परिवहन मंडळाला यंदा वर्षापर्यटनाचा विसर
बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. परिणामी वर्षापर्यटनाला नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. मात्र, यंदा अद्यापही परिवहन मंडळाकडून वर्षापर्यटनाला बसेस सोडलेल्या नाहीत. यामुळे परिवहन खात्याला पर्यटनाचा विसर पडला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे परिवहन खात्याने पर्यटनस्थळांवर बसेस सोडण्याची मागणी पर्यटकांतून होत आहे.
दरवर्षी वर्षापर्यटनासाठी परिवहन मंडळाकडून दोन मार्गांवर विशेष बसेस सोडण्यात येतात. गोकाक धबधबा, गोडचिनमलकी व हिडकल डॅम तर आंबोलीसाठीही बसेस सोडण्यात येत येतात. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्या आहेत. यामुळे घटप्रभा व मार्कंडेय नद्या प्रवाहित झाल्याने गोकाक व गोडचिनमलकी धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. आंबोलीलाही तरुणाईसह नागरिक गर्दी करत आहेत. यासाठी नागरिक खासगी गाड्यांद्वारे प्रवास करत आहेत. मात्र, नागरिकांना सोईस्कर करून देण्यासाठी परिवहन मंडळाकडून अद्याप विशेष बसेस सोडण्यात आलेल्या नाहीत.
वर्षापर्यटनाला पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन परिवहन मंडळाने लवकरात लवकर विशेष बसेस सोडण्याची मागणी होत आहे. यामुळे नागरिकांना प्रवास करणे सुलभ होणार असून आर्थिक भारही सहन करावा लागणार नाही. मात्र, परिवहन मंडळाला वर्षापर्यटनाचा विसर पडल्याचे दिसून येत असून अद्याप यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. दरम्यान, परिहवन मंडळाकडून येत्या दोन दिवसात बसेस सोडण्यात येणार असल्याचे समजते.