आघाड्यांतील हालहवाल
हरियाणा, महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतील भाजपच्या विजयाने विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत तसेच भाजप प्रणित रालोआमध्ये नवीन प्रकारे विचारमंथन सुरु झाले नसते तरच नवल होते. अरविंद केजरीवाल हे निवडणूक हरले नाहीत तर ती हरवली गेली आहे असे त्यांचे काही विरोधकदेखील म्हणत आहेत. भाजपने अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला धूळ चारल्याने काँग्रेसला भारी आनंद झाला आहे हे निसंशय. गैरभाजप पक्षातील केजरीवाल हा ‘सूर्याजी पिसाळ’ होता आणि गुजरात असो अथवा हरियाणा अथवा जिथे कोठे काँग्रेस विरुद्ध भाजप असा सरळ सरळ सामना असेल तिथे तिथे केजरीवाल यांनी सर्व जागा जबरदस्तीने लढवून भाजपला केवळ मदतच केली नव्हती तर काँग्रेसला हरवण्यात मोठा हातभार लावला होता. हरियाणामध्ये केवळ अर्धा टक्का जास्त मतांनी भाजप सत्तेत आल्याने जोपर्यंत आम आदमी पक्षाची ब्याद गाडली जात नाही तोवर आपला तरणोपाय नाही असेच राहुल गांधींनी मनाशी ठरवले होते असे दिसत आहे.
केजरीवाल यांना आता पुढील वाटचाल खडतर आहे. त्यांचे पंजाबमधील सरकार आता कितपत टिकेल याविषयी सगळीकडेच साशंकता आहे. त्यांचे 30 आमदार आपल्या संपर्कात आहेत असा काँग्रेसचा दावा आहे तर तेथील मुख्यमंत्री भगवंत मान आणि केजरीवाल यांच्यात वितुष्ट आणायच्या कामी भाजप लागली आहे. पंजाबमध्ये मध्यावधी निवडणुका अटळ आहेत असे केजरीवाल विरोधक म्हणत आहेत. भाजपलादेखील केजरीवाल यांची लुडबुड आवडत नाही आहे. केजरीवाल यांची जागा आता तुरुंगात आहे असे भाजपाई म्हणत आहेत. त्यांच्या सरकारचे कथितपणे वाभाडे काढणारा महालेखापालाचा अहवाल विधानसभेत लवकरच सादर करून केजरीवाल यांना जेरीला आणण्याचा एक कलमी कार्यक्रम भाजप सुरु करणार आहे. अशावेळी पंजाबमधून कसेतरी करून राज्यसभेवर येत राष्ट्रीय राजकारणात स्वत:चे स्थान राखण्यासाठी केजरीवाल कामाला लागले आहेत असे त्यांचे विरोधक सांगत आहेत. सध्या राज्यसभेतील कोणतीच जागा खाली नसल्यानं आपच्या एखाद्या सदस्याला राजीनामा द्यायला ते लावतील असे बोलले जाते.
आदित्य ठाकरे यांनी दिल्ली भेटीत राहुल गांधी यांच्याबरोबर केलेली चर्चा इंडिया आघाडीत परत सामंजस्य आणण्यासाठी होती असे दिसत आहे. इंडिया आघाडीत कोणा एका नेत्याचे नेतृत्व नसून ती संयुक्त नेतृत्वाखाली चालत आहे असे ठणकावून सांगत ठाकरे यांनी काँग्रेसविरोधात सुरु झालेली कोल्हेकुई बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर घटक पक्ष भांडले तर भाजपच्या बोक्याला सत्तेचा लोण्याचा गोळा मिळेल असे सांगण्याचा हा प्रयत्न होता. दिल्लीतील केजरीवाल यांच्या पराभवानंतर देखील बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पुढील वर्षीच्या राज्यातील निवडणूका स्व-बळावर लढणार आहे अशी घोषणा करून काँग्रेसला डिवचण्याचे काम केलेले आहे. बंगालमधील मुस्लिम समाज 30 टक्के आहे, त्यांच्यावर दीदींची मदार आहे. पंधरा टक्के हिंदू समाजाची मते मिळवून एकंदर 45 टक्के मतात राज्यात सत्तेत यायचे त्यांचे धोरण आहे. मुख्यमंत्री म्हणून दीदींनी हॅट्ट्रिक केलेली आहे. राज्यातील राजकारण तृणमूल विरुद्ध भाजप असे विभागून काँग्रेस आणि डाव्या पक्षांना देशोधडीला लावण्याचा त्यांचा छुपा कार्यक्रम लपून राहिलेला नाही. दिल्लीप्रमाणे बंगालमध्ये देखील राहुल यावेळी जोर लावणार असे सध्यातरी दिसत आहे. उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला दणदणीत विजय समाजवादी पक्ष आणि त्यांचे नेते अखिलेश यादव यांना पंक्चर करून गेला आहे. त्याने देखील काँग्रेस खुश झालेले आहे. अखिलेश यांच्याकडून भरपूर जागा मिळवून काँग्रेसने 2027 मधील विधानसभा निवडणूक लढली पाहिजे असे मत पक्षात वाढत आहे. समाजवादी पक्षाची झालेली फटफजिती तिला जमिनीवर आणेल अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये यावेळी सर्वच्या सर्व 182 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प दिसत आहे. गुजरातमधील काँग्रेस ही भाजपने पोखरून काढलेली आहे. एकेकाळचे हार्दिक पटेल यांच्यासारखे काँग्रेसमधील लढवय्ये नेते भाजपच्या कळपात गेल्यावर निपचित पडलेले दिसत आहेत.
दिल्लीतील विजयाने वर्षअखेर होणाऱ्या बिहारमधील विधानसभा निवडणूका आपल्याला सोप्या जातील असा भाजपचा कयास आहे. पण सारे गणित सोपे नाही. नितीश कुमार हे राजकारणातून निवृत्त झाल्याशिवाय राज्यात आपल्याकडे नेतृत्व येऊ शकत नाही हेदेखील त्याला चांगले माहित आहे. उच्च जाती आणि मध्यमवर्ग ही भाजपची मतपेढी आहे त्याला नितीश अजिबात आवडत नाहीत पण त्यांच्याशिवाय सत्ताच मिळत नसल्याने त्यांना बरोबर घेणे ही भाजपची मजबुरी आहे. नितीश निवृत्त झाल्यावरच बिहारच्या राजकारणात नवी मांडणी होऊ शकते. कधीकाळी नितीशच्या संयुक्त जनता दलातील नंबर दोनचे नेते राहिलेले निवडणूक तज्ञ प्रशांत किशोर हे बिहारमध्ये जोरदार सरकारविरोधी भावना असल्याने नितीश परत जिंकणे केवळ अशक्य आहे असा दावा करत आहेत. चिराग पासवान यांचा देखील मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. पण सध्या ते शांत आहेत. परिस्थिती कशी बनते आहे त्यावर लक्ष ठेवून आहेत. एक आसाम सोडले तर पुढील दोन वर्षात होणाऱ्या अर्धा डझन राज्यातील निवडणूकात काँग्रेसचा फारसा स्टेक नाही. अशावेळी राहुल गांधींना पक्षाची केवळ डागडुजीच नव्हे तर पुनर्बांधणी करण्याची सुवर्णसंधी आहे. 2027च्या सुरुवातीलाच उत्तरप्रदेशच्या निवडणूका आहेत तर अगदी शेवटाला गुजरातमधील.
तोवरचा वेळ काँग्रेस कितपत कारणी लावणार अथवा नाही त्यावर पुढील लोकसभा निवडणुकीत काय चित्र राहील ते दिसणार आहे. इंडिया आघाडीतील गैरकाँग्रेसी घटकपक्ष काँग्रेसची सध्या जी संभावना करत आहेत त्याचा अर्थ राहुलना जास्तीतजास्त कॉर्नर करून आपल्या पोळीवर तूप त्यांना ओढायचे आहे.ाsढजरीवाल यांना दिल्लीत हरवण्यास मदत करून काँग्रेसने त्यांना देखील एक इशारा दिलेला आहे. केरळमधील निवडणुकीत काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडीला यावेळी सत्तेत येण्याची संधी दिसत आहे.
भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचाच शब्द शेवटचा मानला जात असला तरी गेला एक आठवडा पुढील मुख्यमंत्री कोण असावा यावर चालू असलेली रस्सीखेच काही वेगळेच दर्शवते. सर्वांना घेऊन जाणारा मुख्यमंत्री बनवला नाही तर दिल्लीत वेगळेच रणकंदन माजेल अशी भीती व्यक्त होत आहे. वैश्य समाज, पूर्वांचली समाज (उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले लोक), पंजाबी समाज जो निर्वासित म्हणून पाकिस्तानातून आला आणि जनसंघाच्या दिवसापासून पक्षाबरोबर राहिला, शीख समाज आणि दिल्लीच्या ग्रामीण भागात बहुसंख्य असलेला जाट समाज अशा वेगवेगळ्या समाजांत मुख्यमंत्रीपदाची लालसा आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तळागाळात केलेल्या कामामुळे त्याचे मत देखील भाजपाला आजमावे लागणार आहे. दिल्लीमध्ये साहेब सिंग वर्मा यांच्यासारखा भांडकुदळ मुख्यमंत्री दिल्यामुळे तिला गेली 26 वर्षे सत्तेबाहेर राहायला लागले होते हा ताजा इतिहास आहे. राजस्थान आणि हरियाणामध्ये मोदींच्या मर्जीतील मुख्यमंत्री देऊन भाजपने कशी बाजी मारली असे सांगितले जात असले तरी या दोन राज्यात अनुक्रमे किरोरीलाल मीना आणि अनिल विज या ज्येष्ठ मंत्र्यांनी जणू बंडच पुकारले आहे. त्यांना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि नायब सिंग सैनी यांचा कारभार अजिबात पसंत नाही. विज यांनी त्यांना पक्षाने दिलेल्या ‘कारणे द्या’ नोटिशीला खरमरीत उत्तर पाठवून आगीत तेलच ओतले आहे. त्यांच्यामागे भाजपचे 15 आमदार आहेत असा दावा केला जात आहे. महाराष्ट्रात भाजप सत्तेत येऊन तीन महिने झाले तरी लोकांची आश्वासने पूर्ण करण्यासाठी त्याने भरीव पाऊले उचलली नाहीत असा विरोधकांचा दावा आहे.
महाकुंभाचा प्रचार भाजपची मत पेढी वाढवण्यासाठी जोरदारपणे होत असताना तेथील चेंगराचेंगरीच्या घटनात हजारो भाविकांना मरण आले आणि त्यावर उत्तर प्रदेशमधील योगी सरकार लपवाछपवी करत आहे असे छातीठोकपणे दावे/आरोप विरोधक करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या पहिल्या दौऱ्यावरून परतल्यावर देशाला काय मिळाले अथवा नाही यावर नवीन राजकारण सुरु होणार आहे.
सुनील गाताडे