युक्रेन युद्धामुळे आत्मनिर्भरतेचे महत्व अधोरेखित
संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांचे नौदलाच्या कार्यक्रमात प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युपेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे आत्मनिर्भरतेचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले आहे. आपल्या देशाच्या महत्वाच्या संरक्षणविषयक आवश्यकता स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातूनच पूर्ण करणे किती महत्वाचे आहे, हे या युद्धावरुन कळून येते. भारत सरकारचे आत्मनिर्भरतेचे धोरण सार्थ असल्याचे आता सर्वांना समजले आहे. हेच धोरण पुढे चालविणे आवश्यक असल्याचे त्यांनी भाषणात स्पष्ट केले.
भारत आपल्या संरक्षण सामग्रीसाठी मोठय़ा प्रमाणात रशियावर अवलंबून आहे. या युद्धामुळे रशियावर पाश्चिमात्य देशांनी अनेक निर्बंध घातले आहेत. भारतानेही रशियाकडून शस्त्रे विकत घेऊ नयेत, असा दबाव भारतावर आहे. शस्त्रांस्त्रांच्या विषयात भारत मोठय़ा प्रमाणात आत्मनिर्भर असता तर असा दबाव भारतावर टाकला गेला नसता. तसेच भारतही अन्य देशांवर इतक्या मोठय़ा प्रमाणात अवलंबून राहिला नसता तर त्याची संरक्षणसिद्धता अधिक बळकट असती, असे अनेक तज्ञांचेही मत आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथसिंग यांनी नौदलाच्या कार्यक्रमात मांडलेली ही भूमिका महत्वाची मानण्यात येत आहे.
नौदलाची प्रशंसा भारतीय नौदलाने स्वदेश निर्मित नौका आणि इतर सामग्रीवर भर दिला आहे. यासाठी राजनाथसिंग यांनी नौदलाची प्रशंसा केली. आयएनएस विशाखापट्टणम या नौकेचे नुकतेच जलावतरण झाले. त्यामुळे भारताच्या नौदालाचे सामर्थ्य वाढले आहे. ही नौका पी 15 बी या प्रकल्पाअंतर्गत निर्माण करण्यात आली आहे. तसेच आयएनएस वेला आणि आयएनएस हंसा, आयएनएस गोवा या पाणबुडय़ाही भारताच्या नौदालात समाविष्ट झाल्या आहेत. त्यांची बांधणीही भारतातच करण्यात आली आहे. यासाठीही राजनाथसिंग यांनी नौदलाचे कौतुक केले.