मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याचे अनावरण
वृत्तसंस्था/जबलपूर (मध्यप्रदेश)
भारतीय हॉकी क्षेत्राचे जादुगार दिवंगत मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याचे अनावरण येथे गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून त्यांचा चिरंजीव आणि भारताचा माजी ऑलिम्पिक हॉकीपटू अशोककुमार यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनीही याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली. 1925 ते 1949 या 24 वर्षांच्या कालखंडामध्ये भारतीय हॉकीने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख जगाला करुन दिली होती. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी क्षेत्राचे जादुगार म्हणून आजही ओळखले जातात. ध्यानचंद यांनी आपल्या वैयक्तिक हॉकी कारकिर्दीत या कालावधीत 185 सामन्यात 1500 पेक्षा अधिक गोल नोंदविले. ध्यानचंद यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय हॉकी
संघाने 1928, 1932 आणि 1936 अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळविली. 1956 साली मेजर ध्यानचंद यांचा पद्मभूषण देवून शासनातर्फे गौरविण्यात आले होते. 29 ऑगस्ट ध्यानचंद यांचा जन्मदिन असल्याने प्रत्येक वर्षी हा दिवस देशामध्ये राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात आतापर्यंत भारताला उत्तुंग यश मिळवून देणाऱ्या क्रीडापटूंना या दिवशी आदरांजली वाहिली जाते. मेजर ध्यानचंद यांच्याकडे दर्जा आणि क्षमता यांचे सुंदर मिश्रण असल्याने आजही संपूर्ण देश त्यांचा आदर करतो, असे अशोककुमार यांनी म्हटले आहे. आपल्या वडिलांचे पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मुलगा या नात्याने मला मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.
29 ऑगस्ट हा दिवस देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील सर्व क्रीडापटू आणि नागरिकांनी राष्ट्रीय क्रीडादिनावेळी किमान 1 तास आपला बहुमोल वेळ देवून आऊटडोअर क्रीडा क्षेत्रात आपला सहभाग दर्शवावा, असे आवाहन केंद्रीय क्रीडा युवजन खात्याचे मंत्री मनसुक मांडविया यांनी 24 ऑगस्ट रोजी केले होते. देशामध्ये विविध ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शारीरिक तंदरुस्ती आणि क्रीडा संस्कृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. “खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडादिनानिमित्त केले. संपूर्ण भारत देश शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि तंदरुस्त करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी बाळगले आहे. त्यानुसार आता पंतप्रधानांनी फिट इंडिया चळवळ हाती घेतली आहे.
पंतप्रधानांची आदरांजली
राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना आपल्या शुभेच्छा दिल्या असून त्यांनी दिवंगत मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली आहे. नजीकच्या भविष्य काळामध्ये जागतिक क्रीडा स्तरावर भारतातील युवापिढी अधिक दर्जेदार कामगिरी करत देशाचे नाव उज्वल करेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.