For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामक्रोधाचा घट्ट विळखा ज्ञानाभोवती पडलेला असतो

06:13 AM Jan 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
कामक्रोधाचा घट्ट विळखा ज्ञानाभोवती पडलेला असतो
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

अर्जुनाने भगवंताना प्रश्न विचारला की, माणसाला पाप करावे असे वाटत नसतानाही तो कुणीतरी जबरदस्ती केल्याप्रमाणे पापाचरण का करतो?

त्याचे उत्तर देताना भगवंत म्हणाले, रजोगुण वाढला की, काम आणि क्रोध हे मोठे खादाड आणि पापिष्ट वैरी जोर करतात आणि त्यामुळे मनुष्य पापाचरण करण्याला तयार होतो. काम-क्रोधाच्या ठिकाणी अंशमात्रसुद्धा दयाबुद्धी नाही. ते काळाप्रमाणेच निष्ठुर आहेत. मी कर्ता आहे ही गैरसमजूत ते दृढ करतात आणि समोर दिसणारे जग खरे आहे असे समजून अविचाराने वागण्यास भाग पाडतात. त्यांच्यात तमोगुणाची प्रमाद व मोह ही वैशिष्ट्योही असतात. या मायेने साधूंचा समुदाय काम क्रोधाच्या लहरीनी भ्रष्ट करून टाकला. यांनी विवेकाचे बळ नाहीसे केले, वैराग्याचा विचार नाहीसा केला आणि शम-दमांची मान जिवंतपणीच मुरगळून टाकली. यांनी मनातील संतोषरूपी वन तोडून टाकले, धैर्यरूपी किल्ले जमीनदोस्त केले व आनंदरूपी कोवळी रोपे उपटून टाकली. यांनी ज्ञानाची रोपे खुडून टाकली, सुखाची सर्व अक्षरेच पुसून टाकली आणि माणसाच्या हृदयात विविध तापांचे निखारे प्रज्वलित केले. काम क्रोध हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत. हे काम क्रोध जिवात्म्याच्या जवळ असतात. ज्ञानाच्या पंक्तीला ते रहात असतात. यांच्या लहरी हल्ला करायला उसळल्या, की त्या कोणालाही सावरता येत नाहीत. हे जलाशिवाय माणसाला बुडवून टाकतात, अग्नीशिवाय जाळून टाकतात आणि त्याला काही समजू न देता ग्रासून टाकतात. कोणत्याही शस्त्रावाचून ठार करतात. दोरावाचून बांधतात आणि स्वत:ला ज्ञानी म्हणणाऱ्या व्यक्तीला तर पैज लावून ठार करतात. हे चिखलाशिवायच माणसाला पुरून टाकतात. कोणत्याही जाळ्यावाचून अडकवून टाकतात. हे शरीरात सूक्ष्मरूपाने राहत असल्यामुळे सर्वसाधारणपणे कोणाच्या आटोक्यात येत नाहीत.

Advertisement

भगवंत पुढील श्लोकात म्हणतात, ज्याप्रमाणे धुराने अग्नी आच्छादित होतो किंवा मळाने आरसा झाकून जातो अथवा वारेने गर्भ वेष्टित असतो, त्याप्रमाणे काम माणसाच्या ज्ञानाला झाकून टाकतो.

धुराने झाकिला अग्नि धुळीने आरसा जसा । वारेने वेष्टिला गर्भ कामाने ज्ञान हे तसे ।। 38 ।।

ह्या श्लोकात कामाने ज्ञानाला वेढलेले असते हे तर सांगितले आहेच पण हा वेढा किती घट्ट असतो हे निरनिराळ्या उदाहरणांनी समजावून दिले आहे. विशेष म्हणजे त्या उदाहरणामध्ये सांगितलेले प्रसंग हे चढत्या क्रमाने घ्यायचे आहेत. धुराने अग्निला वेढलेले असते पण थोडीशी फुंकर मारली तरी धूर बाजूला सरतो. आरशावर चढलेली धुळीची पुटे नाहीशी करण्यासाठी त्याला ओल्या फडक्याने पुसून घ्यावे लागते म्हणजे धूर दूर करण्यासाठी जे श्रम पडतात त्यापेक्षा आरसा स्वच्छ करायला जास्त श्रम पडतात. तसेच पुढे वारेने वेष्टीलेला गर्भ मोकळा करण्यासाठी शस्त्र वापरावे लागते. म्हणजे गर्भाचे आवरण अधिक कठीण असते. पुढे भगवंत म्हणतात, त्यापेक्षाही कामाने वेढलेले ज्ञान त्या वेढ्यातून मुक्त करणे कठीण होय.

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, चंदनाच्या मुळीला सर्प वेढे घालून बसलेले असतात किंवा पोटात असणाऱ्या गर्भाला वेष्टनाची गवसणी असते त्याप्रमाणे काम क्रोध जिवात्म्याला ग्रासुन टाकतात. जसा सूर्य कधी प्रकाशावाचून नसतो, धुरावाचून अग्नी असत नाही किंवा मळाशिवाय आरसा असू शकत नाही. त्याप्रमाणे ज्ञान हे काम क्रोधाशिवाय असूच शकत नाही इतका कामक्रोधाचा घट्ट विळखा ज्ञानाभोवती पडलेला असतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.