‘म्युझिकल’, ‘हेरिटेज’ पोलला अखेर मुहूर्त
दसरा चौक ते मिरजकर मैदान हेरिटेज पोल उभारले
भवानी मंडप ते शिवाजी चौक म्युझिकल पोलचे काम सुरू
महिन्याभरात सर्व काम पूर्ण
हेरिटेज इमारतींसह अंबाबाई मंदिर परिसर उजळणार
कोल्हापूर
महापालिकेकडून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या परिसरात म्युझिकल तसेच हेरिटेज इमारतींच्या मार्गावर हेरिटेज पोल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. दसरा चौक ते खासबाग मैदानावरील हेरिटेज पोल उभारून झाले आहे. सर्व पोलचे काम महिन्याभरात होणार असून रंकाळ्या प्रमाणे आकर्षक विद्युतरोषाणाईने उजळून निघणार आहे.
कोल्हापूरमध्ये पर्यटनांना आकर्षित करण्यासाठी विविध स्थळे विकसित केली जात आहेत. भाविक किंवा पर्यटक कोल्हापुरात आल्यानंतर एक दिवस वास्तव कसे करतील, यासाठी आता प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्यावतीने अंबाबाई मंदिराच्या परिसरातील प्रमुख सात रस्त्यांवर म्युझिक पोल्स उभारण्यात येत आहे. जिल्हा नियोजन मंडळातील पर्यटनस्थळाच्या मूलभूत विकास योजनेंतर्गत यासाठी दोन कोटी 65 लाखांचा निधी मिळाला आहे. महापालिकेने संबंधित ठेकेदाराची नियुक्तीही केली आहे. ठेकेदाराने पोल उभारण्याचे काम सुरू केले आहे. शिवाजी चौक ते भवानी मंडप मार्गावर पोल उभारणीसाठी खोदकाम सुरू केले आहे. मंदिर परिसरात 120 पोल उभारण्यात येणार असून 50 पोल उभारले आहेत.
अंबाबाई मंदिर परिसरातील म्युझिकल पोलप्रमाणेच शहरातील हेरिटेज इमारतीच्या परिसरात हेरिटेज पोल उभारले जात आहेत. यासाठी 2 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर असून 169 हेरिटेज पोल उभारले जाणार आहेत. यापैकी 55 पोल बसवून झाले आहेत. यामध्ये दसरा चौक ते मिरजकर तिकटी या मार्गावर हे पोल बसविण्यात आले आहे. 100 कोटींच्या रस्त्याची कामे सुरू होण्यापूर्वीच येथे केबल टाकून फौंडेशनही उभारले होते. पुन्हा रस्ता खोदकाम होवू नये म्हणून महापालिकेने याचे नियोजन केले होते. याच मार्गावर हेरिटेज पोल उभारण्यात आले आहेत.
महिन्यात म्युझिकल पोल होणार कार्यन्वित
म्युझिकल पोलसाठी फौंडेशन उभारले असल्याने आता पुढील कामासाठी जादा अवधी लागणार नाही. ठेकेदार आठ दिवसांत पोल आणणार आहे. दरम्यान, फौंडेशन संदर्भातील शिल्लक कामे केली जाणार आहेत. महिन्याच्या आत म्युझिकल पोलची सर्व कामे पूर्ण होऊन कार्यन्वित करण्याचे नियोजन आहे.
अमित दळवी, विद्युत विभाग प्रमुख, महापालिका
म्युझिकल पोलचे इतरही फायदे
म्युझिकल पोलच्या माध्यमातून भक्तीसंगीत, मंदिरातील आरती ऐकण्यास मिळणार आहे. तसेच पोलवर आकर्षक विद्युतरोषणाईही असणार आहे. याचबरोबर आपत्कालीन स्थिती तसेच अत्यावश्यक बाबींसाठी याचा पब्लिक अॅड्रेस सिस्टीम (उदा. अतिवृष्टी होणार असल्यास नागरीकांना सतर्कतेचे आवाहन करणे) म्हणन वापर केला जाणार आहे.
म्युझिकल पोलसाठी निधी -2 कोटी 65 लाख 6 हजार 758
निधी मंजूर -24 ऑगस्ट 2023
मुझिकल पोलची संख्या -120
बसविलेले पोल -50
हेरिटेज पोलसाठी निधी-2 कोटी 85 लाख
पोलची संख्या -169
बसविलेले पोल - 55
ठिकाण पोलची संख्या
जोतिबा रोड 8 सिंगल आर्म
भवानी मंडप ते बिंदू चौक सबजेल 15 सिंगल आर्म
महाद्वार रोड ते आयडीबीआय कॉर्नर 24 सिंगल आर्म
बिंदू चौक ते मिरजकर तिकटी 24 सिंगल आर्म
मिरजकर तिकटी ते कार पार्कींग 17 सिंगल आर्म
भवानी मंडप ते अंबाबाई मंदिर 20 सिंगल आर्म
भवानी मंडप ते शिवाजी चौक 12 डब्बल आर्म पोल
एकूण 120 पोल
पोलच्या समोरच एमएसईबीचे एलईडी असणारे काढली जाणार आहेत. दसरा चौक ते खासबाग मैदान दरम्यान 100 कोटींच्या रस्ते काम सुरू करण्यापूर्वीच टाकलेल्या पोल केबल टाकून झाली आहे. शिवाजी चौक ते भवानी मंडपची केबल टाकण्याचे काम सुरू आहे.