ग्रीनलँडवर कब्जाची अमेरिकेची तयारी
राष्ट्रीय सुरक्षेसाठी नियंत्रण आवश्यक असल्याचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण मिळवण्याची आपली इच्छा पुन्हा व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या यासंबंधीच्या वक्तव्यानंतर डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या नेत्यांचा राग अनावर झाला आहे. सोमवारी एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँडवर ताबा मिळविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. या परिसरात रशियन आणि चिनी जहाजांची उपस्थिती चिंतेची बाब आहे. अमेरिकेला संरक्षण हेतूंसाठी ग्रीनलँडची आवश्यकता आहे, असे ट्रम्प म्हणाले.
ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ्रेडरिक निल्सन यांनी ट्रम्प यांच्या टिप्पण्या अयोग्य आणि अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन न्यूयॉर्कला नेल्यानंतर वाद आणखी वाढला आहे. मादुरो यांच्यावर ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली खटला चालवला जाणार आहे. या दोन देशांमध्ये संघर्ष चालू असतानाच आता अमेरिकेने अन्य देशांनाही धमक्या आणि इशारे देण्यास सुरुवात केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प यांना रोखले
डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी ट्रम्प यांच्या या दाव्याला लगेच उत्तर देत ग्रीनलँडवर ताबा मिळविण्याची अमेरिकेची इच्छा पूर्णपणे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाहा. तसेच त्यांना डॅनिश राज्याचा कोणताही भाग ताब्यात घेण्याचा अधिकार नाही, असे डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी स्पष्टपणे सांगितले. फ्रेडरिकसन यांनी ट्रम्प यांना जवळच्या मित्रदेशाविरुद्ध धमक्या देणे थांबवण्याचे आवाहन केले. डेन्मार्क हा नाटोचा सदस्य असून त्याचा अमेरिकेशी आधीच संरक्षण करार झालेला आहे.