सिमॉन बाईल्सचे विजयी पुनरागमन
अमेरिकेला महिला जिम्नॅस्टिक्सच्या सांघिक गटात सुवर्ण
वृत्तसंस्था/ पॅरिस
सिमॉन बाईल्सने पॅरिस गेम्समध्ये महिला जिम्नॅस्टिक्स संघांच्या अंतिम फेरीत विजयी पुनरागमन करताना तिचे पाचवे ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आणि जगातील महान खेळाडूंपैकी एक म्हणून आपले स्थान आणखी मजबूत केले. टोकियो ऑलिम्पिकमधील त्याच प्रकारातून तिने माघार घेतली होती. त्यानंतर तीन वर्षांनी तिने हे यश मिळविले.
सर्वकालीन सर्वांत चमकदार जिम्नॅस्ट असलेल्या बाईल्सने महिलांच्या सांघिक स्पर्धेत सर्व चार उपकरणांवर चमकदार कामगिरी करून अमेरिकेला चौथे ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले. तिने पॅरिस गेम्सचे ‘रिडेम्प्शन टूर’ म्हणून वर्णन केले होते. बाईल्सने टोकियोमधील सांघिक गटाच्या अंतिम फेरीतून अचानक माघार घेऊन सर्वांना धक्का दिला हाता.
‘मी सकाळी थेरपीने सुऊवात केली आणि मला शांत आणि सुसज्ज वाटत होते’, असे 27 वर्षीय बाईल्सने बर्सी एरिना येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मी व्हॉल्टवर उतरताच मला आम्ही हे साध्य नक्कीच करणार आहोत असे वाटले, असेही ती म्हणाले. अंतिम फेरीसाठी पात्र ठरू न शकलेल्या फ्रेंच संघाच्या अनुपस्थितीत बाईल्स आणि तिच्या सहकाऱ्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. अमेरिकेने एकूण 171.296 गुणांची नोंद केली आणि ते दुसऱ्या स्थानावर असलेल्या इटलीपेक्षा 5.802 गुणांनी पुढे राहिले.
1928 च्या ऑलिम्पिकनंतर इटालियन जिम्नॅस्टनी त्यांचे पहिले महिला ऑलिम्पिक सांघिक पदक जिंकले, तर रेबेका आंद्रादच्या अविश्वसनीय व्हॉल्टने ब्राझीलला कांस्यपदक मिळविण्यास मदत केली. हे त्यांचे पहिले पदक आहे. ब्रिटन चौथ्या स्थानावर राहिले.