रेल्वे नाही आली...खुनाला वाचा फुटली
अनोळखी युवकाचा खून करून टाकले रेल्वेरूळावर
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
एखाद्या गुन्हेगारी घटनेनंतर ती घटना लपविण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी गुन्हेगार नामी शक्कल लढवत असतात. मात्र, काहीवेळा अशा प्रकारात ते यशस्वी होत नाहीत. अशीच एक घटना रायबाग-चिकोडी रोड रेल्वेस्थानकांदरम्यान उघडकीस आली आहे. एका युवकाचा खून करून आत्महत्या भासवण्यासाठी रेल्वेरूळावर मृतदेह टाकल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, या रूळावरून रेल्वेच गेली नाही. त्यामुळे खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
रायबाग-चिकोडी रोड रेल्वेस्थानकांदरम्यान हा प्रकार उघडकीस येताच रेल्वेचे पोलीस निरीक्षक मुरगेश टी. एस., उपनिरीक्षक सत्याप्पा मुक्कन्नावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 30 ते 35 वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीसाठी तो बेळगावला आणण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
या अनोळखी युवकाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने किंवा कोणत्या तरी अवजाराने वार करून त्याचा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. खुनानंतर मृतदेह रेल्वेरूळावर टाकून देण्यात आला आहे. बेळगावहून मिरजेला जाताना रूळावर दोन्ही पाय व मधोमध त्याचे शरीर पडेल असे टाकून देण्यात आले होते. मृतदेहावर रेल्वे गेल्यानंतर ही आत्महत्या भासविण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
रविवारी रात्री 11 नंतर या रूळावरून कोणतीच रेल्वे धावली नाही. सकाळी मिरजेहून बेळगावकडे येणाऱ्या एलटीटीच्या चालकाने रूळावर मृतदेह पडल्याचे पाहून जवळच्या रेल्वेस्थानकाला कळविले. त्यानंतर रेल्वे पोलिसांना ही माहिती देण्यात आली. रेल्वे पोलीस व रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहिले असता अनोळखी युवकाचा खून करून आत्महत्या भासवण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वेरूळावर टाकून दिल्याचे उघडकीस आले.
त्या अनोळखी युवकाने आपल्या अंगावर करड्या रंगाचा टी-शर्ट व निळी नाईट पँट परिधान केली आहे. इतरत्र खून करून त्याचा मृतदेह रेल्वेरूळावर टाकल्याचे उघडकीस आले असून खून झालेल्या युवकाची ओळख पटल्यानंतरच यासंबंधीची इतर माहिती उजेडात येणार आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी संबंधितांनी 0831-2405273 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.