आदिवासींचा जगण्यासाठी संघर्ष सुरूच !
मंडणगड / विजय जोशी :
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात भारत देश जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असताना तालुक्यातील आदिवासी समाजबांधव मात्र जगण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. त्यांचे अर्थकारण आजही जंगल, वनआधारित क्रिया व मासेमारीवर अवलंबून आहे. प्रशासकीय पातळीवर या समाज घटकाकडे दुर्लक्ष झाल्याने स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही विकासाच्या योजना स्थानिक भूमिपूत्र असलेल्या समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेल्या नाहीत असेच या समाजाच्या सद्यस्थितीवरून म्हणावे लागेल.
- शिक्षणासह इतर सुविधा असल्या तरीही..
जंगल व रानावनात फिरणाऱ्या या समाजास शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी तालुक्यात वेरळ व कादवण येथे राज्य शासनाच्या दोन आदिवासी आश्रमशाळा सुरू आहेत. केंद्र शासनाच्या अहवालानुसार तालुक्यात आदिवासींचा टक्का अधिक आढळल्याने उच्च शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी केवळ आदिवासी समाजाच्या जास्तीच्या प्रमाणामुळेच युजीसीने रोजगाराभिमुख शिक्षण देणारे महाविद्यालय तालुक्यात सुरू केले आहे. राज्यशासनाच्या आदिवासी कल्याण विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात घरे देण्यात आल्याने तालुक्यातील पणदेरी घोसाळे, दुधेरे, तिडे, चिंचाळी, पालवणी, बामणधर, वेसवी, अडखळ, भिंगळोली, शिरगाव इत्यादी गावात आदिवासी समाजाची घरे व वाड्या उभ्या राहिल्या आहेत.

- पोटासाठी रानोमाळी वणवण
आदिवासी बांधवांच्या बहुतांश आर्थिक गरजा जंगल व निसर्गावर अवलंबून आहेत. त्यामुळे हा समाज पोटाच्या मागे नेहमीच फिरत राहिला आहे. तालुक्यातील किटा व्यावसायाकरिता झाडे तोडण्यासाठी रायगड जिल्ह्यातील आदिवासी तरुण तालुक्यात मोठ्या प्रमाणात दाखल होतो. आंबा काजूच्या हंगामात बागांची राखण करणे, खैर तोड करणे, शेतीच्या हंगामात शेतमजूर म्हणून काम करणे व जंगलावर आधारित वस्तू गोळा करुन त्या विकणे यामध्ये स्थानिक आदिवासी समाजातील बहुतांश कर्ता वर्ग गुंतलेला दिसून येतो. तालुक्यातील सावित्री व भारजा या दोन नद्यांच्या किनाऱ्यालगतच्या गावात हाताने मासेमारी करणे, खेकडे पकडणे यावर अनेक गावातील समाजबांधव मोठ्या प्रमाणावर गुजराण करताना दिसून येतो. प्रामुख्याने कुंबळे व म्हाप्रळ या गावात पुरुषांनी पकडलेले मासे व खेकडे विकताना आदिवासी समाजाच्या महिला दिसून येतात. याचबरोबर भिंगळोली व मंडणगड या ठिकाणी काजू, आंबे, कोकम, जांभळे यांची विक्री करतानाही या समाजातील महिला मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.
- शिक्षणाचे महत्व वाढले पण..
कालानुरुप या आदिवासी समाजातही शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी मिळणाऱ्या आरक्षणाचा लाभघेऊन शासकीय सेवेत जाणाऱ्यांचे प्रमाण आजही अत्यल्प आहे. विविध योजना, आरक्षण उपलब्ध असतानाही लक्षणीय संख्येने असलेला हा समाज आज तालुक्यात पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करताना दिसून येतो. आरक्षणामुळे राजकीय प्रतिनिधित्व व सत्तेची पदे मिळूनही आदिवासी समाज मात्र प्राथमिक म्हणाव्यात अशा गरजांसाठी चाचपडत असल्याचा दिसून येतो. हा समाज विकासाच्या मूळ प्रक्रियेत न येण्यास नेमके कोण कारणीभूत आहे. याबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ सर्वांवरच आली आहे. अपवाद म्हणून या समाजातील ती व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेली तरुणांनी सामूहिक शेती केली असली तरी नाही.
- सावित्री, भारजा नद्या 'लाईफलाईन'
सावित्री व भारजा या दोन्ही नद्या या समाजाच्या एका अर्थाने लाईफलाईन आहेत असे म्हणावे लागेल. येथे नदी किनाऱ्यावर हाताने मासेमारी करणे हा अनेकांचा मुख्य व्यवसाय आहे. म्हाप्रळ व कुंबळे येथे आजूबाजूच्या गावातील आदिवासी वाड्यातील महिला किरवे (खेकडे) विकण्यासाठी बसलेल्या दिसून येतात. सावित्री नदीत झालेल्या प्रदूषणामुळे आता मोठ्या प्रमाणावर मासेमारी शक्य नाही. त्यामुळे दिवसभर कष्ट करून मिळालेल्या तुटपुंजा उत्पन्नातून कुटुंबाची गुजराण करणे कठीण बनले आहे.