For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्लास्टिक प्रदुषणाचे जहरी संकट

09:51 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्लास्टिक प्रदुषणाचे जहरी संकट
Advertisement

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवी समाजाला जी प्लास्टिकची देणगी दिली होती, त्यामुळे खरेतर लाकुडासारख्या निसर्गातल्या घटकाला समर्थ असा पर्याय उपलब्ध झाला असे वाटत होते आणि त्यामुळे वाढत्या जंगल तोडीला लगाम बसणार, अशी धारणा झाली होती. परंतु प्लास्टिकच्या उपलब्ध झालेल्या पर्यायाने जगभरात असंख्य पर्यावरणीय समस्यांची निर्मिती करून कर्बवायूच्या उत्सर्जनात विलक्षण भर घातलेली आहे. भारत सरकारने 1986 साली पर्यावरण संरक्षण कायदा अंमलात आणून, पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले होते. परंतु प्लास्टिक, रबर, थर्माकोलसारख्या आपणासमोर उपलब्ध झालेल्या पर्यायांमुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांचे गांभिर्य त्याकाळी प्रकर्षाने लक्षात न आल्याकारणाने आज प्लास्टिक प्रदूषणाचा प्रश्न देशाच्या अस्तित्वासमोर एक मोठे आव्हान ठरलेला आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालणारे कायदे केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी करूनही, प्लास्टिक कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्यांवर नियंत्रण ठेवणे जगातल्या बऱ्याच राष्ट्रांना शक्य झालेले नाही. त्यामुळे नदी-नाले, ओहोळ यांची पात्रे प्लास्टिक कचऱ्यामुळे खंडित होण्याची वेळ आलेली आहे. पिकाऊ शेतजमिनी नापिक होऊन, कचऱ्याच्या अमाप ढिगाऱ्याखाली आपले सृजनत्व हरवून बसलेली आहे.

Advertisement

प्लास्टिक कचऱ्याचे वाढते प्रदूषण ही आज आपल्या देशासमोरची गंभीर समस्या झालेली असून, हल्लीच ‘नेचर’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या लेखाने प्लास्टिक प्रदुषणात आपला देश अव्वलस्थानी असल्याचे नमूद केलेले आहे. लीडस येथील विद्यापीठाचे संशोधक जोशुआ डब्ल्यू कॉटम एड कूक आणि कोस्टास ए वेंलिस यांनी प्रकाशित केलेल्या शोधनिबंधातून प्लास्टिक प्रदुषणात आपला देश कसा अग्रक्रमी ठरलेला आहे, त्याचा ऊहापोह करण्यात आलेला आहे. जगभरातील प्लास्टिक प्रदुषणात आपल्या देशाचा वाटा सर्वाधिक 9.3 दशलक्ष टन इतका असल्याचे अधोरेखित झालेले आहे. ठिकठिकाणी निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यापैकी दरवर्षी सुमारे 5.8 दशलक्ष प्लास्टिक कचरा चक्क जाळला जात असून, उर्वरित 3.5 दशलक्ष प्लास्टिक कचरा जमीन, हवा, पाण्यासारख्या स्रोतात प्रवेश करीत असल्याने त्यामुळे गंभीर पर्यावरणीय समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. प्लास्टिक कचऱ्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावण्यासाठी अस्तित्वात असलेली व्यवस्थापन यंत्रणा यासंदर्भात अपयशी ठरल्याकारणाने त्यामुळे गंभीर पर्यावरणीय समस्यांबरोबर सामाजिक, आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संशोधनात संशोधकांनी जागतिक पातळीवरचे प्लास्टिक कचऱ्याचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी बरेच दूरगामी उपाय सूचविलेले आहेत. यात प्लास्टिक कचरा गोळा करण्याबरोबर कचरा पुनर्वापर प्रणालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे आणि कचरा ठरलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करून वाढते कर्ब उत्सर्जन रोखणे कसे शक्य आहे, यासंदर्भातल्या उपाययोजनांचा ऊहापोह करण्यात आलेला आहे.

आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक कचरा गोळा करून, त्याची विल्हेवाट व्यवस्थितरित्या करण्याऐवजी असा कचरा जाळला जात असून, त्यामुळे बाहेर पडणारे विषारी वायू मानवांबरोबर सजीवांच्या विविध आजारांसाठी कारणीभूत ठरलेले आहे. विल्हेवाट न लावलेल्या कचऱ्यापैकी 43 टक्के कचरा हा न जाळलेल्या कचऱ्याच्या स्वरुपात असतो आणि उर्वरित कचरा मिळेल तेथे जाळला जात असतो. आज प्लास्टिक कचऱ्याची समस्या इतकी व्यापक झालेली आहे की, आपल्या सभोवताली त्या कचऱ्याचे महाकाय ढीग परिसराला ओंगळवाणे करण्याबरोबर गंभीर हवा, पाणी, मृदा प्रदुषणाला कारणीभूत ठरलेले आहे आणि त्यामुळे बऱ्याच रोगांचे प्रस्थ वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. याविषयी आपल्या समाजात सर्वत्र अनास्थाच पसरलेली आहे. अमेरिका, जर्मनीसारखे देश दरडोई भारताच्या तुलनेत प्लास्टिक कचऱ्याची अधिक निर्मिती करीत असले तरी त्यांनी त्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. या उलट आपल्याकडे प्लास्टिक कचऱ्याचे प्रस्थ इतके निर्माण झालेले आहे की, आपल्या प्रत्येक श्वासासोबत हवेतल्या प्लास्टिकचे कण आत जात असल्याचे उघडकीस आलेले आहे. आपल्या दैनंदिन वापरातल्या बहुतांश वस्तू प्लास्टिकच्या आकर्षक वेष्टनाने झाकलेल्या असतात. खाद्यान्नाच्या वस्तूपासून ते पेयजलापर्यंत प्लास्टिक पिशव्या, बाटल्या यांचा आम्ही अमर्याद वापर करीत असून, या प्लास्टिकचे बारीक तुकडे होतात. नवीन तंत्रज्ञानाने एक लिटर पाण्यात प्लास्टिकचे सुमारे 2 लाख 40 हजार छोटे तुकडे असल्याचे स्पष्ट केलेले आहे. आज मनुष्य प्राणी दरवर्षी 400 दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक निर्माण करीत असून त्यापैकी 3 कोटी टनांहून ज्यादा प्लास्टिक पाण्यात किंवा जमिनीत फेकले जात आहे. हे प्लास्टिक नष्ट होत नसल्याने, ते हवेद्वारे आपल्या श्वासात प्रवेश करते, मातीत मिसळते, पिके, झाडे आणि शेवटी अन्नात प्रवेश करते. आज आपल्याकडे छाती, मेंदूशी निगडीत जे कर्करोग आहेत, त्यांना या प्लास्टिक कचऱ्यामुळे पोषक वातावरण लाभलेले आहे. त्यामुळे मानवी प्रजनन क्षमतेवरही गंभीर दुष्परिणाम आढळलेले आहेत. आज प्लास्टिक कचरा वाळवंटात, अंटार्क्टिकाच्या बर्फात आणि सर्वोच्च अशा एव्हरेस्टच्या शिखरावरही पोहोचलेला पाहायला मिळत आहे. श्वासात विरघळणारे प्लास्टिक आपल्या फुफ्फुसांवर दुष्परिणाम करीत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

प्लास्टिक कचऱ्यात असलेल्या शिसे, पारा त्याचप्रमाणे कॅडमियममुळे जन्मजात विकार होऊ शकतात. त्यात असलेले बीपीए बिस्फेनॉल ए हे घातक असून, त्याच्यामुळे झाडे-झुडुपे आणि पिकांना नुकसान पोहोचलेले आहे. अन्नाद्वारे जे प्लास्टिक पचनसंस्थेपर्यंत पोहोचते, त्याने यकृत आणि मूत्रपिंडावर वाईट परिणाम केलेले आहे. अन्नातून प्रवेश करणारे प्लास्टिक प्रथम हवा आणि नंतर रक्ताद्वारे, मेंदुला नुकसान पोहोचवत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. आज प्लास्टिक कचऱ्याचे जे प्रस्थ आपल्या देशात निर्माण झालेले आहे, त्यासंदर्भात आपण गांभिर्याने उपाययोजना केली तर त्या कचऱ्यावरती नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. सागरात होणाऱ्या पाण्याच्या घुसळणीमुळे प्लास्टिकचे सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म 5.25 ट्रिलियन कण पसरलेले असून, सागरी पाण्यावरती 2.6 चौरस किलोमीटर क्षेत्रात प्लास्टिकचे 46 हजार तुकडे सापडतात आणि त्याचे दुष्परिणाम मासे, खुबे भक्षणाद्वारे मानवी शरीरात जाऊन गंभीरपणे जाणवत अहे. या समस्यांचा विचार करून आम्ही प्लास्टिक वापरावर निर्बंध घालण्यासाठी, बाजारात खरेदी-विक्रीसाठी कपड्याच्या पिशव्यांचा वापर आणि तत्सम पर्यावरण स्नेही बाबींचा स्वीकार करण्यावर भर देण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही सजगपणे उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.