विश्वरूप सहजी पहायला मिळत नाही
अध्याय आठवा
विश्वरूपाचे रौद्र रूप त्याची भव्यता आणि विविधता बघून वरेण्यराजा तसेच अर्जुन दोघेही चकित झाले. त्या रुपाची दोघांनाही भीती वाटू लागली. ज्ञानेश्वरीमध्ये माउली त्या प्रसंगाचे बहारदार वर्णन करतात. तेच आपण सध्या पहात आहोत. त्यानुसार अर्जुनाने भगवंताची प्रार्थना केली की, देवा, माझ्या अंत:करणातलं सर्व तुम्ही जाणता, तेव्हा माझ्यावर प्रसन्न व्हा. मस्तकावर किरीट धारण केलेल्या, हातात गदा, चक्र असणाऱ्या तुझ्या रुपाला पाहण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहो, हे विश्वरूपधारिन् तू पुन्हा तेच चतुर्भुज स्वरूप धारण कर. ते पाहण्यास मी उत्सुक आहे. म्हणून आता आपले प्रचंड विश्वरूप आवरून, चतुर्भुज रूप धारण करावे. महाराज, हे विश्वरूपाचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले आहेत. आता ते डोळे श्रीकृष्णमूर्ती पाहण्याकरता अत्यंत उत्सुक झाले आहेत. ह्या डोळ्यांना त्या सगुण श्रीकृष्णमूर्तीशिवाय इतर काही पाहणे आवडत नाही. आमच्या दृष्टीने ऐहिक व पारलौकिक भोगापेक्षा, अगदी मोक्षापेक्षा देखील शामसुंदर मूर्ती श्रेष्ठ वाटते. म्हणून देवा, आता तू तसाच चतुर्भुज हो व हे विश्वरूप आटोपते घे. अर्जुनाची विनंती ऐकून भगवंत चकित झाले. त्यांनी मनात विचार केला की, एव्हढे याला विश्वरूप दाखवले पण त्याला त्याचे काहीच कौतुक नाही. लहान मूल जसे एखाद्या खेळण्याचा कंटाळा आला की ते टाकून देऊन दुसऱ्या खेळण्याचा हट्ट धरते तसे याचे चालले आहे. असा विचार करून भगवंतांनी अर्जुनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण अर्जुन ऐकत नाही हे पाहिल्यावर त्याच्या प्रेमापोटी त्याचा हट्ट पुरवला.
श्रीकृष्ण म्हणाले, तुझ्यावर प्रसन्न होऊन मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझे तेजोमय, विश्वात्मक, अनंत व आद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखवले. हे माझे विश्वरूप तुझ्याखेरीज पूर्वी कोणीही पाहिलेले नाही. अशी ही अप्राप्य वस्तु तुला प्राप्त झाली आहे! पण तू तिच्या प्राप्तीचा आनंद न मानता एककल्ली मनुष्यासारखा भिऊन का बोलतोयस ते कळत नाही. मी जेव्हा सहजच प्रसन्न होतो, तेव्हा माझ्या भक्ताने जे म्हंटलेले असेल ते त्यास देतो. अगदी स्वत:चे शरीरसुद्धा! अर्जुना शरीर अर्पण करण्यापर्यंत ठीक आहे पण कुणाला आपला जीव अर्पण करणे ही गोष्ट आत्तापर्यंत माझ्या हातून कधीच घडलेली नाही. आज तो माझा जीव एकत्र गोळा करून तुझ्या इच्छेखातर, मी हे एवढे विश्वरूप तयार केले आहे. ते हे माझे मायेपलीकडील स्वरूप अमर्याद असून कृष्णादिक जे अवतार होतात ते येथूनच होतात. हे विश्वरूप सहजी पहायला मिळत नाही. कारण हे कोणत्याही साधनांनी प्राप्त होण्यासारखे नाही. वेदपठण, यज्ञयाग, शास्त्रपठण, दान, श्रौतस्मार्तादि कर्मे अथवा उग्र तपश्चर्या या साधनांनी देखील माझे विश्वरूप मनुष्यलोकामध्ये दिसणे शक्य नाही. असले श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही वाट्याला आलेले नाही. म्हणून विश्वरूपप्राप्तीने तू आपल्यास धन्य मान व या विश्वरूपाची भीती बाळगू नकोस. या विश्वरूपावाचून काही चांगले मानू नकोस.
अर्जुना, आता तुझ्यावर काय रागवायचे? पण तू सावलीला आलिंगन द्यायला निघाला आहेस, विश्वरूप हेच माझे खरे रूप आहे पण मन अधीर करून क्षुल्लक अशा चतुर्भुजरूपाच्या ठिकाणी तू प्रेम धरतोस हे बरे नाही. सगुणरूपाविषयी आस्था धरू नकोस. विश्वरूप जरी भयंकर अक्राळ विक्राळ आणि अवाढव्य असले तरी हेच उपासनेला योग्य आहे असा तू पक्का निश्चय कर. हवं तर बाह्य अंत:करणाने मैत्रीचे सुख लाभावे म्हणून आमच्या चतुर्भुज शामसुंदर मूर्तीचा उपभोग घे पण विश्वरूपाला विसरू नकोस, हेच तुला वारंवार सांगणे आहे.
क्रमश: