For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टूर निघाली लंडनला!

06:01 AM Jun 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
टूर निघाली लंडनला
Advertisement

काल-परवा एकदाचा आयपीएल क्रिकेटच्या मनोरंजनाला पूर्णविराम मिळाला. आरसीबीने ट्रॉफी जिंकल्यानंतर देशभरात जल्लोष झाला. तो जल्लोष होणं स्वाभाविकच होतं. परंतु या धामधुमीत या स्पर्धेच्या अंतिम सामन्याअगोदर काही दिवस इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाबद्दल जास्त उहापोह झाला नाही, याचं जास्त आश्चर्य मला वाटलं. आयपीएल क्रिकेटने नवोदित क्रिकेटपटूंना निश्चितच चांगला मार्ग दाखवला. चार चांगले पैसेही खिशात खुळखुळू लागलेत. परंतु लाल चेंडूचं क्रिकेट हेच खरं क्रिकेट हे सद्यस्थितीतील क्रिकेटपटूंना कोण सांगणार? हा खऱ्या अर्थाने कळीचा मुद्दा आहे. परंतु आयपीएलचे क्रिकेट बघून  बदललेला काळ आणि बदललेले क्रिकेट म्हणत मी माझ्या मनाची समजूत काढतो.

Advertisement

असो, अजित आगरकर आणि त्यांच्या निवड समितीने भारतीय संघाची निवड केली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने ‘जय हिंदुस्थान’ म्हणत कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटलं. साहजिकच शुभमन गिल याचं पारड जड होतं हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषीची आवश्यकता नव्हती. परंतु राहून राहून मला निवड समितीने गिलला कप्तानपद देऊन थोडीशी घाई केली असंच म्हणावंसं वाटतं. जसप्रीत बुमराहला कसोटी क्रिकेटमध्ये कप्तानपदाचा टिळा अपेक्षित होता. किंबहुना तोच मोठा भाऊ होता. मान्य आहे की त्याला त्याचे शरीर कितपत साथ देईल, तरीसुद्धा कप्तानपदाचा प्रमुख दावेदार तोच होता. परंतु शेवटी ही भारतीय क्रिकेट निवड समिती आहे हे आपण कधी कधी विसरून जातो.

इंग्लंड दौरा हा खऱ्या अर्थाने भारतीय संघासाठी खडतर दौरा असणार यात शंका नाही. शुभमन गिलने आयपीएलमध्ये गुजरातचे नेतृत्व करत आपली चुणूक निश्चित दाखविली. परंतु त्याला आता खऱ्या अर्थाने लाल चेंडू हाताळायचा आहे. बऱ्याच क्रिकेट विश्लेषकांनी अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, करुण नायर या खेळाडूंची निवड आयपीएलमधील चांगल्या कामगिरीवर झाली असं म्हटलं. हे त्यांचं म्हणणं मला खऱ्या अर्थाने खटकलं. लग्नाअगोदरचा नवरदेव आणि लग्नानंतरचा नवरदेव यातला फरक म्हणजे आयपीएल क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट. सफेद चेंडूवर तुम्ही बेधडकपणे खेळू शकता. लाल चेंडू म्हटलं की स्विंग आलाच. त्यातच इंग्लिश वातावरण या स्विंगला नेहमीच पोषक असतं. भारतीय संघातील नवोदित खेळाडू इंग्लिश वातावरणाला कसे सामोरे जातात यावरच भारतीय संघाचं यशापयश अवलंबून आहे.

Advertisement

भारतीय निवड समितीने सहा गोलंदाज संघात घेण्याची घाई का केली, हे मात्र समजू शकले नाही. त्याऐवजी एक गोलंदाज कमी घेत श्रेयश अय्यरला संघात घेतलं असतं तर एक समतोल साधता आला असता. शार्दुल ठाकुर आणि नितीशकुमार रे•ाr हे दोन अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतील. त्यातच शार्दुल ठाकुर इंग्लंडमध्ये चेंडू कमालीचा स्विंग करू शकतो हे त्याने मागच्या मोसमात दाखवून दिलं होतं. भारतीय संघाचा दुसरा त्रिशतकवीर करुण नायर याला आपला दर्जा सिद्ध करण्याची संधी प्राप्त झाली आहे. भारतीय संघात दोन-तीन खेळाडू वगळले तर बाकी पूर्ण संघ हा तरुण संघ आहे. काहीजण या संघाला आयपीएलधार्जिणाही म्हणतील. परंतु हे बिरुद खोडून काढायचं असेल तर मात्र नवोदित खेळाडूंना आपल्या खेळात परिपक्वता आणावी लागेल. सुनील गावस्कर आणि कपिल देव निखंज या मंडळींनी ज्या वेळी निवृत्ती स्वीकारली त्या वेळी भारतीय संघात बरीच पोकळी निर्माण झाली होती. नेमकी तीच परिस्थिती आता विराट आणि रोहितच्या निवृत्तीनंतर आपल्याला भारतीय संघात दिसू शकेल. परंतु कोणाच्या अनुपस्थितीमुळे कुठलाही खेळ थांबत नाही. त्याला क्रिकेटही अपवाद नाही. शेवटी जाता जाता असंच म्हणावं लागेल की ‘शो मस्ट गो ऑन’. काल-परवा भारतीय क्रिकेट संघ लंडनला रवाना झाला. या दौऱ्यात भारतीय संघाची विजयाची पोतडी किती भरते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अन्यथा, हा दौरा नवोदित खेळाडूंसाठी एक ‘टूर’ ठरू नये हीच अपेक्षा. तूर्तास तरी भारतीय क्रिकेट संघाला हार्दिक शुभेच्छा!

विजय बागायतकर

Advertisement
Tags :

.