अहिल्यानगरमध्ये पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार
कुस्तीगीर परिषदेने ठोकला शड्डू - लवकरच कार्यक्रम जाहीर होणार
फिरोज मुलाणी/ औंध
अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उडालेला धुरळा अद्याप खाली बसला नसताना आता अहिल्यानगरमध्येच पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. बातमी वाचून दचकला! पण बातमी खरी आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने यावेळी आयोजनासाठी शड्डू ठोकला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने दरवर्षी वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गादी आणि माती गटातील स्पर्धेत राज्यातील जिल्हा तालिम संघ आणि महानगरपालिकेचे संघ सहभागी होतात. गटातील विजेत्या स्पर्धकांना महाराष्ट्र राज्य क्रीडा युवा संचालनालय विभागामार्फत मानधन देण्यात येते. अलिकडे राज्यातील कुस्ती संघटनेत फूट पडल्यानंतर दोन्ही कुस्ती संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने नुकतीच अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. यावेळी झालेल्या गदारोळाची चर्चा सुरू असताना आता कुस्ती शौकीनांना पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन संघटनेच्या मान्यतेने कर्जत तालुका तालीम संघ (पै. ऋषिकेश धांडे) आणि नगर जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा पार पडणार आहेत.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा आयोजनाची जबाबदारी खांद्यावर घेतल्याची चर्चा कुस्ती क्षेत्रात सुरू आहे. सध्या महाराष्ट्र राज्य कुमार राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र राज्य वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हानिहाय निवड चाचणी घेण्यासाठी जिल्हा तालिम संघाची तयारी सुरू आहे. लवकरच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
‘तरुण भारत संवाद’चा अंदाज खरा ठरला
अहिल्यानगरला कुस्तीगीर संघाची स्पर्धा सुरू झाल्यावर बुधवार, 29 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकात दै. तरुण भारत संवादने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनासाठी दंड थोपटले. महाराष्ट्र केसरीचा डबल आखाडा रंगणार, या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. सध्या आयोजक आणि परिषदेच्या वतीने स्पर्धा आयोजनाची लगबग सुरू झाली आहे. मार्च महिन्यात स्पर्धा होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत ‘तरुण भारत संवाद’ने व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा असल्याची चर्चा कुस्ती क्षेत्रात सुरू आहे.