मोहम्मद रफी यांच्या गायनात वेगळेपणा
‘आसमान से आया फरिश्ता’ चर्चासत्रात सूर : अनुराधा पौडवाल, सोनू निगम यांची उपस्थिती
प्रज्ञा मणेरीकर/पणजी
मोहम्मद रफी यांना आपल्या गायकीबद्दल आपल्या प्रसिद्धीबद्दल कधीच घमेंड नव्हती. त्यांच्या गळ्यात एक वैशिष्ट्या होतं ते कुठल्याही इतर गायकांमध्ये दिसून येत नव्हते. अभिनेत्यानुसार त्यांची गायकी ठरायची आणि ती बरोबर जुळत होती. कधी कधी अभिनेताच गीत गात असल्याचा आभास व्हायचा. आपल्या गाण्याला त्यांनी कधीच व्यावसायिकदृष्टीने पाहिले नाही. नम्र व प्रेमळ असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते, असा सूर चित्रपटतज्ञांनी 55 व्या इफ्फीमध्ये शताब्दी वर्ष ‘आसमान से आया फरिश्ता’ मोहम्मद रफी गायनाचा बादशाह यावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलताना काढला. या चर्चासत्रात प्रसिद्ध गायिका डॉ. अनुराधा पौडवाल, दिग्दर्शक सुभाष घई, मोहम्मद रफी यांचे सुपुत्र शाहिद रफी आणि प्रसिद्ध गायक सोनू निगम उपस्थित होते.
मोहम्मद रफी यांना आम्ही एक मोठा गायक म्हणून किंवा एक सेलेब्रिटी म्हणून कधीच पाहिले नाही. एका सामान्य बापाप्रमाणेच पाहिले. जेव्हा लोकांनी केलेलं प्रेम दिसले तेव्हा माझे वडील केवढे मोठे आहेत याची जाणीव झाली, असे मोहम्मद रफी यांचे पुत्र शाहीद रफी यांनी सांगितले. ‘बचपन जवानी रवानी’ अशाप्रकारे मोहम्मद रफी आणि माझे संबंध होते. लहानपणापासून मोहम्मद रफी यांची गाणी ऐकली होती. इथूनच त्यांच्या गाण्यांप्रती आदर निर्माण झाला. कर्ज चित्रपटासाठी ‘दर्दे दिल दर्दे जिगर’ या गझलला पॉप गीतात ऊपांतरित केले. त्यांच्या गायकीचा प्रभाव माझ्यावर एवढा होता की प्रत्येक जो गायक माझ्या चित्रपटासाठी गायचा त्याला मी रफी साहेबांसारखा गाण्याचा प्रयत्न कर असं आवर्जून सांगायचो, असे दिग्दर्शक सुभाष घई यांनी सांगितले. यावेळी अनुराधा पौडवाल यांनी मोहम्मद रफी यांचे किस्से सांगितले.
सोनू निगमनी सादर केली रफींची गाणी
या चर्चासत्राचे मुख्य आकर्षण ठरलं तर ते म्हणजे सोनू निगम यांनी मोहम्मद रफींनी गायलेली काही गीते सादर केली आणि एक वेगळेच वातावरण तयार झाले. कार्यक्रमात अनुराधा पौडवाल, सोनू निगम यांनी दोघांनी मिळून रफी यांनी गायलेली गाणी सादर केली आणि प्रेक्षकांना जुन्या काळात नेले. ‘दर्दे दिल दर्दे जिगर’, ’आसमान से आया फरिश्ता’ आणि ‘आवाज दे के’, परदा है परदा अशी अनेक गाणी सोनू निगम यांनी सादर करून जणू मोहम्मद रफीच गात असल्याची जाणीव करून दिली. कार्यक्रमाची सांगता ‘सौ साल पहले’ या गाण्याने झाली. प्रत्येकाच्या मनात हा कार्यक्रम कधीही संपू नये असेच वाटत होते.
मोहम्मद रफींवर येणार चित्रपट
कार्यक्रमादरम्यान एक विशेष घोषणा करण्यात आली. मोहम्मद रफी यांच्या जीवनचरित्रावर आधारित एक चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. उमेश शुक्ला दिग्दर्शित हा चित्रपट या दिग्गज गायकाच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहे.