तीर्थकुंडयेत छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचा अनावरण सोहळा जल्लोषात
वार्ताहर / किणये
ढोलताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात तीर्थकुंडये गावात गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीचे जल्लोषात अनावरण करण्यात आले. गावात भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. तसेच कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. यामुळे अवघा गाव भगवेमय बनला होता.
तीर्थकुंडये येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा व ग्रामस्थांच्यावतीने गावात शिवरायांची मूर्ती उभारण्यात आली आहे. याचा अनावरण सोहळा बुधवार व गुरुवार असे दोन दिवस मोठ्या उत्साहात झाला. यानिमित्त संपूर्ण गावकऱ्यांमध्ये एकीचे दर्शन दिसून आले. बुधवारी सकाळी विधीवत पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर दिवसभर शिवरायांच्या मूर्तीसमोर भजन व अध्यात्मिक कार्यक्रम झाले. गुरुवारी सकाळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.
संजय कुबल, प्रमोद कोचेरी, विलास बेळगावकर, किशोर देशपांडे, लक्ष्मण बामणे, लक्ष्मण झांगरे, प्रकाश मजगावी आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रवि कोकितकर यांनी ध्वजपूजन केले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित भाषण केले. तसेच तीर्थकुंडये गावात नागरिकांमध्ये शिवरायांप्रती असलेल्या आदरभावाचे कौतुकही केले. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.
ग्रा. पं. अध्यक्ष रामलिंग मोरे, सखुबाई पाटील, लक्ष्मण बन्नार आदींसह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते, गावातील पंचमंडळी, देवस्थान पंचमंडळी, विविध तरुण मंडळांचे सदस्य, महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण तारीहाळकर यांनी केले.
हिंडलगा येथील शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांचा सह्याद्रीचा सिंह गर्जतो हा पोवाड्याचा कार्यक्रम रात्री झाला. ‘ओम नमो जगदंबे, करु प्रारंभे नमन तुज अंबे डफावर हात तुणतुण्याचा’ असे म्हणत व्यंकटेश देवगेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचे विविध पोवाडे सादर केले.