सहा महिन्यांनंतर सत्य बाहेर पडेल!
ईडी छापा प्रकरणी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. वाय. डी. मंजुनाथ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई राजकीय प्रेरित आहे, असे सध्या तरी म्हणता येणार नाही. यातील सत्य बाहेर पडायला सहा महिने जावे लागणार आहेत. त्यानंतरच खरी माहिती बाहेर पडणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. वाय. डी. मंजुनाथ यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे, ही गोष्ट खरी आहे. ते आमचे नातेवाईक आहेत. भ्रष्टाचार प्रकरणात अबकारी खात्याच्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्यावर ईडीने प्रथमच कारवाई केली आहे. या घडामोडींमुळे आपणही चिंतित झालो आहोत. यापूर्वी त्यांच्यावर एक प्रकरण दाखल झाले होते. उच्च न्यायालयाने ते रद्द केले आहे.
अधिकारी कोणती माहिती मिळवत आहेत? याची माहिती करून घ्यावी लागणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून त्यांचे कुटुंबीय दारू दुकान व्यवसायात आहेत. ही चौकशी केवळ एका खात्यापुरती सिमित नाही. इथेच संपत नाही, असे सांगत निवडणुका जवळ आल्या तर असे प्रकार साहजिकच घडतात. राजकीयदृष्ट्या आपल्याला जखडून ठेवण्यासाठी ही कारवाई केली आहे का? हे सध्या स्पष्ट होत नाही. यासाठी सहा महिने जावे लागणार आहेत, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या नियुक्तीसाठी विलंब का होतो आहे? याची माहिती देताना सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, अधिकृतपणे पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली नाही. मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाला आहे. त्यामुळेच सध्या आपल्यावर तात्पुरती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद हुकण्यासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच कारणीभूत आहेत, अशी चर्चा सुरू आहे. याला उत्तर देताना यासाठी सिद्धरामय्या कारणीभूत नाहीत. अनेक वेळा आपण हे स्पष्ट केले आहे. ‘एक व्यक्ती एक पद“ या नियमामुळे हा निर्णय झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष बदलण्यासंबंधी हायकमांडच्या पातळीवर चर्चा झाली होती. प्रदेशाध्यक्षपद आपल्याला देण्यासंबंधीची मागणी झाली होती. पक्षाच्या नियमानुसार एकच पदावर रहावे लागणार म्हणून आपण मंत्रिपदावर राहणे पसंत केले. प्रदेशाध्यक्ष पदाच्या रेसमधून बाहेर पडलो, असेही सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.