पितृसत्तात्मक व्यवस्था संपविण्याची आली वेळ
राहुल गांधींचे विद्यार्थिनींच्या निदर्शनांना समर्थन : जेन जीला केले आवाहन
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी एक वक्तव्य जारी करत महिलांच्या सुरक्षेच्या मागणीवरून होत असलेल्या विद्यार्थिनींच्या निदर्शनांना समर्थन दिले. तसेच त्यांनी युवा आणि जेन जीला या निदर्शनांमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले आहे. महिलांच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये महिलांनाच दंड केला जाऊ नये. तर जे दोषी आहेत, त्यांच्या विरोधात कारवाई व्हायला हवी असे राहुल गांधी यांनी दिल्लीतील एका बलात्कार प्रकरणी सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे.
पूर्ण देशात महिला रस्त्यांवर चालण्यास घाबरत आहेत. महिलांना शोषण अन् बलात्कार होण्याची भीती आहे आणि सरकार महिलांना घरीच थांबण्याची सूचना करत आहे. ही पितृसत्तात्मक व्यवस्था असून ती पीडितांवरच आरोप करणारी आहे आणि गुन्हेगारांना वाचविणारी आहे. आता ही पितृसत्तात्मक व्यवस्था संपविण्याची वेळ आली असल्याचे उद्गार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत काढले आहेत.
महिलांना घरांमध्ये कैद ठेवणे तोडगा ठरणार नाही. आम्हाला आमचे रस्ते सुरक्षित करावे लागतील आणि महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांना विरोध करावा लागणार आहे. तसेच महिलांच्या विरोधात गुन्हे करणाऱ्या लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करावी लागणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
दिल्लीत निदर्शने
दक्षिण दिल्लीच्या एका उद्यानात 17 वर्षीय युवतीवर सामूहिलक बलात्कार झाला होता. या घटनेच्या विरोधात दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी निदर्शने करत आहेत. यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमेन, मिरांडा हाउस, गार्गी कॉलेज आणि डॉ. आंबेडकर विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी रस्त्यांवर उतरून निदर्शने केली होती. यानंतर विविध महाविद्यालयांमध्ये देखील निदर्शने झाली आहेत.