देदिप्यमान कारकिर्दीचा दुर्दैवी शेवट !
कुस्तीपटूंच्या निदर्शनावेळी ‘देशद्रोही’, जातीयवादी, ‘खोटा सिक्का, ‘चाचणी टाळू पाहणारी’ आणि ‘तऊण खेळाडूंना घाबरणारी’ म्हणून हिणविल्या गेलेल्या विनेश फोगाटचं ऑलिम्पिकमधील स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर संपूर्ण देशात कौतुक सुरू झालं होतं...पण लगेच या यशोगाथेचं शोकांतिकेत रुपांतर झालं ते वजनावरून अपात्र ठरविल्यानं. आजपर्यंत अनेक तडाखे सहन केलेल्या विनेशला हा धक्का किती कोलमडवून गेलाय हे तिनं गुरुवारी कुस्तीचा निरोप घेण्याच्या घेतलेल्या निर्णयातून दिसून येतं...
28 मे 2023...कुस्ती महासंघाच्या तत्कालीन प्रमुखांकडून झालेल्या कथित लैंगिक छळाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंकडून चाललेल्या निदर्शनांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिला ढकलून दिलं गेलं, मारहाणही झाली अन् जमिनीवरून फरफटत नेलं गेलं...
6 ऑगस्ट, 2024...ज्या तीव्रतेनं निषेध केला होता त्याच तडफेनं तिनं मॅटवर तुटून पडत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली आणि ती बनली ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू...
7 ऑगस्ट...खुद्द तिलाच नव्हे, तर रौप्यपदकावर समाधान मानावं लागणार की, थेट सुवर्णच खिशात घालून ती इतिहास घडविणार याची प्रतीक्षा लागून राहिलेल्या समस्त भारतीय क्रीडारसिकांना उताणा पाडणारा धक्का बसला...तिचं वजन गटाचा विचार करता अवघ्या 100 ग्रॅमनी जास्त आढळल्यानं अपात्र ठरविण्यात आलं, कसलंही पदक तिच्या वाट्याला येणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं...
केवळ मॅटपुरतं न राहता रस्त्यावरही आपला ‘फायटर’ गुण दाखविणारी, एका दिवसात शिखरावरून पाथ्याशी पोहोचलेली अन् साऱ्या देशाचा कौतुकाचा विषय बनल्यानंतर एका क्षणात घोर निराशेचा विषय बनलेली...विनेश फोगाट...महासंघाच्या विरोधात संघर्ष ते ऑलिम्पिकमधील स्वप्नवत वाटचाल अन् त्यानंतरचा स्वप्नभंग...विनेशचा हा प्रवास विलक्षण वळणांनी भरलेला...
सगळी सुरुवात झाली ती गेल्या वर्षीच्या आरंभी...लैंगिक शोषण आणि धमकावल्याचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिज भूषण यांच्या हकालपट्टीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाचे तीन प्रमुख चेहरे राहिले ते बजरंग पुनिया, साक्षी मलिक नि विनेश...18 जानेवारी, 2023 रोजी ही मंडळी इतर अनेक कुस्तीपटूंसह जंतरमंतरवर एकत्र आली. तीन दिवसांनी निषेध आवरता घेण्यात आला तो तत्कालीन क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी चौकशीसाठी निरीक्षण समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिल्यानं...
एप्रिलमध्ये विनेश आशियाई खेळ आणि जागतिक स्पर्धेसाठी सरावाकरिता स्वीडनला जाणार होती. परंतु तिनं आपल्या योजनेत बदल केला तो निरीक्षण समितीनं अहवाल सादर केल्यानंतर महासंघानं पुन्हा निवडणुका घेण्याचं ठरविल्यानं. मग सारे कुस्तीपटू परत जंतरमंतरवर दाखले झाले अन् 23 एप्रिल रोजी पुन्हा विरोधाला तोंड फुटलं...याचा पुढचा टप्पा आणखी भयानक राहिला...मे महिन्यात आपल्या मागण्या मान्य होत नसल्याचं पाहून संतापलेल्या विनेश, बजरंग, साक्षी अन् इतर कुस्तीपटूंनी उद्घाटनाच्या दिवशीच नवीन संसद भवनाकडे कूच केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर कुस्तीपटूंनी हरिद्वार गाठत चक्क आपली पदकं गंगेत टाकून दिली...
पदक मिळविण्याची संधी विनेश फोगाटला हुकण्याची ही काही पहिलीच खेप नव्हे. या आघाडीवर तिला आणखी एक धक्का सहन करावा लागला होता तो गेल्या ऑगस्टमध्ये...विनेशला खरं तर आशियाई खेळांत थेट प्रवेश देण्यात आला होता. परंतु प्रशिक्षणादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली आणि ती चीनमधील आशियाई खेळांना मुकली. त्यावेळी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अस्थायी समितीनं बजरंग (65 किलो) व विनेश (53 किलो) यांना स्पर्धेच्या चाचण्यांपासून सूट दिली होती अन् 45 दिवसांत नव्यानं निवडणुका न झाल्यामुळं ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’नं राष्ट्रीय महासंघाला निलंबित केलं होतं...
विनेश फोगाट आणि इतर कुस्तीपटूंच्या संतापाचा पुन्हा भडका उडाला तो भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून संजय सिंग यांची सरशी झाल्यानंतर. ब्रिजभूषण यांना पाठिंबा देणाऱ्या गटाच्या सदस्याने पदभार स्वीकारल्याच्या निषेधार्थ विनेश व बजरंग यांनी त्यांचे ‘खेलरत्न’ आणि ‘अर्जुन पुरस्कार’ सरकारला परत केले, तर साक्षी मलिकनं थेट निवृत्तीच जाहीर केली...परिस्थिती निवळली ती यंदाच्या फेब्रुवारीपासून, महासंघाचं तात्पुरतं निलंबन उठविण्यात आल्यानंतर. आंतरराष्ट्रीय संघटना त्याचबरोबर बजरंग, साक्षी किंवा विनेशविऊद्ध कोणतीही भेदभावयुक्त कारवाई करू नये असंही बजावण्यास विसरली नाही...मग 15 महिन्यांनंतर स्पर्धात्मक कुस्तीत विनेशनं जोरदार पुनरागमन केलं ते राष्ट्रीय स्पर्धेत 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत...
यंदा मार्चमध्ये विनेश फोगाटनं एकाच दिवशी दोन ऑलिम्पिक वजनी गटांमध्ये (50 किलो व 53 किलो) झुंज दिल्यानंतर भुवया उंचावल्याशिवाय राहिल्या नव्हत्या. आशियाई कुस्ती स्पर्धा अन् आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठीच्या निवड चाचण्यांत तिनं विजय मिळविला तो 50 किलो गटात...पुढच्या महिन्यात विनेशनं आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देऊन 50 किलो गटातून पॅरिस ऑलिम्पिकमधील आपलं स्थान निश्चित केलं. त्याचवेळी भारतीय कुस्ती महासंघानं ऑलिम्पिक चाचण्या होणार नसून ज्या कुस्तीपटूंनी स्थान पक्कं केलंय ते तेवढे पॅरिसला जाणार असल्याचं जाहीर करून टाकलं...
चालू ऑगस्ट महिना उजाडला आणि दिल्लीच्या रस्त्यावर जिला फरफटत नेण्यात आलं होतं तीच विनेश फोगाट चार वेळा जगज्जेत्या बनलेल्या जपानच्या युई सुसाकीला 3-2 अशा फरकानं हरवून पॅरिस ऑलिम्पिकमधील ‘जायंट किलर’ बनली. बलाढ्या सुसाकी ही तोवर अपराजित राहिलेली, 82-0 असा तिचा प्रतिस्पर्ध्यांच्या पोटात गोळात आणणारा आंतरराष्ट्रीय विक्रम. पण 0-2 असं पिछाडीवर पडल्यानंतर शेवटच्या 9 सेकंदांत रणनीतीचा ‘मास्टर क्लास’ सादर करत विनेश जगात प्रथम क्रमांकावर असलेल्या अन् टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेल्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर पराभूत करणारी पहिली कुस्तीपटू बनली...त्यानंतर तिनं आव्हान मोडीत काढलं ते युक्रेनच्या लिवाचचं 7-5 असं, तर उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा निर्विवाद फडशा 5-0 असा...
मग टोकियोत कांस्यपदक जिंकलेल्या पुनियाला पाठोपाठ लढती जिंकणारी विनेश फोगाट ही ‘भारताची सिंहीण’ आहे असं म्हटल्याशिवाय राहावलं नाही...अंतिम फेरीत विनेश फोगाटचा सामना होणार होता तो अमेरिकेच्या सारा अॅन हिल्डरबँडशी. रौप्य पक्कं, पण सुवर्णपदकही आवाक्यात येऊ शकतं अशी परिस्थिती असल्यानं आणि भारताची अपेक्षा असलेली बडी बडी नावं खाली हात परतल्यानं उत्सुकता ताणली गेली होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सारं मुसळ केरात गेलं ते वजन किरकोळ प्रमाणात जास्त असल्यानं. खुद्द विनेश, तिच्यासोबत काम करणारं पथक या साऱ्यांची हलकीशी चूक प्रचंड महागात पडली !
संघर्षमय वाटचाल...
- भारतातून उदयास आलेल्या सर्वोत्कृष्ट कुस्तीपटूंपैकी एक म्हणून ओळखली जाणारी विनेश फोगाट ही आमीर खानचा ‘दंगल’ चित्रपट ज्यांच्यावर बेतलाय त्या फोगाट परिवारापैकी एक...25 ऑगस्ट, 1994 रोजी जन्मलेली विनेश देखील चुलत बहिणी गीता फोगट व बबिता कुमारी यांच्या पावलावर पाऊल ठेवत कुस्तीच्या आखाड्यात दाखल झाली आणि तिला अगदी लहान वयातच या खेळाची ओळख करून दिली ती काका महावीरसिंह फोगाट यांनी... व विनेशला सुरुवातीपासून काही कमी धक्के, अडथळे सहन करावे लागलेले नाहीत...कुस्ती हा केवळ पुऊषांचा खेळ मानणाऱ्या गावकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. हे कमी म्हणून की काय, ती नऊ वर्षांची असताना वडिलांची घराच्या दाराबाहेरच गावातील मानसिक स्थिती बिघडलेल्या नातेवाईकानं गोळ्या घालून हत्या केली...
- चमकदार कनिष्ठ कारकीर्दीनंतर विनेशचा बोलबाला झाला तो 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्यानं. ते तिचं पहिलं मोठं आंतरराष्ट्रीय विजेतेपद...
- इस्तांबूलमधील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा जिंकून तिनं 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमधील स्थान पक्कं केलं होतं. मात्र उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर विनेशचं वयाच्या 21 व्या वर्षी देशासाठी पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं ते चिनी खेळाडूचा सामना करताना उजवा गुडघा दुखावल्यानं. मग रडणाऱ्या फोगाटला स्ट्रेचरवरून नेतानाचं छायाचित्र गाजल्याशिवाय राहिलं नाही...
- गुडघ्यावर शस्त्रक्रिया कराव्या लागलेल्या विनेशनं दणक्यात पुनरागमन केलं ते 2018 चे राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकं खिशात घालून...2019 च्या हंगामात घेतलेला 53 किलो वजनी गटात उडी घेण्याचा निर्णय सार्थ ठरविताना तिनं नूर-सुलतान इथं जागतिक स्पर्धेतील पहिल्या पदकाची तसंच आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली...
- 2021 साली आशियाई स्पर्धेत पहिलं सुवर्ण जिंकलेल्या विनेशनं 2022 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये धडाकेबाज सुरुवात केली होती ती स्वीडनच्या सोफिया मॅटसनवर विजय मिळवून. परंतु पुढं बेलारूसच्या कुस्तीपटूसमोर हात टेकावे लागले...पण विनेश फोगाटनं त्यातूनही सावरून बेलग्रेडमधील जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक अन् बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल खेळांत सुवर्णपदक नावावर जमा करत पुन्हा झेप घेतली...
- राजू प्रभू