अनन्या-कार्तिकच्या चित्रपटाचा ट्रेलर सादर
25 डिसेंबरला होणार प्रदर्शित
कार्तिक आर्यन आणि अननया पांडे यांचा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरची सुरुवात कार्तिकसोबत होते, ज्यात तो भूतकाळ आणि भविष्यकाळाची चिंता सोडून देत केवळ वर्तमानात जगावे असे सांगत असल्याचे दिसून येतो. यानंतर ट्रेलरमध्ये अनन्याची एंट्री होते, यात ती एका लेखिकेच्या भूमिकेत आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना एका टिपिकल रोमँटिक-कॉमेडी चित्रपटांची आठवण करुन देणारा आहे. यात प्रथम नायक-नायिका भेटतात, त्यांच्यात वाद होतो, नायिका प्रथम नायकावर संतापते, मग काही कारणास्तव दोघेही एकत्र येतात आणि प्रेमात पडतात, याच धाटणीची कहाणी यात असण्याची शक्यता आहे.
चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ताही दिसून येणार आहेत. समीर विद्वांसकडून दिग्दर्शित ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नाताळाच्या काळात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.