निवृत्तीचा विषय नी शक्तीपूजा
भारताचे यशस्वी पंतप्रधान आणि विश्वनेते म्हणून ज्याचा सर्वदूर गौरव होतो आहे ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृतमहोत्सवी अर्थात 75 वा वाढदिवस बुधवारी 17 सप्टेंबरला साजरा झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अर्थात ट्रम्प तात्या, उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह जगभरातून आणि गावागावातून मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मोदींना एरवी अनेक दुषणे, अपशब्द, अवमान, ट्रोलिंग यांची सवय आहे.
राजकीय विरोधक त्यांना ‘मौत का सौदागर’ पासून ‘चौकीदार चोर है’ आणि मतचोरीपासून हुकूमशहापर्यंत अनेक दुषणे देत असतात. ही दुषणे आपल्या कामातून खोटी ठरवत मोदी त्यावर मात करत असतात आणि आज मोदी हे भाजपासाठी, भारतासाठी आणि विश्वासाठी आधार बनले आहेत. वाढदिवसाच्या या शुभेच्छांना अगदीच एक रंग लागू नये म्हणून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची काळा दिवस ही पोस्ट फिरते आहे आणि ती ट्रोल होती आहे. नवा जमाना आणि पक्षीय अजेंडा हे सारे समजून घेतले तरी देशाच्या पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छा वर्षाव होत असताना आपण कसे व्यक्त व्हावे किंवा शांत रहावे यासाठी तारतम्य व विवेक बुद्धी लागते. आजकाल ती हरवत चालली आहे. डाटा पॅक मिळाला तर भुंकायला आणि राड उडवायला माणसे मिळतात, हे आता सर्वज्ञात झाले आहे. या साऱ्या शुभेच्छा वर्षावात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा देताना आपणावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत, असे सांगत मोदींना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्या आणि त्यांच्या निवृत्तीच्या विषयाला तडका दिला. खरे तर मोदी माझ्या 75 व्या वाढदिवसाला हजर होते त्यांनी मला शुभेच्छा दिल्या व मी आजही राजकारणात सक्रिय आहे, त्यामुळे त्यांना निवृत्तीचा सल्ला देण्याचा मला आधिकार नाही, असे सांगत संघ-भाजप यामध्ये 75 नंतर निवृत्ती हा विषय घोळला जातोय त्याला पवारांनी तडका दिला. नरेंद्र मोदी हीच भाजपची
पॉवर बॅंक आहे, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही पण निवृत्तीच्या या विषयाला चालना दिली गेली होती व नंतर सारवासारव करण्यात आली. मोदींना अशी टीकेची, अडथळ्यांची सवय आहे. त्यामुळे ते त्यास कामातून उत्तर देतात. टीकाकाराला तोंडी उत्तर देत नाहीत, निवडणूक मैदानात चारीमुंड्या चित करतात आणि लोकशाहीत तेच अपेक्षित असते. मोदी 17 तारखेला राजीनामा देणार वगैरे वावड्या उठवल्या जात होत्या, डावे, नक्षली विचारवंत, त्यात आघाडीवर होते. मतचोरी आणि मोदींचा राजीनामा हा विषय घेऊन ते छाती बडवत होते पण उपराष्ट्रपती निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान घेऊनही इंडी आघाडी तोंडावर पडली, पंधरा खासदार तटस्थ राहिले आणि पंधरा खासदारांनी एनडीए म्हणजे भाजप आघाडीला मतदान केले. या तीस मतांचे परिवर्तन का व कसे झाले याचे उत्तर राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यापैकी कुणाकडे नाही. उलट इंडी आघाडी आता एकमेकांकडे संशयाने पाहू लागली आहे. राहुल गांधी मतचोरी हाच राग आळवत या रागाला हैड्रोजन बॉम्ब वगैरे नावे देऊन त्रागा व्यक्त करत आहेत आणि लोकशाहीतील महत्त्वाच्या व्यवस्थांवर अविश्वास दाखवत चिखलफेक करत आहेत. खिळखिळ्या इंडी आघाडीत हा शोक राग आळवला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शक्ती पूजा सुरु केली आहे.
त्यांचा वाढदिवस स्वदेशीचा नारा देत थर येथे जाहीर सभेत साजरा झाला. नवा भारत कोणत्याही अणस्त्र धमकीला घाबरत नाही, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी वाढदिनी पाकिस्तानला ठणकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत ‘ऑपरेशन सिंदूर’ चा उल्लेख करत भारतीय जवानांनी पाकिस्तानाला धूळ चारल्याचा दावा केला. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या कृत्याला प्रत्युत्तर देताना भारताने हे ऑपरेशन राबवले, असे ते म्हणाले. तसेच, दहशतवाद्यांच्या अण्वस्त्रांच्या धमक्यांना भारत घाबरत नाही, घरात घुसून मारण्याची ताकद ठेवतो, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. या सर्वांचा अर्थ सर्व शहाण्या, सुज्ञ लोकांना लक्षात आला आहेच आणि तेच लोकांना अपेक्षित होते. आता नवरात्र, दसरा, दिवाळी हा सण उत्सवाचा काळ समोर आहे. या काळात मोहीम सुरू करायची आणि सीमोल्लंघन करत प्रगती, विजय साधायचा हा आपला वारसा आहे तो सांभाळत
मोदींनी स्वदेशीचा नारा दिला आहे तर त्यांच्या मंत्रीमंडळाने जीएसटीमध्ये मोठे बदल करत दसरा-दिवाळी स्वस्त, आनंदी व्हावी यासाठी पावले उचलली आहेत. या सुधारणांमुळे बाजार, व्यापार उदिम याला गती तर येईलच जोडीला सरकारचे करसंकलन वाढेल. विकासाला, अर्थव्यवस्थेला, शेअरबाजाराला गती येईल अशी सुचिन्हे आहेत. भारत संरक्षणदृष्ट्या सुसज्ज आणि आर्थिकदृष्ट्या गतीमान होतोय हे लक्षात घेतले पाहिजे. ट्रम्प तात्यांनी कितीही टेरिफ आकारले तरी स्वदेशी या एका मंत्रात त्या सर्वावर मात करायची शक्ती आहे. सव्वाशे कोटी भारतीयांनी विदेशी वस्तू, सामान यावर सलग तीन महिने बहिष्कार टाकला तर ट्रम्पतात्याच नव्हे भारताचे सारे शत्रू गुढघ्यावर येतील आणि मागे वाजपेयी पंतप्रधान असताना जसा आर्थिक बहिष्कार मागे घेणे भाग पडले तसा टेरिफ असो, टेरेरिझम असो सर्वांना भारताची शक्ती मान्यच करावी लागेल. आता मोदींचा आणि भागवतांचा निवृत्तीचा विषय संपला आहे आणि नवरात्रीच्या निमित्ताने शक्ती उपासना सुरू झाली आहे. स्वदेशीचा नारा उंचावत, अनूसरत आपणही या पुजेत एक एक समिधा टाकूया आणि आगामी काळात सण-उत्सवात स्वदेशी कंपन्या, मेड इन इंडिया आणि आपल्या गावच्या, देशांच्या व्यापाराला चालना देऊया, मोदींसाठी त्याच शुभेच्छा ठरतील आणि आपलेही भले होईल, देशाचे नाव व अर्थव्यवस्था उंचावेल व खरी शक्ती पूजा साध्य होईल.