संमेलनाची तुतारी
साहित्य संमेलनाच्या जन्मभूमीतच शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा योग जुळून यावा, हे यथोचितच म्हणायला हवे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात येत्या 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान हा सोहळा रंगणार असून, सर्वार्थाने हे संमेलन ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत.
साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेचा सांस्कृतिक उत्सव. 1878 मध्ये सांस्कृतिकनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातच संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हापासून म्हणजेच गेल्या दहा दशकांपासून ही समृद्ध परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. प्रारंभीच्या काळात ‘ग्रंथकारांचे संमेलन’ म्हणूनच या साहित्योत्सवाचा उल्लेख केला जायचा. न्यायमूर्ती म. गो. रानडे हे पहिले संमेलनाध्यक्ष. सुरुवातीच्या टप्प्यात या संमेलनाच्या म्हणून काही मर्यादा होत्या. त्यातूनच महात्मा फुले यांनी ‘घालमोड्या दादांचे संमेलन’ म्हणूनच या सोहळ्याची संभावना केली. त्यानंतर संमेलनाचे रूप हळूहळू बदलत गेले. बेळगावच्या संमेलनात झालेला संयुक्त महाराष्ट्राचा उद्घोष, कराडच्या संमेलनात दुर्गाबाई भागवत यांनी आणीबाणीविरोधात घेतलेली भूमिका, चिपळूणच्या संमेलनामध्ये ‘संमेलनाने आणखी सर्वसमावेश व्हावे’, असा डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिलेला सल्ला, बडोदा साहित्य संमेलनात ‘राजा तू चुकलास’, हे म्हणण्याचे डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी दाखवलेले धारिष्ट्या, असे संमेलनाचे अनेक महत्त्वाचे टप्पे सांगता येतील. वास्तविक, साहित्य हा संमेलनाचा मुख्य गाभा. परंतु, मागच्या काही वर्षांत साहित्य शारदेच्या दरबाराचे झालेले इव्हेंटीकरणही चिंताजनकच म्हणता येईल. संमेलनात राजकारण तर शिरलेच. शिवाय रंगारंग कार्यक्रम, जेवणावळी व कोटीच्या कोटी उ•ाणांमध्ये संमेलन फिरत राहिल्याचे दिसून येते. स्वाभाविकच या साऱ्या असाहित्यकारणाला फाटा मिळून शंभरावे संमेलन तरी आशयाच्या दृष्टीने नव्या उंचीचे ठरणार का, याबाबत उत्सुकता असेल. सध्या पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे साहित्य महामंडळ आहे. नव्यानेच परिषदेची कार्यकारिणी निवडून आली असून, योगेश सोमण यांच्याकडे महामंडळाचे अध्यक्षपद आहे. तर यजमानपद समर्थ युवा फाऊंडेशनकडे आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे हे संस्थेचे मुख्य संयोजक आहेत. पांडे यांच्याकडे ‘पुणे बुक फेस्टिव्हल’चा मोठा अनुभव आहे. स्वाभाविकच या संमेलनाची धुरा प्रामुख्याने त्यांच्याकडेच असेल. त्यामुळे संमेलन भव्यदिव्य व अभूतपूर्व होणार, हे वेगळे सांगायला नको. तथापि, विशिष्ट पक्षाचे संमेलन म्हणून शंभराव्या साहित्योत्सवावर शिक्का बसू नये, याची दक्षता संबंधितांना अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी लागेल. दुर्देवाने तसे झाले, तर संमेलन सादरीकरणाच्या पातळीवर मोठे होईलही; पण त्याची साहित्यिक उंची कमी होण्याचा धोका अधिक संभवतो. हीच राजकीय बाजू लक्षात घेऊन संमेलनाच्या परावलंबित्वावर आपल्याकडे नेहमी चर्चा होते. संमेलन शासनाच्या मदतीवर अवलंबून राहू नये, याकरिता कधी काळी महाकोषही तयार करण्यात आला होता. तथापि, त्यात 27 वर्षांत केवळ अडीच कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे अंतिमत: संमेलनाला राजकारण्यांवरच निर्भर रहावे लागत असल्याचे दिसते. हे बघता संमेलन कधी स्वयंपूर्ण होईल का, हा प्रश्न कायम आहे. राज्यात आत्तापर्यंत 48 ठिकाणी साहित्य संमेलने झाली आहेत. या ठिकाणांसह विविध भागांमध्ये ‘नांदी शंभराव्या साहित्य संमेलनाची’ या नावाने छोटेखानी संमेलने भरवण्यात येणार आहेत. या माध्यमातून वातावरणनिर्मिती करण्याचा संयोजकांचा प्रयत्न असेल. परंतु, या संमेलनांमध्ये केवळ इव्हेंटबाजी न होता साहित्य कसे केंद्रस्थानी राहील, यासाठी प्रयत्न हवेत. वास्तविक, साहित्य हाही समाजमनाचा आरसा होय. समाजाच्या वेदनांचे जसे साहित्यात दर्शन घडते, तसे संमेलनातही समाजातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा अभिप्रेत आहे. त्या अर्थी शंभराव्या संमेलनात नवी तुतारी फुंकली जावी आणि संमेलन समाज व साहित्यकेंद्रित व्हावे, हीच अपेक्षा.