For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साखळीत उद्या पहाटे वीरभद्राचा थरार...

12:50 PM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
साखळीत उद्या पहाटे वीरभद्राचा थरार
Advertisement

थरार अनुभवण्यासाठी साखळी सज्ज : शिरोडकरांची चौथी पिढी साकारते वीरभद्र

Advertisement

डिचोली : विठ्ठलापूर सांखळीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या डाव्या बाजूला खास मंडपात हातात तलवारी घेऊन पाठीला प्रभावळ (तडकी किंवा भद्र) बांधलेली... विशिष्ट अशा वेशभूषेने रंगविलेला... भुपराज... अशा घोषवाक्याने नाचविला जाणारा वीरभद्र अवतरणार आहे. टाळ व पखवाजाच्या ठेक्यावर हातातील तलवारी नाचवत नृत्य करणाऱ्या या वीरभद्राचा दैवी थरार अनुभवण्यासाठी संपूर्ण सांखळीबरोबरच गोमंतकीय सज्ज झालेले आहेत. सांखळीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात साजरा होणाऱ्या प्रसिद्ध चैत्रोत्सवाच्या शेवटच्या रात्रीनंतर पहाटे वीरभद्राचा थरार पहायला मिळतो. हा थरार पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांची मंदिर परिसरात उपस्थिती असते. यावर्षी या उत्सवातील हे खास आकर्षक लोकांना बुधवार दि. 24 एप्रिल रोजीच्या पहाटे अनुभवायला मिळणार आहे. आज मंगळवार 23 एप्रिल रोजी या उत्सवाची शेवटची रात्र आहे.

असा असतो वीरभद्राचा थरार

Advertisement

वीरभद्राला विठ्ठलापूर येथील वाळवंटी नदीकिनारी असलेल्या पुंडलिक मंदिरात रंगविले जाते. त्याची संपूर्ण वेशभूषा तेथेच साकारली जाते. त्याला रंगवताना त्याला स्वत:चे तोंड आरशात पहायला देत नाही. वीरभद्राने आपली स्वत:ची प्रतिमा पाहू नये, यासाठी त्यादिवशी वाळवंटी नदी ते विठ्ठल मंदिरापर्यंत कोणत्याही प्रकारची आरसा सदृश वस्तू ठेवली जात नाही. पूर्वीच्या काळी उजेड घालण्यासाठी असणाऱ्या ‘पेट्रोमेक्स’ला बाहेरून असलेल्या काचासुद्धा कागद किंवा कापडाने झाकून घेतल्या जायच्या. वीरभद्राची संपूर्ण वेशभूषा साकार झाल्यानंतर तो विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात येतो. तोपर्यंत दशावतारी नाट्याप्रयोग संपुष्टात येतो. नाट्याप्रयोग संपताच दशावतारी कलाकार या जागेवरून पोबारा करतात. आपल्या वेशभूषेतून ते वीरभद्राच्या समोर येत नाहीत. मंदिराच्या प्रांगणात आल्यावर सर्वप्रथम वीरभद्र मध्यभागी ठेवलेल्या बाकावर चढून लोकांना नमस्कार करतो. त्यानंतर त्याच्या दोन्ही हातात तलवारी दिल्या जातात. त्या तलवारी हातात आल्यानंतर सुरू होतो वीरभद्र नृत्याचा खेळ. तलवारी नाचवत टाळ व पखवाज वाद्याच्या ठेक्यावर वीरभद्र नाचायला लागतो. त्याचवेळी सदर बाकाच्या सभोवताली वर्तुळ म्हणजेच गवताचे रिंगण केले जाते. सदर गवताच्या रिंगणाला आग लावताच वीरभद्र बाकावरून खाली उतरतो आणि वर्तुळात गोल नाचतो. नाचताना मध्येच तो अल्प विश्रांती घेतो. बाहेर वर्तुळात नाचल्यानंतर तो विशेष मंडपात जातो आणि तेथे खऱ्या खेळाला सुरूवात होते.

सदर मंडपात टाळ व पखवाजाच्या ठेक्यावर हातातील तलवारी हलवत वीरभद्र नृत्याचा आविष्कार पहायला मिळतो. त्याच्यासमोर असणारी व्यक्ती त्याच्या नजरेवर नजर ठेऊन असते. या मंडपात किती फेरे मारायचे याला मर्यादा नाही. तरी फेरे मारत असताना अचानक त्याचा वेग वाढतो आणि त्याच्यावर दैवी अवसर येतो. हा क्षण अत्यंत नाजूक आणि तितकाच जोखमीचा असतो. कारण दैवी अवसर येताच त्याची शक्ती कितीतरी पटीने वाढलेली असते. त्याच्या पाठीमागे बांधण्यात येणारी ‘तडकी’ म्हणजेच ‘प्रभावळ’ जमिनीला टेकू द्यायची नाही, तसेच तलवारी हातातून काढून घ्यायच्या, हे सर्वात मोठे आव्हान असते. पाठिला बांधण्यात येणारी तडकी म्हणजेच महादेवाचा हात असे मानले जाते. सदर तडकीला दैवी अवसरावेळी शंभर हातांचे बळ प्राप्त होत असते. त्यासाठी ती अवसर येताच जमिनीला टेकू द्यायची नसते, असे सांगितले जाते. म्हणून वीरभद्रावर दैवी अवसर संचारताच त्याला जमिनीपासून उंच उचलले जाते. सर्वप्रथम त्याच्या हातातील तलवारी सोडविण्याचे काम केले जाते. तलवारी हातातून काढतानाच पाठिवरची प्रभावळही काढली जाते. आणि उचलूनच वीरभद्राला विठ्ठल रखुमाई मंदिरात नेले जाते. तेथे देवाचे तीर्थ त्याच्यावर शिंपडून व ग्रहण करायला दिल्यानंतर बऱ्याच वेळानंतर त्याच्यावरील अवसराचा प्रभाव कमी होऊन तो पूर्वपदावर येतो. वीरभद्र नृत्यानंतर हे दृष्यही पहायला लोकांची मंदिरात मोठी गर्दी असते.

शिरोडकरांची चौथी पिढी साकारते वीरभद्र

साखळीतील शिरोडकर कुटुंबीयांकडून हा वीरभद्र साकारला जातो. सध्या शिरोडकर कुटुंबीयांची चौथी पिढी वीरभद्र साकारत आहे. 54 वर्षीय सुनील रोहिदास शिरोडकर हे गेल्या 2009 सालापासून वीरभद्र साकार करीत आहेत. त्यापूर्वी सुनील यांचे वडील रोहिदास शिरोडकर यांनी 51 वर्षे हा वीरभद्र साकारला. वयाच्या 77 व्या वर्षापर्यंत त्यांनी वीरभद्र साकारला होता. तत्पूर्वी सुनील यांचे आजोबा श्रीधर व पणजोबा अर्जुन यांनी हा वीरभद्र साकारला होता.

रामनवमीपासून पाळावा लागतो शाकाहार, तर हनुमान जयंतीदिनी उपवास

वीरभद्र हा चैत्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी होत असला तरी त्याला रामनवमीपासून शाकाहार पाळावा लागतो. हनुमान जयंतीदिनी उपवास ठेवावा लागतो. वीरभद्राच्या रात्री अडीच वाजता सुनील शिरोडकर हे पुंडलिक मंदिरात दाखल होतात व नंतर त्यांच्या वेशभूषेला प्रारंभ होतो. पाठीला बांधण्यात येणारी तडकी त्यांच्याच घरी बनवली जाते. आमच्या जाणत्यांकडून आपल्याकडे आलेले हे वीरभद्राचे व्रत आपणही वडील, आजोबा व पणजोबा यांच्याप्रमाणेच आत्मियतेने जोपासलेले आहे. त्याच उत्साहाने व भक्तीभावाने ते पुढे नेण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असणार आहे, असे सुनील शिरोडकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.