For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेस्टॉरंट समजून आले पर्यटक...

06:38 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
रेस्टॉरंट समजून आले पर्यटक
Advertisement

थायलंड या देशात सध्या एका कुटुंबाची बरीच चर्चा होत आहे. या कुटुंबाच्या घरात भोजनाचा कार्यक्रम साजरा केला जात असताना तेथे अचानक पर्यटकांचा एक गट आला. हे घर म्हणजे रेस्टॉरंट आहे, अशी या पर्यटकांची समजूत झाली. त्यामुळे ते ‘फूड कोर्ट’ समजून या घरात आले. सर्वसामान्यपणे पाहिले असता या कुटुंबाने त्यांना तशी कल्पना दिली असती. हा भोजनाचा कार्यक्रम खासगी असून हे घरही रेस्टॉरंट किंवा फूड कोर्ट नाही, तर एक खासगी घर आहे, अशी माहिती त्यांना देण्यात आली असती आणि त्यांना घराबाहेर पाठविण्यात आले असते. तथापि, या घरच्या लोकांनी या अचानक आणि न बोलाविता आलेल्या अतिथींचेही आगत्याने आणि प्रेमाने स्वागत केले. त्यांना भरपेट भोजन दिले. ते बिनबुलाए अतिथी आहेत, याची कल्पना त्यांना येऊ दिली नाही. भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर अतिथींनी पैसे देण्यासंबंधी विचारणा केली. त्यावेळी आपण अतिथी आहात आणि आपल्याला पैसे देण्याची आवश्यकता नाही, याची जाणीव त्यांना करुन देण्यात आली. ते पर्यटकही या अनपेक्षित आदरातिथ्याने भारावून गेल्याचे दिसून आले. त्यांच्यापैकीच काहींनी हा प्रसंग सोशल मिडियावर प्रसारित केल्याने त्याला प्रसिद्धी मिळाली. आता या देशात या कुटुंबाची मोठी प्रसिद्धी झाली आहे.

Advertisement

थायलंड हा देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे त्यामुळे पर्यटकांची संख्या मोठी असते. येथे अनेक घरांमध्येच पर्यटकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली असते. अशा घरांमध्ये विदेशांमधून आलेल्या पर्यटकांसाठी स्थानिक खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. हे घर अशा घरांपैकीच एक असेल, या समजुतीने पर्यटकांचा हा गट या घरात आला होता. तथापि, यजमानाने त्यांचेही आदरातिथ्य अत्यंत प्रेमाने केले. त्यांना ते परके आहेत, याची जाणीव होऊ दिली नाही. त्यामुळे हा विषय आता चर्चेचा झाला असून अनेक दर्शकांनी या कुटुंबाची सोशल मिडियावर प्रशांसा केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.