दोडामार्गमधून गोव्यात येणाऱ्या तिलारीच्या कालव्याला भगदाड
डिचोली, बार्देशच्या पाणीपुरवठा बंद : दुरुस्तीसाठी अनेक दिवस लागणार
साटेली-भेडशी : तिलारी धरणाच्या गोव्याकडे जाणाऱ्या डाव्या कालव्याला काल शुक्रवारी सकाळी 6 वाजता कुडासे-धनगरवाडी येथे पुन्हा मोठे भगदाड पडले आणि पाण्याचा मोठा प्रवाह भेडशी-कुडासे रस्त्यावरून वाहू लागला आहे. त्याचबरोबर गोव्याला जाणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे. हे भगदाड दुरुस्तीसाठी अनेक दिवस लागणार असल्याने त्याचा मोठा फटका गोव्याला बसणार आहे. गोव्यातील बार्देश व डिचोली तालुक्यातील शेतीसाठीच्या आणि पिण्याच्याही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कालव्याची पाहणी केली. याबाबत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. या घटनेमुळे तिलारी धरणाच्या कालव्याच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनास्थळी शेतकरी व ग्रामस्थांनी अधिकारी, ठेकेदारांना धारेवर धरले.
तिलारी धरण प्रकल्पाच्या तेरवण मेढे उन्नेयी बंधारा धरणाच्या उजव्या कालव्याची घोटगेवाडी नदीपात्रातील पाईपलाईन कोसळल्याची घटना ताजी असतानाच तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड पडले. शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भेडशी-कुडासे धनगरवाडी येथील रस्त्यावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला. त्यावेळी स्थानिकांनी आजुबाजूला पाहणी केली असता रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याबाबत कालवा विभागाला माहिती दिली. कालवा विभागाचे कर्मचारी येईपर्यंत तीन तासानंतरही पाण्याचा मोठा प्रवाह कायम होता. भगदाड पडलेल्या कालव्याची भरावाची माती खचत होती. भगदाड पडलेल्या कालव्यातून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर पडतच होता. तो प्रवाह लगतच्या शेती व बागायतींमधून थेट रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाले. रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी होते. पुढे रस्त्यावरून जाणारा पाण्याचा प्रवाह लगतच्या भातशेतीतही शिरला. कालव्याशेजारीच केलेल्या उन्हाळी शेतीत पाण्याचा प्रवाह जात नाचणी, भातपिकासह मिरची लागवड केलेल्या शेतीत मोठ्या प्रमाणात मातीचा थर साचला. त्यामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरांच्या अंगणापर्यंत पाणी पोहोचले. तसेच काहीच दिवसांपूर्वी केलेल्या कुडासे धनगरवाडी येथील नवीन रस्त्यावरील खडी वाहून गेली.
कालव्याला भगदाड पडले तेथून 200 मीटर अंतरावर परमे येथील नदीत पाणी सोडण्यासाठी कालव्याचा मार्ग आहे. तेथे गेट उभारले आहे. हेच गेट काही तासानंतर बंद करून पुढे भगदाड पडलेल्या ठिकाणी जाणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तसेच मुख्य डाव्या कालव्यातील पाणी प्रवाह बंद केला. कालवा विभागाचे कर्मचारी वेळीच दाखल झाले असते तर शेतीबागायतीत जाणारा प्रवाह आटोक्यात आणू शकले असते.
शाळकरी विद्यार्थी घाबरले
शुक्रवारी सकाळी कुडासे येथील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी पायी जात असताना अचानकपणे पाण्याचा मोठा प्रवाह रस्त्यावर आला आणि ते सर्व विद्यार्थी घाबरले. काही विद्यार्थी रस्त्यापलिकडे राहिले. तर काहींनी प्रात्यक्षिक परीक्षा असल्याने जीव धोक्यात घालून पाण्यातून मार्ग काढत कॉलेज गाठले. या घटनेनंतर तिलारी पाटबंधारे प्रकल्प कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी पाहणी केली. यावेळी संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. कालव्यांची झालेली दुरवस्था, कालव्यावर वाढलेली मोठमोठी झाडीझुडपे, कालव्यांची निकृष्ट दर्जाची दुऊस्ती कामे, कालव्यांच्या दुऊस्ती व देखरेखीसाठी लाखोंचा निधी खर्ची घालण्यात येत असूनही अशा घटना घडत आहेत, असे सांगत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, जाधव शांतपणे ग्रामस्थांना सामोरे गेले. यावेळी उपअभियंता घाटगे, मोहिते, कविटकर, सिंगवा, मेहेत्रे, तुरंभेकर उपस्थित होते. त्यांनाही ग्रामस्थांनी धारेवर धरले. तसेच कालवा फुटीच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर निकृष्ट दर्जाचे कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही करण्यात आली. घटनास्थळी उपस्थित कार्यकारी अभियंता जाधव यांनी सांगितले की, कालव्यांची कामे करून बरीच वर्षे झाली आहेत. त्यामुळे दुऊस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. आज कालव्याला भगदाड पडले त्या ठिकाणी पाच महिन्यांपूर्वी दुऊस्तीचे काम करून तेथील पूर्ण कालव्याला तात्पुरते प्लास्टिकचे आवरण दिले होते. त्याच ठिकाणी पाण्याच्या दाबामुळे प्लास्टिक ताडपत्रीला फाटून भगदाड पडले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून पाहणी
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या गोवा हद्दीतील कालव्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी कुडासे धनगरवाडी येथे कालवा फुटल्याची बातमी त्यांना समजताच गोव्यातील कालव्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील कालव्यांची दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊन मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तिलारी प्रकल्पाच्या गोवा हद्दीतील कालव्यांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा शुक्रवारी नियोजित दौरा होता. मात्र, शुक्रवारी सकाळी कुडासे धनगरवाडी येथे कालवा फुटला आणि परिणामी कालव्याचे पाणी बंद करावे लागले. मुख्यमंत्री सावंत हे शुक्रवारी सकाळी कालव्यांची पाहणी करण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना कुडासे येथे फुटलेल्या व महाराष्ट्र हद्दीतील कालव्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत पत्रकारांनी विचारले असता आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र हद्दीतील सर्व कालव्यांची दुऊस्ती ही गोव्यातील कालव्यांच्या धर्तीवर आरसीसी काँक्रिटिकरणाने करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भविष्यात कालवे फुटण्याचे प्रकार थांबतील. शिवाय गोव्यातील शेतकरी, कंपन्यांसह अन्य क्षेत्रासाठी पाण्याचा तुटवडा भासणार नाही, असेही सावंत त्यांनी सांगितले. यावेळी गोव्याचे जलस्त्राsत मंत्री सुभाष शिरोडकर, डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेटये व गोवा जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.