‘वेटींग’च्या प्रवाशांना ‘जनरल’चा आधार; आरक्षित डब्यात बसल्यास 440 रूपये दंड
तिकीट कन्फर्म झाल्यानंतरच आरक्षित कोचमध्ये एंट्री; कोल्हापुरात रेल्वेच्या नवीन नियमांनुसार कार्यवाही सुरू; कोणत्याही स्थानकात डब्यातून उतरवण्याचा टीसीला अधिकार
विनोद सावंत कोल्हापूर
रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यानंतर प्रतीक्षा यादीवरील (वेटींगवर) तिकीट प्रवाशांना दिले जाते. हे प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करतात. वेटींगवरील प्रवासांना आता हा प्रवास खूपच महागात पडणार आहे. यात केवळ दंड भरून प्रवाशांची सुटका होणार नाही तर त्यांना आरक्षित डब्यातून प्रवासाची मुभा दिली जाणार नाही. दंड वसूल केल्यानंतर ‘वेटींग’वरील प्रवाशांना कोणत्याही स्थानकात डब्यातून खाली उतरवण्यात येणार आहे. या नियमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
रेल्वेगाड्यांचा प्रवास सुरक्षित अन् आर्थिकदृष्ट्या बचतीचा असल्याने प्रवासी रेल्वेलाच पसंती देतात. प्रसंगी लोंबकळत व रेटारेटीचा प्रवास करत इच्छित स्थळ गाठतात. कोल्हापूर रेल्वेमार्गावरून लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचीही हीच स्थिती आहे. विशेषत: सुट्टी आणि सणांच्या कालावधीत रेल्वेगाड्यांचे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल होत असल्याने बहुतांशी कोल्हापूरकरांच्या पदरात प्रतीक्षा यादीवरील तिकीटे पडतात. याच प्रतीक्षा यादीवरील तिकीटावर प्रवास करत ते आवश्यक ठिकाणी जातात. बऱ्याचदा असा प्रवास करताना तिकीट ‘कन्फर्म’ होत नाही. परिणामी ऑनलाईन केलेले तिकीट प्रतीक्षा यादीवर असल्यास आपसुकच रद्द होते. मात्र काऊंटरवर काढलेले तिकीट रद्द होत नाही. यातील अनेकजण वेटींग तिकीटावरच रेल्वेतूनच प्रवास करणे पसंत करतात. मात्र हा प्रवास आता साऱ्यांनाच महागात पडणार आहे.
वेटींग तिकीटावर रेल्वे प्रवास केल्यास 440 रूपये दंड भरावा लागणार आहे. तसेच टीसी अशा प्रवाशांना रेल्वे डब्यातून कोणत्याही स्थानकात उतरवणार असल्याने प्रवाशांची कोंडी होणार आहे. रेल्वेने आरक्षित डब्यातून वेटींग तिकीटावर प्रवास करण्यास पूर्णपणे निर्बंध आणल्याने प्रवाशांची मोठी पंचाईत झाली आहे. वेटींग तिकीट असल्यास एसी किंवा स्लीपर डब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. 1 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाल्याने त्याचा परिणाम ‘वेटींग’ तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होत आहे. केवळ दंड भरून यातून कोणाचीही सुटका होणार नाही. तर अशा प्रवाशांना जनरल कोचमधून प्रवास करावा लागत आहे.
आरक्षणधारकांचा मन:स्ताप आता कमी होईल
वेटींगवर प्रवास करणाऱ्यांची आरक्षित डब्यात गर्दी होत असल्यामुळे आरक्षणधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. आता असे प्रकार कमी होणार आहेत.
अंमलबजावणीपूर्वी डब्याची संख्या वाढवली का नाही
वेटींगवरील प्रवाशांना आरक्षित डाब्यात प्रवास करण्यास 1 जुलैपासून बंद केले आहे. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी अनारक्षित व स्लीपर क्लासने प्रवास करणाऱ्यांच्या सोयीसाठी रेल्वेने काही गाड्यांमध्ये अनारक्षित डबे वाढवणे आवश्यक होते. परंतु अद्यापी तसे झालेले नाही. सामान्य व बिगर वातानुकूलित शयनयान डब्यांचीही संख्या वाढवण्याची गरज आहे.
कारवाई करणार तर मग वेटींगचे तिकीटच बंद करा
काही प्रवासी अचानक तिकीट रद्द करतात तर काहींचा प्रवास निम्म्यात थांबतो. अशा ठिकाणी वेटींगवरील प्रवाशांना बसण्याची सोय होते. या आशेवरच वेटींगचे तिकीट प्रवाशी घेतात. आता आरक्षित डब्यातूनच वेटींगवरील प्रवाशांना जाण्यास अटकाव केला आहे. दंडही आकारणार असतील तर वेटींगचे तिकीट देणेच रेल्वेने बंद करावे, असा संदेशही सोशल मीडीयावरून व्हायरल होत आहे.
प्रतिक्रिया
रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यामुळे चार-चार महिने अगोदर आरक्षण करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. परंतु वेटींगवरील प्रवाशांची गैरसोय होऊ नये,यासाठी आरक्षित। जनरलचे कोचची संख्या वाढवली पाहिजे.
शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती