For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापुरचे 'खरे उत्तर' गल्ली बोळात आहे..

03:35 PM Nov 06, 2024 IST | Radhika Patil
कोल्हापुरचे  खरे उत्तर  गल्ली बोळात आहे
The true answer of Kolhapur is in the alleys.
Advertisement

कोल्हापूर / सुधाकर काशीद : 
कोल्हापूरचे उत्तर कोण हा प्रश्न आता सार्वत्रिक झाला आहे . कोल्हापूरचे उत्तर कोणाच्या मते ठअठ कोणाच्या मते ठबठ कोणाच्या मते ठक ठतर कोणाच्या मते ‘ड ‘ अशी मोठीच्या मोठी यादीच ज्याच्या त्याच्या मनाने तयार केली गेली आहे. या अ ब क ड शिवाय अन्य कोणतेही कोल्हापूरचे उत्तर नाही अशी समजूत ठसवली जात आहे . पण ती समजूत खरोखर अतिशय वरवरची आहे .अनेकांना असे वाटते की, कोल्हापूरचा मुख्य प्रश्न म्हणजे कोल्हापूरचा उमेदवार कोण हाच आहे . पण इथल्या घराघरातला मूळ प्रश्न अतिशय गंभीर आहे . आणि तो कोल्हापूरच्या पेठापेठात, गल्लीबोळात जाऊन भिडलेला आहे . हा प्रश्न दुसरा तिसरा कोणता नसून हा प्रश्न इथल्या तरुणांच्या रोजगाराचा आणि आयुष्याचा आहे .

Advertisement

अनेक तरुणांच्या आयुष्याचा आहे . पण या प्रश्नाचे ठोस उत्तर सांगण्याऐवजी तरुणांची ही पिढी आपल्या मागे झुंडीच्या झुंडीने कशी फिरत राहील यासाठी एक यंत्रणा अतिशय पद्धतशीरपणे राबवली जात आहे .जी तरुणांच्या आयुष्याला दिशा नव्हे तर, नको ते फाटे फोडायला लावणारी ठरणार आहे .

कोल्हापुरातील सामाजिक आर्थिक स्तर एका वर्गाचा चांगला आहे . पण त्याचवेळी दुसरा वर्ग ज्यात निम्म्याहून अधिक आर्थिक स्तर मिळवायचे व खायचे या प्रकारचा . आहे . हा स्तर उपाशी आहे का? तर नाही असेच उत्तर आहे . पण आहे त्या रहाट गाडग्यात अडकून पडला आहे . तरुणांची पिढीच्या पिढी रोजगाराच्या शोधात आहे . स्पर्धा परीक्षा द्या. उच्च शिक्षण घ्या असे म्हणायला ठीक आहे . पण वास्तवातले जगणे खूप वेगळे आहेत . धड गरीब नाही, धड श्रीमंत नाही अशा परिस्थितीत निम्म्याहून अधिक असलेल्या कोल्हापुरातील तरुण या विचित्र अवस्थेतून प्रवास करत आहेत . आणि त्याचे पडसाद कोल्हापुरातील घराघरात उमटले आहेत . एका विशिष्ट टप्प्यावर शिक्षण घेऊन हे तरुण थांबले आहेत . उच्च शिक्षणाची फी, देणगीचा आकडा त्यांच्या अंगावरचे केस उभे करणारा आहे . एमपीएससी करायला गेलेले चार पाच प्रयत्न करून आता नकारात्मक मनस्थितीला येऊन पोहोचले आहेत. सरकारी नोकरी हजारात एकाला लागते अशी परिस्थिती आहे. खाजगी नोक्रयांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी आहे . नवा उद्योग करायचा म्हटला तर भांडवलाची चिंता आहे .

Advertisement

आणि याचे पडसाद तरुणांच्या मानसिकतेवर उमटत आहे .नोकरी नाही . आहे ती खाजगी नोकरी समाधानकारक नाही .असे असंख्य युवक गल्ली गल्लीच्या कोप्रयावर उभे असल्याचे चित्र दिसत आहे .घरात बसले की काहीतरी करा म्हणून आई-बाबांची बोलणी . त्यामुळे बाहेरच वेळ काढण्यावर तरुणांचा भर आहे . आणि नेमकी ही संधी काही जणांनी आपल्या मागं ही पोरं फिरावीत यासाठी घेतली आहे. या तरुणांना कोणी भावनिक आकर्षित केले आहे . कोणी जाती-धर्माचे खुळ त्यांच्या डोक्यात घातले आहे .काहीनी रोज खायला प्यायला घालून सहलीला नेऊन त्या तरुणांना चैनीखोर बनवले आहे. त्या पोरांच्या मनस्थितीचा अंदाज घेऊन त्यांना काय लागते? तर डीजेवर नाचायला आवडते . म्हणून लहान मोठे काहीही निमित्त असू दे . कोणाचाही वाढदिवस असुदे चौकात डीजे लावायचा . पोरांना नाचवत ठेवायचे हा फंडा काहींनी अवलंबला आहे. या पोरांना मोठी वर्गणी देऊन लहान मोठ्या जयंती, उत्सव, यात्रा, जत्रा करण्यात गुंतवले आहे .ही पोरं सकाळ झाली की आपल्या दारात कशी येतील याची सवयच काहींनी जाणीवपूर्वक लावून ठेवली आहे .नोकरी, रोजगाराची चिंता या पोरांना नाही का? बहुतेकांना नक्कीच आहे. या चिंतेने पोरं पोखरली आहेत .पण ही चिंता विसरायसाठी कंपुत मिसळून टाइमपास करण्यावर त्यांचा भर आहे . अक्षरश? चौकात बसून कट्ट्यावर बसून, नेत्यांच्या व्हरांड्यात ठेवलेल्या त्या काळवंडलेल्या प्लॅस्टिक खुर्च्यावर बसून बसून त्यांच्या पॅंटी ढिल्या झाल्या आहेत. पॅंटी ढिल्या हा शब्द त्या पोरांनी शोधलेला आहे.

या पोरांचे वय तारुण्याचे आहे. लग्नाची हुरहुर आहे. लग्नाची ओढ आहे .पण नोकरी नाही रोजगार नाही .काहीजण छोटे मोठे रोजगार करतात. पण असा रोजगार करण्राया मुलग्याला मुली पसंत करत नाहीत. त्यामुळे खूप नैराश्याची भावना या तरुण पिढीवर पसरली आहे .त्याचे पडसाद त्यांच्या वागण्या बोलण्यावर पडले आहेत . आई-वडिलांची तळमळ त्यांना समजते . पण कळते पण वळत नाही अशा विचित्र मानसिक अवस्थेत ती पोर आहेत . घराघरात त्यामुळे एकमेकांवर चिडाचीड आणि कचकच सुरू आहे . आणि आता तर विधानसभा निवडणुकी त अशा पोरांचा वापर तुफान चालू आहे . घोषणा द्यायला हीच पोर पुढे. रॅली सायलेन्सर काढून गाड्या ताणवायला हीच पोर पुढे.कुठे राडा झाला तर धुडगूस घालायला हीच पोर पुढे. उमेदवार निवडून आला तर दहा दिवस घासून घासून आंघोळ केली तरी गुलालाचा मळ अंगावर मिळवत फिरायला हीच पोरं पुढे असणार आहेत.

या पोरांच्या प्रश्नाचे उत्तर काय हेच प्रत्येक उमेदवाराला विचारायचे नव्हे तर, या प्रश्नाचे उत्तर उमेदवारांनी ठामपणे आता देण्याची गरज आहे . कुटुंबांना स्थिर करणे ही नेत्यांची जबाबदारी आहे . आणि कोल्हापूरचं या क्षणीच उत्तर या पोरांच्यासाठी नेमके कोण काय करणार या प्रश्नातच आहे.

Advertisement
Tags :

.