आगामी ‘महाकुंभ’ डिजिटल असणार
चाळीस कोटींपेक्षा अधिक भाविक, आयपीएलच्या दहापट उत्पन्न, खर्चही तसाच व्यापक
वृत्तसंस्था / प्रयागराज
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे लवकरच महाकुंभमेळ्याचा शुभारंभ होणार आहे. 13 जानेवारीपासून या कुंभमेळ्यासाठी भाविकांच्या आगमनाचा प्रारंभ होत आहे. यावेळचा महाकुंभ डिजिटल सोयींनी युक्त असा असणार असून सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 2 हजार 700 सीसीटीव्ही कॅमेरे, जमावाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग, तसेच पाण्याखाली काम करणारे ड्रोन अशी विविध साधने हा कुंभमेळा साजरा होण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहेत. सुरक्षेचीही अत्यंत कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे.
या कुंभमेळ्याचे अर्थशास्त्रही असेच प्रचंड आहे. या पर्वणीतून आयपीएलपेक्षा 10 पट किंवा त्याहूनही अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. एक महिन्याच्या या महाकुंभपर्वात 40 कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार आहेत. या महाकुंभमेळ्यासाठी 6 हजार कोटी रुपयांचा खर्च प्रशासन करणार आहे.
सहस्त्रावधी वर्षांचा इतिहास
प्रत्येक 12 वर्षांनंतर आयोजित केल्या जाणाऱ्या या महाकुंभमेळ्याचा इतिहास सहस्त्रावधी वर्षांचा आहे. अन्य कोणत्याही महत्त्वाच्या धर्माचा प्रारंभही झाला नव्हता, तेव्हापासून महाकुंभाचे आयोजन केले जात आहे. सध्याच्या आधुनिक युगातही महाकुंभमेळ्याचे महत्त्व असून ते दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. प्रथम कुंभमेळा साधारणत: 5 सहस्त्र वर्षांपूर्वी, किंवा त्याहीआधी साजरा झाला असावा, असे अनुमान ऐतिहासिक माहितीवरुन व्यक्त केले जात आहे.
नागा साधू हे प्रमुख वैशिष्ट्या
नागा साधू हे प्रत्येक कुंभमेळ्याचे वैशिष्ट्या राहिलेले आहे. या साधूंची जीवनशैली, त्यांचा आहार, त्यांची योगसाधना आणि त्यांचा व्यवहार हे नेहमीच इतर भाविकांच्या आकर्षणाचे विषय राहिलेले आहेत. या महाकुंभमेळ्यातही नागा साधूंची संख्या प्रचंड असेल, असे अनुमान आहे. काही नागा साधू तर आतापासूनच प्रयागराज येथे आलेले असून त्यांच्या कुट्यांमध्ये वास्तव्यास आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
यावेळचा महाकुंभ योग्यप्रकारे साजरा व्हावा, यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार मोठ्या प्रमाणात घेतला आहे. यासाठी ‘डिजीकुंभ’ नामक व्यवस्था करण्यात आली आहे. महाकुंभाच्या मुख्य भूमीवर बळकट अशा प्रकारच्या डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. कुंभातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख यंत्रणा अत्याधुनिक स्वरुपाची आहे.
इंटरनेट व्यवस्था दिली जाणार
या महाकुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांना इंटरनेट सुविधेचा उपयोग करता येणार आहे. तथापि, या व्यवस्थेवर प्रशासनाचे कठोर नियंत्रण असेल. या व्यवस्थेचा दुरुपयोग करुन अफवा पसरविण्याचे काम होऊ शकते. तसे झाल्यास भाविकांमध्ये प्रचंड गोंधळ माजून गंभीर प्रसंग निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी योग्य ती पूर्वदक्षता घेण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली.
केवळ साडेतीन वर्षांचे संत श्रवण पुरी
प्रत्येक महाकुंभात लक्षावधी साधू, संन्याशी आणि संत सहभागी होतच असतात. तथापि, यावेळी एक असे संत चर्चेत आहेत, की ज्यांचे वय केवळ साडेतीन वर्षे इतके आहे. त्यांचे नाव श्रवण पुरी असे आहे. त्यांना संत हे पद जुन्या आखाड्याच्या साधूंनी आतापासूनच दिले आहे. ते आखाड्याच्या अनुष्ठानांमध्ये आणि आरतीमध्ये नित्यनेमाने सहभागी होत असतात. इतक्या अल्पवयातच त्यांच्यात आधात्मिक लक्षणे दिसून आल्याने त्यांना संत म्हणून ओळखले जाते. एका दांपत्याने त्यांना 2021 मध्ये श्याम पुरी आश्रमाला दान केले आहे.