झाड पिंपळाचे...फूल गुलाबाचे
एकाच आंब्याच्या झाडाला विविध प्रकारचे आंबे लागणे, ही बाब सर्वसामान्य झालेली आहे. अशी व्यवस्था कृत्रिमरित्या करता येते. एका मोठ्या आंब्याच्या झाडाच्या फांद्यांना वेगवेगळ्या जातींच्या आंब्यांचे कलम केले, की अशा प्रकारे एकाच झाडाला वेगवेगळ्या प्रकारचे आंबे लागू शकतात. असे प्रयोग भारतभर अनेकांनी केले आहेत. तथापि, पिंपळाच्या झाडावर गुलाबसदृश फुले येणे, ही बाब अद्भूत म्हणावी लागेल. असा प्रकार गेल्या शुक्रवारी रात्री मुझफ्प्फरपूर जिल्ह्यातील तुर्की-सरैया पथावरील छाजन येथे घडल्याचे दिसून आले आहे.
या गावातील एका जुन्या पिंपळाच्या झाडावर अचानकपणे गुलाबाची वाटावीत, अशी दिसणारे अनेक फुले उमलली आहेत. या गावातील काही जणांनी शुक्रवारी रात्री हे दृष्य पाहिले आणि ते आश्चर्यचकित झाले. वणव्याप्रमाणे या घटनेची माहिती गावात पसरली. आजूबाजूच्या गावांमध्येही ही घटना समजल्यामुळे हे पिंपळाचे झाड पाहण्यासाठी सहस्रावधी लोकांची गर्दी झाली. पिंपळाच्या झाडाला गुलाबासारखी फुले येणे ही घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. त्यामुळे आम्हीही कोड्यात पडलो आहोत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा काहीतरी अशुभ संकेत असावा काय, अशीही शंका अनेकांच्या मनात डोकावून गेली आहे.
स्थानिक प्रशासनानेही या घटनेची नोंद घेऊन कारणे शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही संशोधकांच्या मते या पिंपळाच्या बुंध्यावर विशिष्ट प्रकारच्या फुलांच्या बिया वाऱ्यासमवेत येऊन चिकटल्या असाव्यात आणि त्या तेथेच रुजून ही फुले उगविली असावीत. तथापि, इतकी फुले अशा प्रकारे उगवतील, यावर स्थानिकांचा विश्वास नाही. त्यामुळे कारणे शोधण्याचा प्रयत्न होत आहे.