‘भूल चूक माफ’चा ट्रेलर जारी
वामिकासोबत राजकुमार राव झळकणार
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा आगामी चित्रपट ‘भूल चूक माफ’चा ट्रेलर जारी करण्यात आला आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत मजेशीर आहे. ट्रेलरमध्ये राजकुमार राव आणि वामिका गब्बी पहिल्यांदाच एकत्र दिसून आले आहेत. राजकुमार राव यात वामिकासोबत विवाहाचा गुंता सोडविताना दिसून येतो.
चित्रपटात दोघांची उत्तम केमिस्ट्री दिसून येते. राजकुमार राव आणि वामिका हे साकारत असलेल्या व्यक्तिरेखा विवाहासाठी तयार असतात, परंतु त्यांचे कुटुंबीय तयार नसल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. वामिका साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे पिता राजकुमारच्या व्यक्तिरेखेला शासकीय नोकरी लागली तरच हा विवाह होणार असल्याची अट घालतात. तर राजकुमार रावची व्यक्तिरेखा शासकीय नोकरीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असते.
यानंतर संबंधित व्यक्तिरेखेला शासकीय नोकरी लागते, परंतु विवाहाचा दिवस येतच नाही, अशा स्थितीत एक ज्योतिषी त्याने कुणाचे मन दुखावले असल्याचे त्याला सांगतो. अशा स्थितीत ही व्यक्तिरेखा सर्वांना ‘भूल चूक माफ’ करण्यास सांगत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.
हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि वामिका गब्बीसोबत सीमा पाहवा या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण शर्माने केले आहे.