वाहतूक विभागाची अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच
आयुक्त कार्यालयासमोर विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 17 जणांवर दंडात्मक कारवाई
बेळगाव : वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध भागात अतिक्रमण हटाव व हेल्मेट सक्तीची मोहीम सुरूच ठेवली आहे. काकतीवेस रोड, गणपत गल्ली पाठोपाठ शुक्रवारी मध्यवर्ती बस स्थानकाजवळ फूटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. तर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर दुसऱ्या दिवशीही विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक विभागाचे एसीपी जोतिबा निकम यांच्या पुढाकारातून अतिक्रमण हटावची मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर, उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमाला साथ दिली. मध्यवर्ती बस स्थानकापासून सर्किट हाऊसपर्यंत व दुसऱ्या बाजूला आरटीओ सर्कलपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी ऑटो रिक्षाचालकांबरोबरही चर्चा केली. दरम्यान, पोलीस आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही हेल्मेट तपासण्याची मोहीम राबविण्यात आली. कार्यालयासमोर जाणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिवसभरात याच परिसरात विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 17 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.