बाटलीत दडलेले सत्य
आपण वास्तव्य करतो त्या पृथ्वीच्या पोटात अनेक रहस्ये दडलेली आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे. भूमीचे खोदकाम करताना कित्येकदा अशा गूढ वस्तू हाती लागतात की आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. ही रहस्ये उकलल्यानंतर आपल्या ज्ञानात मोलाची भर पडते. तसेच आपला वारसा काय आहे, याचेही दर्शन होते.
युरोपातील नॉर्वे या देशात उत्खनन होत असताना संशोधकांच्या हाती एक काचेची बाटली लागली. या बाटलीत एक कागद असल्याचे दिसत होते. त्यामुळे संशोधकांनी अत्यंत दक्षतापूर्वक ती बाटली उघडली आणि कागद बाहेर काढला. या कागदावर जे लिहिले होते आणि बाटलीत जी वस्तू लपविलेली होती, ती पाहून संशोधकांच्या आश्चर्याला आणि आनंदालासुद्धा पारावार उरला नाही. एक मोठा ऐतिहासिक ठेवा आपल्या हाती आला आहे, अशी त्यांची भावना झाली होती.
संशोधन करता असे आढळून आले ती ही बाटली 150 वर्षे जुनी आहे. पूर्वीच्या काळातील व्हायकिंग नामक समाजातील एका व्यक्तीला पुरलेल्या जागी ही बाटली सापडली होती. व्हायकिंग समाजातील लोक 11 व्या शतकापर्यंत समुद्री चाचेगिरी, व्यापार, गुन्हेगारी आणि संशोधनकार्यही करत असत. ही बाटली 1874 मध्ये पुरातत्व संशोधक अँडर्स लोरांज याने पुरलेली होती. या बाटलीत सापडलेल्या कागदावर एक संदेश लिहिला असून आत काही जुनी नाणी सापडली आहेत, या जुन्या नाण्यांवर संशोधन होत असून ती कोणत्या काळातील आहेत आणि त्या काळातील मानवी जीवन कसे होते, हे आता या बाटलीत सापडलेल्या ऐतिहासीक नाण्यांवरुन स्पष्ट होऊ शकेल, अशी आशा संशोधकाना वाटत आहे. या बाटलीच्या शोधकार्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर लोकप्रिय होत आहे. अनेक लोकांनी या नाण्यासंबंधी त्यांची मते आणि प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.