कौशल्यालाही तितकेच महत्व देत संघांनी 40 हजारपासून 1 लाख 50 हजार ऊपये मानधन संपूर्ण हंगामासाठी देण्याचे कबुल कऊन स्टार खेळाडूंना संघात स्थान दिले. काही संघात 60 ते 70 हजार ऊपये मानधन घेणाऱ्या खेळाडूंचाही सहभाग आहे. परराज्यातील 47 राष्ट्रीय खेळाडूंनाही संघात स्थान देताना महिन्याला 30 ते 50 हजार ऊपये मानधन देण्याची तयारी दाखवली. या मानधनाबरोबरच प्रत्येक परराज्यातील खेळाडूला फुड अलाऊन्स, निवास व्यवस्था व परगावाचा प्रवास यासाठी येणारा सगळा खर्चही करण्यास संघांनी सहमती दशर्वली आहे. दरम्यान विविध संघांमधून नव्या फुटबॉल हंगामात खेळणारे सर्व परजिल्हा व परराज्यातील खेळाडू हे मैदानातील गोलकिपर, डिफेन्स, स्ट्रायकर या प्लेसला खेळणार आहेत. शुक्रवार 15 रोजीपासून सुऊ होणाऱ्या फुटबॉल हंगामात स्थानिक खेळाडूंना सुरवातीचे काही सामने खेळतेवेळी परराज्यातील खेळाडूंशी ‘कॉम्बिनेशन’ ठेवून खेळणे कठीण जाईल. मात्र जस जसे कॉम्बिनेशन जुळत जाईल, तस तसे स्पर्धांमधील सामने चुरशीने खेळले जातील, यात शंकाच नाही.
शिवाजी मंडळ व पाटाकडीलचे खेळाडू ठरले महागडे
शिवाजी तरुण मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघातून यंदाच्या फुटबॉल हंगामात खेळणारे दोन खेळाडू सर्वाधिक मानधन घेणार ठरले आहे. या खेळाडूंनी गेल्या काही फुटबॉल हंगामात विविध संघांमधून खेळताना उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपला चाहता वर्ग तयार केला आहे. त्याचीच दखल घेऊन संघांनी त्यांना एक लाखपासून ते दीड लाख ऊपये मानधन देण्याचे मान्य केले आहे, असे संघांच्या सुत्रांनी सांगितले.