पेशावरमधील दूतावास अमेरिका बंद करणार
सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय
► वृत्तसंस्था
वॉशिंग्टन
अमेरिकेने पाकिस्तानमधील पेशावर येथील आपला वाणिज्य दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राजनैतिक कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि संसाधनांचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले. खैबर पख्तुनख्वा प्रांताशी संबंधित सर्व राजनैतिक कामकाज आता इस्लामाबादमधील अमेरिकी दूतावासातून केले जाईल. खैबर पख्तुनख्वा हा अफगाणिस्तानला लागून असलेला एक संवेदनशील प्रदेश असून तेथे दहशतवादी हल्ले आणि सुरक्षा दलांशी चकमकी वारंवार होतात. या हल्ल्यांमध्ये अफगाण-समर्थित दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. अगदी अलीकडेच मार्च महिन्यात कराचीमधील अमेरिकी वाणिज्य दूतावासाबाहेर झालेल्या हिंसाचारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनामुळे येथे आंदोलन सुरू झाल्यानंतर हिंसाचार भडकला होता.