For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका-इराण युद्ध संपण्याच्या मार्गावर

06:45 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका इराण युद्ध संपण्याच्या मार्गावर
Advertisement

होर्मुझवरील नाकेबंदी उठवली जाणार : 14 अटींच्या करारावर दोन्ही देशांकडून सहमतीचे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था

तेहरान, वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिका आणि इराण यांच्यातील अनेक महिन्यांच्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, आता एक कायमस्वरूपी शांतता करार होऊ शकतो. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरू असलेली अमेरिका-इराण चर्चा युद्ध संपवण्याच्या मसुदा कराराच्या जवळ पोहोचली आहे. या मसुद्यानुसार सध्याचा संघर्ष थांबवला जाईल. तसेच इराणच्या अणुसंवर्धनावर कडक देखरेखीखाली निर्बंध घातले जातील. याव्यतिरिक्त अमेरिकेने लादलेले काही निर्बंध शिथिल केले जातील आणि होर्मुझमधून होणारी जलवाहतूक पुन्हा सुरू होईल.

इराण-अमेरिका युद्ध येत्या 48 तासांत संपू शकते असे संकेत मिळत आहेत.  14 अटींचा करार तयार असून त्यानुसार अमेरिका इराणची मालमत्ता परत करणार आहे. तसेच इराण होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासोबतच अणुकार्यक्रम थांबवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. अद्याप यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले नसले तरी येत्या एक-दोन दिवसात द्विपक्षीय चर्चेअंती या प्रस्तावांवर तोडगा काढला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

इराणकडून 48 तासांत प्रतिसाद अपेक्षित आहे, परंतु अद्याप कोणताही करार झालेला नाही. अमेरिकेला पुढील 48 तासांत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर तेहरानच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिनिधित्व करणारे स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे इराणी अधिकाऱ्यांसोबत 14-कलमी मसुद्यावर वाटाघाटी करत आहेत. जर चर्चा अयशस्वी ठरल्या, तर वॉशिंग्टन पुन्हा नाकेबंदी लादू शकते किंवा लष्करी कारवाई पुन्हा सुरू करू करण्याची भीतीही कायम आहे.

शांती करारासाठी इराणच्या अटी

ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याच्या उद्देशाने सुरू असलेली तीन दिवसीय नौदल मोहीम थांबवल्यानंतर इराणने ‘जर शांतता करार न्याय्य असेल तरच तो स्वीकारला जाईल’ असे म्हटले आहे. उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकी शिष्टमंडळाने कुशनर आणि विटकॉफ यांच्यासह, 11-12 एप्रिल, 2026 रोजी इस्लामाबादमध्ये इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, परंतु 21 तासांची ही चर्चा अनिर्णित राहिली होती.

अमेरिकेने ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ थांबवला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा सुरू असलेला ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ हा प्रयत्न थांबवला आहे. इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठीच्या कराराच्या दिशेने चर्चेत प्रगती झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाकिस्तान आणि इतर देशांच्या विनंतीनुसार, इराणविरुद्धच्या मोहिमेत मिळालेले प्रचंड लष्करी यश आणि इराणी प्रतिनिधींसोबत अंतिम कराराच्या दिशेने झालेली लक्षणीय प्रगती लक्षात घेता ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ तात्पुरता स्थगित केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.