‘द साबरमती रिपोर्ट’चा ट्रेलर सादर
दहशतवादी कृत्यावर आधारित चित्रपट
‘द साबरमती रिपोर्ट’ हा चालू वर्षाती बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. विक्रांत मैसी पुन्हा एकदा धीरज सरना यांच्या ‘द साबरमती रिपोर्ट’सोबत मोठ्या पडद्यावर परतणार आहे. या चित्रपटात राशि खन्ना आणि रिद्धि डोगरा या अभिनेत्रीही दिसून येणार आहेत. हा चित्रपट 2002 मधील गोध्रा रेल्वेच्या डब्याला पेटवून देण्यात आल्याच्या घटनेवर आधारित आहे.
चित्रपटात विक्रांत हा पत्रकाराची भूमिका साकारत आहे. हा पत्रकार हिंदीभाषिक असल्यानेच त्याला बाजूला सारण्यात आले असते. तो एका प्रसिद्ध इंग्रजी भाषिक पत्रकारासोबत काम करतो, ज्याची व्यक्तिरेखा रिद्धि डोगराने साकारली आहे. परंतु गोध्रा येथील घटनेच्या दिवशी सर्व गोष्टी बदलत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.
चित्रपटात साबरमती रेल्वेच्या डब्याला जाळण्याचा मुद्दा गांभीर्याने दाखविण्यात आला आहे. परंतु ट्रेलरमध्ये हिंदी विरुद्ध इंग्रजी ही प्रमुख लढाई दिसून येते. ‘इतिहास साक्षीदार आहे, देश असो किंवा मनुष्य, ठेच लागल्यावरच स्वत:ला सावरतो. असत्य कितीही दीर्घकाळाचे असो, केवळ सत्यच ते बदलू शकतो’ असे निर्मात्यांनी ट्रेलर शेअर करत नमूद पेले आहे.
बालाजी पिक्चर्सकडून निर्मित द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट गोध्रा येथील घटनेवर आधारित आहे. ही घटना 27 फेब्रुवारी 2002 रोजी घडली होती, जेव्हा साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला दहशतवाद्यांनी पेटवून दिले होते. या घटनेत अयोध्येतून परतणारे 59 कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला होता. विक्रांत मैसीचा हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.