सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर
भक्कम बहुमत असल्याने सारे सुशेगात : 28 नोव्हेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
प्रतिनिधी, मुंबई
राज्य विधिमंडळाच्या इतिहासात महायुतीला विक्रमी बहुमत मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी आता कोणतीही घाई न करता सर्व काही सुरळीत करुनच सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न महायुतीचे पक्ष करत आहेत. यामध्ये मोठा पक्ष असलेल्या भाजपला अधिकचे मत असल्याने सध्या तरी सत्ता स्थापनेचा सोमवारचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. शनिवारी मतमोजणीच्या दिवशी महायुतीला विक्रमी विजय मिळाल्यानंतर सोमवारी वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा होईल असे जाहीर करण्यात आले होते मात्र तसे काही न होता पुन्हा सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.
चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संमाप्त होत आहे. त्याच्या आधी पंधरावी विधानसभा अस्तित्वात यावी यासाठी सोमवारी शपथविधी सोहळा वनखेडेवर पार पडणार होता. पण भाजपसह महायुतीला विक्रमी बहुमत मिळाल्याने सरकारला कोणताही धोका नाही. फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापनेचा आटापिटा करण्याइतप विरोधकांचे संख्याबळही नाही. इतकेच कशाला; महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षाला विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्केही जागा न मिळाल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी कोणतीही घाईगडबड होत असल्याचे दिसत नाही.
लोकांनी ज्या विश्वासाने मतांचे भरभरून दान महायुतीच्या पारड्यात टाकले आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही, असा निश्चय महायुतीच्या राज्यातील नेत्यांनी आणि भाजपच्या राज्यातील आणि पेंद्रातील नेत्यांनी केला आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीत गेले आहेत. दिल्लीत भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होणार असून त्यानंतर राज्यातील घटक पक्षाच्या तिन्ही नेत्यांबरोबर चर्चा होऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आणि त्यांच्या कालमर्यादेबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. या सर्व बाबी ठरल्यानंतरच 28 नोव्हेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे
कार्यकर्त्यांची चढाओढ, नेते मात्र शांत
राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा यासाठी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ आहे. येण़ाऱ्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाखाली लढवल्या जातील आणि महायुती घवघवीत यश संपादन करेल, असे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी अनेक वेळा व्यक्त केले होते. त्याप्रमाणे मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतफत्वाखाली घेतलेल्या अनेक धाडसी निर्णयांमुळे यावेळी महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी असावेत अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.
अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बारीक नजर
अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बारीक नजर ठेवून आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे पानिपत झाल्यानंतर विधानसभेत उभे केलेल्या उमेदवारांच्या प्रमाणात त्यांना चांगले यश मिळाले. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचे फलक लागतच होते आणि आताही लागत आहेत.
महायुतीच्या एकूण विजयात देवेंद्र फडणवीस यांचा वाट मोठा आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेबरोबरची तुटलेली युती, अजित पवारांबरोबर झालेला औट घटकेचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, त्यानंतर उद्धव ठाकरे यांची काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरची आघाडी, एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील बंड आणि त्यांचे मुख्यमंत्रीपद आणि आताच न भूतो असा विजय या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस चाणक्य ठरतात. त्यांचे नेतफत्व भाजपमधील सगळेच मान्य करतात. शिवाय राष्ट्रवादीलाही त्यांचे नेतफत्व मान्य असल्याचे छगन भुजबळ यांनी काल सांगितले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्रीपदावर मोठा दावा आहे आणि तो योग्यही आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी अनेक पर्याय
निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आला नव्हता. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तिन्ही पक्षाचे नेते आणि भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ठरेल, असे पेंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आधीच जाहीर केले होते. तरीही कार्यकर्ते अनेक पर्याय जाहीर करत आहेत. कोणी म्हणतात 2-2-1 असा पर्याय असावा, तर कोणी म्हणतात 3-1-1 असा पर्याय असावा. म्हणजे काहीही करा, पण मुख्यमंत्रीपद आमच्या पक्षाला द्या, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र कार्यकर्त्यांत चढाओढ असली तरी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांचे नेते शांत आहेत.