For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सकाम कर्मांचा सापळा

06:43 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
सकाम कर्मांचा सापळा
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

आपल्या हिताचे कोण काही सांगत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे हा मनुष्य स्वभावच आहे. त्यात पुन्हा मुद्दाम दिशाभूल करणारे कुणी भेटलाच तर प्रश्नच मिटला. वेदांच्या बाबतीत माणसाचे असेच झाले आहे. त्यातील सकाम अनुष्ठानांचा म्हणजे, त्यातील कर्मांच्या आचरणामुळे फळाच्या स्वरूपात भोगविषय प्राप्त करायचा भागच प्रामुख्याने चर्चिला जातो. त्यामुळे सकाम कर्मकांडांना प्राधान्य मिळत गेलं. भगवद्गीतेत सुद्धा अशा पद्धतीने दिशाभूल करणाऱ्या मंडळींचा दुसऱ्या अध्यायात उल्लेख आलेला आहे तो असा,

अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया ।

Advertisement

वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे ।। 2.42 ।।

जन्मूनिया करा कर्मे मिळवा भोग-वैभव । भोगा कर्म-फळे गोड सांगती स्वर्ग-कामुक ।।2.43 ।।

असं सांगणाऱ्यांना भगवंत अविवेकी म्हणजे योग्य काय, अयोग्य काय हे न कळणारी मंडळी असं म्हणतात यात सगळं आलं! ह्या अविवेकी लोकांच्यावर रजोगुणाचा जबरदस्त पगडा असतो. त्यांचे म्हणणे खोडून काढण्यासाठी श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, वेदात कर्म केले की फळ मिळेल असे सांगितले आहे हे खरे पण त्यामुळे फळाच्या आशेने का होईना माणसे कर्म करायला सुरवात करतील असा उद्देश त्यामागे आहे. हे म्हणजे औषध घेण्यासाठी लहान मुलाला गुळाचा खडा देतो असे सांगण्यासारखे आहे.

जसजसे मनुष्य कर्म करत जातो तसतसे मिळणाऱ्या फळाची गोडी कमी कमी होत जाते कारण त्यातली निरर्थकता ध्यानात येते. पुढे अभिमान नाहीसा होऊन मी कर्ता नसून देवच माझ्याकडून सर्व करवून घेत आहे अशी खात्री होते. वेदवाणीचं चुकीच्या मार्गानी समर्थन करणाऱ्यांच्या सांगण्याला बळी पडणाऱ्यांची काय अवस्था होते ते बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

कुर्वन्ति सततं कर्म जन्ममृत्युफलप्रदम् ।

स्वर्गैश्वर्यरता ध्वस्तचेतना भोगबुद्धय: ।। 34 ।।

अर्थ-असे लोक जन्म मृत्युरूपी फळ देणारे कर्म सतत करतात, स्वर्गाच्या ऐश्वर्यामध्ये रममाण असणारे, ज्ञान नष्ट झालेले, विषयांच्या भोगांचे ठिकाणी बुद्धि ठेवणारे जे असतात ते, स्वत:च स्वत:साठी बंधन तयार करतात.

विवरण-बाप्पा म्हणाले, राजा, वेदवचनांचा अर्थ, त्यामागील ईश्वराची भूमिका समजून न घेणारे, अविवेकी आणि उगीचच भलत्यासलत्या गोष्टी सांगणाऱ्या मंडळींच्या नादाला लागून भ्रमित होणारे, फळाची अपेक्षा मनात ठेऊन सकाम भावनेनं सतत कर्म करत राहतात. असे लोक आपणहूनच सापळ्यात पाय ठेवतात असे म्हणायला हरकत नाही. कसा? ते पाहुयात पुढील श्लोकात,

सम्पादयन्ति ते भूप स्वात्मना निजबन्धनम् ।

संसारचक्रं युञ्जन्ति जडा: कर्मपरा नरा: ।।35 ।।

अर्थ-मंद, कर्मपरायण माणसे स्वत:ला फिरण्याकरता संसाररूपी चक्र जोडतात.

विवरण-सकाम कर्म करणाऱ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पुण्य जरूर मिळतं आणि मरणोत्तर त्यांना स्वर्गसुखही लाभतं पण कुठपर्यंत तर जोपर्यंत त्यांच्याकडे पुण्यसाठा आहे तोपर्यंत. आपल्याला माहीत आहे की, साठवलेल्या गोष्टी कधी ना कधी संपुष्टात येतात. त्याप्रमाणे स्वर्गसुखाचा उपभोग घेतल्यामुळे त्यांच्या पुण्यकर्माचा साठा हळूहळू संपत येतो आणि तो संपला की, त्यांना पृथ्वीतलावर ढकलले जाते. या बाप्पांच्या सांगण्याची पुष्टी करताना भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात भगवंत म्हणतात,

वेदाभ्यासी सोम-पाने पुनीत । माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू ।। ते पुण्याने   जाउनी इंद्र-लोकी । तेथींचे ते भोगिती दिव्य भोग ।। 9.20।। त्या स्वर्गाते भोगुनी ते विशाळ । क्षीणे पुण्ये मृत्यु-लोकास येती ।। ऐसे निष्ठा ठेवुनी वेद-धर्मी । येणे-जाणे जोडिती काम-मूढ ।। 9.21 ।। आता यावर बाप्पानी सांगितलेला उपाय आणि त्याचे परिणाम हा आपल्या पुढील अभ्यासाचा विषय आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.