नावाचे मोल
भगवंताच्या गोड नामाची गोडी चाखता यावी म्हणून आपल्या द्रष्ट्या पूर्वजांनी नामी युक्ती शोधून काढली. माणसाचे मन, शरीर जराजर्जर झाले, दात पडले, तरी गुंतून जाते ते कशात? तर खाण्यात. जीभ बोलणे आणि खाणे शरीर पडेपर्यंत सोडतच नाही. ज्यात मन अडकून पडते आणि रंगून जाते अशा खाण्याच्या पदार्थांना, भगवंताचे नाम जोडून देण्याची किमया साधली ती पूर्वज स्त्रियांनीच.
घरी आलेल्या अतिथीने काहीतरी थोडेसे खाऊन जावे किंवा जेवून जावे असे आजही संसारात आनंद पसरवणाऱ्या गृहलक्ष्मीला वाटते. अगदीच काही नाही तर निदान सरबत, चहा, कॉफी. तेही चालत नसेल तर किमान पाणी तरी पिऊन जा असा आग्रह एखादे घर करते. बायकांप्रमाणेच पुरुषांना सुद्धा आपल्या घरातला प्रेमाचा घास अतिथीने घ्यावा असे मनापासून वाटते. खाऊ घालणे ही भावना निसर्गदत्त आहे. कलियुगामध्ये माणसाचा प्राण अन्नात आहे म्हणून की काय अन्नदानात जे समाधान, तृप्ती, आनंद मिळतो तो इतर कशातही मिळत नाही. पूर्वी घराघरात स्वयंपाकघर मोठे असायचे. गृहाग्नी पेटलेला असायचा आणि स्त्रियांचे हात स्वयंपाक करण्यात गुंतलेले दिसायचे. आसन किंवा पाट घ्यायचा आणि हक्काने जेवायला बसायचे. कुणीही, कधीही. मोजून मापून काहीही नसल्याने गृहिणीला चिंता देखील करण्याचे काही कारणच नव्हते. हळूहळू कुटुंबसंस्था बदलली. पदार्थ बदलले. रुची बदलली आणि माणसाचे मनसुद्धा! मुबलक खाण्यासाठी आणि ताटभरून जेवणासाठी समाजाची पावले घराबाहेर पडली. हवे ते हवे तेव्हा खायला मिळू लागले आणि अन्नाला अर्थमूल्य चिकटले. खाऊ घालण्यामधला निखळ आनंद पुसून गेला.
मुली बाहुल्या खेळत. भातुकली मांडत. तेव्हा एक बालगीत लोकप्रिय होते. ‘लहान माझी बाहुली मोठी तिची सावली.’ ही बाहुली आळशी आहे. दात घासत नाही. अंग धूत नाही. पण...... ती स्वयंपाक मात्र करते. कसा? तर... ‘भात केला करपून गेला, पोळ्या केल्या कच्च्या झाल्या, वरण केले पातळ झाले, तूप सगळे सांडून गेले.’ अशी ही वेंधळी बाहुली घरात आलेले अतिथी उपाशी जाताना पाहून कासावीस होते आणि म्हणते, ‘असे भुकेले नक्का जाऊ. थांबा करते गोड खाऊ.’ या शेवटच्या ओळी अंतर्मुख करणाऱ्या आहेत. स्वामी विवेकानंद म्हणत की आम्ही भारतीय पाच वर्षाच्या मुलीला देखील आई म्हणतो. कारण तिच्यामध्ये असलेला मातृभाव. वात्सल्य, प्रेम, कळकळ ही छोट्या मुलींमध्येही असतेच. ती संक्रमित होते ती घरातल्या संस्कारांवर. अन्नपूर्णा तिथेच घडते. घरी आलेल्या अतिथीला काहीतरी खाऊन जा असा आग्रह करूनही जर त्याने त्याच्या व्यस्ततेमुळे नाही म्हटले तर खाण्याचे नाव काढले आहे तर, आता काहीतरी तोंडात टाकून जा ही गृहिणीची आज्ञा असते आणि ती मोडायची कुणीही हिंमत करत नाही.
नावाचा आणि अन्नाचा मोठा गहिरा, गूढ असा संबंध आहे. परमपूजनीय दत्तावतारी संत नानामहाराज तराणेकर म्हणतात, ‘भगवंताने जर विदुराघरी त्यांची पत्नी सुलभा हिने दिलेली केळ्याची सालेही भक्तिभावाने खाल्ली आहेत तर आपणाला एखाद्या वेळेस बिनसाखरेचा चहा किंवा अळणी भाजी खावी लागली तर संतप्त न होता, अन्नाला नावे न ठेवता खावे. अन्न हा ब्रम्हरस आहे.’ अन्नाला नावे ठेवली तर अन्न तयार करणारी अन्नपूर्णा आणि अन्नब्रह्म या दोघांचाही अपमान होतो. संत तुकाराम महाराज यांचा मेहुणा आणि ते एकदा एकत्र जेवायला बसले. त्या दिवशी स्वयंपाकात मीठ घालायला संत तुकारामांच्या पत्नी आवली या विसरल्या होत्या. संत तुकाराम महाराज आनंदात जेवले; मात्र त्यांचा मेहुणा उपाशी उठला. आवलीने जेव्हा जेवताना पहिला घास घेतला तेव्हा तिला कळले की जेवण अळणी आहे. ती तुकोबारायांना म्हणाली, तुम्ही स्वयंपाकात मीठ नाही हे का बरं सांगितलं नाही? महाराज म्हणाले, ‘कळलं असतं तर सांगितलं असतं ना!’ ‘काय खातो आम्ही कासाया सांगाते । कैसे हे लागते नेणो मुखी ।। विठ्ठल हा अमृत नामरस महाराजांच्या मुखी असल्याने इतर पदार्थांची त्यांना काय ती गोडी? त्यामुळे अन्नाला नावे ठेवण्याचा, कडू, गोड म्हणण्याचा काही प्रश्नच नाही. भगवंताच्या गोड नामाची गोडी चाखता यावी म्हणून आपल्या द्रष्ट्या पूर्वजांनी नामी युक्ती शोधून काढली. माणसाचे मन, शरीर जराजर्जर झाले, दात पडले, तरी गुंतून जाते ते कशात? तर खाण्यात. जीभ बोलणे आणि खाणे शरीर पडेपर्यंत सोडतच नाही. ज्यात मन अडकून पडते व रंगून जाते अशा खाण्याच्या पदार्थांना, भगवंताचे नाम जोडून देण्याची किमया साधली ती पूर्वज स्त्रियांनीच. मंगल प्रसंगी, सणावारी घरात गोडाधोडाचा स्वयंपाक होतो. तळणीचे पदार्थ होतात. तेव्हा तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये कडकडीत तेलाचे किंवा तुपाचे ‘मोहन’ घालतात. त्यामुळे पदार्थ खुसखुशीत होतात. मोहन हे समस्त जनांच्या लाडक्या श्रीकृष्णाचे नाव. मोहन पदार्थांत घातले की पदार्थ तोंडात विरघळतात. कृष्णाचे नाम आपल्या मुखात विरघळून जावे म्हणून तर हे नाव घेतले नसेल ना? ‘कृष्णा’ ही हाक आदिम आहे व भारतीयांच्या तनामनात विरघळलेली आहे. दिवाळीमध्ये किंवा एरवीसुद्धा घरात खारे व गोडे शंकरपाळे करतात. त्यात ब्रम्हा, विष्णू, महेश यातले शंकर म्हणजे महेश. ते सृजन व संहार करणारे आदिनाथ आहेत. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्याला समभुज चौकोन असे म्हणतात. शंकरपाळे म्हणजे समभुज चौकोनच. जगामध्ये जन्म व मृत्यू यांचा समतोल साधतात ते शंकर भगवान. त्यामुळे सृष्टीचे कार्य सुरळीत चालते. ज्या कोणी हा पदार्थ शोधून काढत त्याला हे नाव बहाल केले त्याच्या बुद्धीला मन:पूर्वक वंदन करायलाच हवे. पूर्वी घरात एक पटकन होणारा साधा सरळ असा पदार्थ हमखास होत असे. तो म्हणजे ‘सुधारस’ साखरेच्या पाकात लिंबू पिळून केलेला गोड, आंबट पदार्थ म्हणजे सुधारस. सुधा म्हणजे अमृत. सरळ मार्गांनी जाणारा तो सुधा. याचा एक अर्थ वीज असाही आहे. यात ऊर्जा आहे. भगवंताने त्याचा बालमित्र सुदामा याच्या पत्नीने दिलेले शेजाऱ्यांकडून उसने मागून आणलेले पोहे, हिसकावून घेत, मिटक्या मारत खाल्ले. आपले मित्रप्रेम कृष्णाने चिरंजीव केले. फाटक्या कपड्यात पोहे बांधून आणलेल्या पुरचुंडीच्या गाठी देखील मोकळ्या केल्या. सुदाम्याचे दारिद्र्या नाहीसे करून त्याला ऐश्वर्य दिले. हे मित्रप्रेम अमर आहे. कृष्णाष्टमीला प्रसादासाठी, नैवेद्यासाठी जे लाडू करतात त्यांना ‘गोविंद’ लाडू किंवा ‘सुदाम’ लाडू असे म्हणतात. या लाडवांमध्ये पोहेही घालतात. घरामध्ये मंगल कार्य असले की पक्वानांची सुरुवात ही राघवदास किंवा नारायणदास लाडू करून करण्याची पद्धत आहे. त्यात श्रीराम व विष्णू यांचे नाव गुंफलेले आहे. शुभप्रसंगी शुभनाम ओठी यावे हा उद्देश त्यामागे असावा. श्रीक्षेत्र तिरुपती येथे बालाजी लाडू मिळतो. बालाजी लाडूप्रसाद मिळायला व तो सेवन करायला भाग्य लागते.परमेश्वराचे नाव खाद्यपदार्थांना देणे ही नामस्मरण ओठी राहण्याची उत्तम अशी पद्धत पूर्वजांनी घालून दिलेली आहे.
जेवण सुरू करण्यापूर्वी तसेच जेवताना व जेवून उठल्यावर परमेश्वराचे नाम घेणे, श्लोक म्हणणे, तेही उच्च स्वरात म्हणणे ही संस्कृतीची शिकवण मोलाची आहे. प्रत्येक घासांमध्ये परमेश्वर असतो. अन्नामुळे माणसाचे मन तयार होते. ते सात्विक आणि राष्ट्राचा उद्धार करणारे असावे म्हणून शरीराच्या आत वसलेल्या परमेश्वराला हा घास आपण भरवतो आहोत हे जाणून भगवंताचे कृपाळूपणे नामस्मरण करावे. ही पूर्वजांची धारणा अपूर्व अशीच आहे. स्वयंपाक बनवणे, तो आनंदाने सर्वांना खाऊ घालणे ही मोठी साधना आहे. ती सोपी नाही आणि दुर्लक्ष करावी असे तर मुळीच नाही. त्यात समस्त जिवांची प्राणरक्षा सामावली आहे. कृतज्ञतापूर्वक वंदन हेच यामागचे सर्वोच्च मूल्य आहे.
स्नेहा शिनखेडे