कोरेगावातील वाहतूक कोंडीवर अखेर मार्ग निघणार
एकंबे :
सातारा-लातूर महामार्गावर कोरेगाव शहरात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात लक्षात घेऊन तातडीने पुढील 30 वर्षांचा विचार करून ल्हासुर्णे ते कुमठे आणि ल्हासुर्णे- कुमठे- वडाचीवाडी दोन्ही बाह्यवळण मार्गांचे काम लवकरात लवकर मार्गी लावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले.
कोरेगाव तालुक्यातील सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गासह विविध रस्ते प्रकल्पांच्या अनुषंगाने कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात मंगळवारी दुपारी अडीच वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोरेगाव शहरासह तालुक्यात विविध महत्वपूर्ण ठिकाणी सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने महेश शिंदे यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने आजवर केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर अजितदादांनी या महामार्गावरील ठिकठिकाणी होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर ल्हासुर्णे ते कुमठे बाह्यवळण रस्ता तसेच ल्हासुर्णे - कुमठे - वडाचीवाडी या नवीन बाह्यवळण रस्त्याचे काम पुढील तीस वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश थेट अधिकाऱ्यांना दिले. कोरेगाव आणि फलटण तालुक्याला जोडणारा महत्वपूर्ण आणि गेली अनेक वर्षे वन विभागाच्या नियम व अटींमध्ये अडकलेल्या रेडे घाट मार्गाची तातडीने पाहणी करून आराखड्यासह खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या.
नामदार महेश शिंदे यांनी सांगितले की, फलटण, खटाव, कोरेगाव आणि सातारा या चारही तालुक्यांसाठी फायदेशीर असलेल्या रेडे घाट प्रकल्पावर लक्ष देणे नितांत गरजेचे आहे. फलटण- सातारा मार्गावरील वाढती रहदारी आणि अपघात टाळायचे असतील तर रेडी घाट मार्गाचा विषय मार्गी लावणे आवश्यक आहे.
फलटण तालुक्यातील आळजापूर या गावापर्यंत रस्ता तयार आहे तर कोरेगाव तालुक्यातून चिलेवाडी गावापर्यंत रस्ता तयार आहे. केवळ रेडे घाटाचे काम पूर्ण केल्यास कोरेगाव ते फलटण हे अंतर कमी होणार असून अवघ्या पाऊण तासात दोन्ही शहर एकमेकांना जोडली जातील, असे महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. फलटण येथून थेट वाहनधारक आळजापूर चिलेवाडी, भाडळे, कोरेगाव मार्गे सातारा येथे जाऊ शकतात.
यावेळी कोरेगाव शहरासह तालुक्यातील प्रमुख रस्त्यांचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी प्रत्येक रस्त्याची माहिती देत त्याचे संगणकीकृत सादरीकरण केले.
यावेळी सातारा- लातूर राष्ट्रीय महामार्गावरील वर्धनगड घाटातील महामार्गाचे रुंदीकरण, त्रिपुटी खिंडीतील महामार्गाचे रुंदीकरण हे विषय प्राधान्य क्रमाने हाती घेण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने तातडीने वन विभागाकडे प्रस्ताव सादर करावा व त्याबाबत असणाऱ्या त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश अजितदादा पवार यांनी दिले. या दोन्ही प्रकल्पांमध्ये करावयाच्या उपायोजनांबाबत महेश शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली.
बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, ग्रामविकास विभागाचे रस्ते प्रकल्पाचे सचिव सतीश चिखलीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते प्रकल्पाचे सचिव सदाशिव साळुंके उपस्थित होते. तर सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता राहुल वसईकर, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई हे बैठकीत सहभागी झाले होते.
नवीन पुलांची आणि उड्डाणपुलांची उभारणी; वाहतूक होणार जलदगतीने
सातारा-पंढरपूर आणि सातारा-लोणंद-पुणे या दोन्ही राज्यमार्गाचे परिवर्तन राष्ट्रीय महामार्गामध्ये केले आहे. या दोन्ही महामार्गावर वाहतूक अहोरात्र सुरू असल्याने ठिकठिकाणी उपाय करण्याची आवश्यकता महेश शिंदे यांनी व्यक्त केली. त्यानंतर सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर चिमणगाव फाटा येथे जड वाहतुकीसाठी उड्डाणपुलाची उभारणी करणे, कोरेगाव शहरात उड्डाणपूल उभारणे, तिळगंगा नदीवर साखळी पूल येथे नवीन पुलाचे काम मार्गी लावणे, ल्हासुर्णे येथील पुलाची उंची वाढविणे, कोरेगाव रेल्वे स्टेशननजीकच्या पुलाची उंची वाढवणे, कोरेगाव शहरात ड्रेनेजसाठी विटांच्या चेंबरचे काँक्रिटीकरण करणे याविषयी आढावा घेऊन निर्णय घेण्याबाबत निर्देश अजितदादा पवार यांनी दिले. क्षेत्र माहुली ते संगम माहुली दरम्यान नवीन पुलाची उभारणी करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. सातारा- लोणंद- पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाढे येथे वेण्णा नदीवर आणि वडूथ येथे कृष्णा नदीवर पुलांची पुनर्बांधणी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.