उड्डाणपुलांमुळे वाहतुकीची कोंडी फुटणार
कोल्हापूर :
मुंबई, पुण्याच्या धर्तीवर आता कोल्हापूरसह कागल येथे चार उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याचे डीपीआर करण्याचे काम सुरू झाले आहे. यानंतर केंद्र शासनाकडे याचे प्रस्ताव पाठविले जाणार आहे. पुढील दोन वर्षात ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा झाला.
कोल्हापूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी नित्याची आहे. शनिवार, रविवारी सुट्टी दिवशी वाहनांचा रांगा लागलेल्या असतात. येथील रस्त्याची रूंदी तेवढीच मात्र, वाहनांच्या संख्या जास्त झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. शहरामध्ये प्रामुख्याने तावडे हॉटेल चौक, दाभोळकर कॉर्नर, सीपीआर चौक, महापालिका, शिवाजी चौक, महाद्वार रोड, अंबाबाई मंदिर परिसर, ताराबाई रोड, व्हिनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर दसरा चौक या ठिकाणी वाहतूक कोंडी ठरलेली असते. ही वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल हा पर्याय आहे.
अमल महाडिक 2014 च्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल मार्गावर उड्डाणपूल प्रस्तावित केला होता. परंतू याचा डीपीआर मनपा की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यापैकी नेमका कोणी करावा याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. यानंतर ही प्रक्रिया ठप्प झाली होती. आता पुन्हा आमदार अमल महाडिक यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. आतापर्यंत 20 ते 25 बैठकही त्यांनी घेतल्या. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तावडे हॉटेल ते शिवाजी पुलासह सांगली फाटा ते उचगांव मार्गावर होणाऱ्या उड्डाणपूल, शिवाजी पूल ते केर्ली आणि कागल येथील उड्डाणपुलाचे आराखड्याचे सादरीकरण झाले. मुंबई, पुण्याप्रमाणेच कोल्हापूर शहरातही तीन उड्डाणपूल होणार असल्याने शहरातील वाहतूक कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
- शहराच्या बाहेरून कोकण, गोवाकडे जाणार
सध्या बास्केट ब्रीजसाठी निधी मंजूर झाला आहे. हा पूल तावडे हॉटेल चौकापर्यंत असून याला जोडूनच आता तावडे हॉटेल चौक ते शिवाजी पूल होत आहे. तसेच या उड्डाणपूल दुधाळी एसटीपी मार्गे गगनबावडाला जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, कर्नाटक येथून कोकण, गोव्याकडे जाणारी वाहतूक शहराच्या बाहेरून जाऊ शकणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा भार कमी होणार आहे.
- सुमारे तीन हजार कोटींचा निधी आवश्यक
कागल, उचगांव फाटा, तावडे हॉटेल-शिवाजी पूल, केर्ली-शिवाजी पूल या चार उड्डाणपुलासाठी सुमारे 3 हजार कोटींची गरज लागणार आहे. यामध्ये कागल येथील उड्डाणपुलासाठी 600 कोटी, उचगांव फाटा 980 कोटींची निधी प्रस्तावित आहे. याचबरोबर तावडे हॉटेल-शिवाजी पूल, केर्ली-शिवाजी पूलसाठी सुमारे 1500 कोटी लागणार असा प्राथमिक अंदाज आहे.
- दोन वर्षात काम पूर्ण करण्याचे टार्गेट
सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत चारही उड्डाणपूलाचा डीपीआर करण्याचे काम सुरू आहे. अंतिम डीपीआर झाल्यानंतर केंद्र शासनाकडे मंजूरीसाठी पाठविली जाईल. निधीला ग्रीन सिंग्नल मिळताच निविदा प्रक्रिया राबवीली जाणार आहे. दोन वर्षामध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- युटीलिटी, भुसंपादनासाठीही निधी आवश्यक
तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाच्या दरम्यान दाभोळकर कॉर्नर, सीपीआर चौक या ठिकाणी रॅम्प होणार आहे. येथील भूसंपादन करावे लागणार आहे. तसेच युटीलिटी शिप्टींगची कामेही करावी लागणार आहे. सुमारे 10 ते 15 कोटींचा निधी लागणार आहेत. सध्या मनपाची आर्थिक स्थिती बेताची आहेत. त्यामुळे राज्य शासनाकडून यासाठी निधीची मागणी केली जाणार आहे. यासंदर्भातील सल्लागार कंपनीचा खर्च शासन स्तरावर होणार आहे. महापालिकेवर याचा बोजा पडू दिला जाणार नाही.
- राजकीय ताकद वापरण्याची गरज
शहराची हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे विकासकामांना मर्यादा आल्या आहेत. वाहतुकीची कोंडी हा सध्या महत्वचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे उड्डाणपूलही काळाची गरज आहे. केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. जिल्ह्यात 10 आमदार महायुतीचे आहेत. तीन पैकी दोन खासदार महायुतीचे आहेत. या सर्वांनी केंद्रीय पातळीवर राजकीय ताकद वापरण्याची गरज आहे. तसेच आता यामध्ये आडकाठी येता कामा नये.