सर्किट हाऊसनजीक बर्निंग कारचा थरार
बेळगाव : रस्त्याशेजारी उभी करण्यात आलेल्या कारला आग लागली आहे. शुक्रवारी रात्री सर्किट हाऊससमोर ही घटना घडली असून आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. केवळ सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. अॅड. विनय लोली यांच्या कारला आग लागली. शॉर्टसर्किटने ही घटना घडली असावी, असा संशय आहे. अॅड. विनय हे सर्किट हाऊससमोर कार उभी करून शुक्रवारी रात्री आपल्या एका सहकाऱ्यासमवेत सर्किट हाऊसमध्ये गेले होते. काही क्षणात परत येईपर्यंत त्यांच्या कारने पेट घेतल्याचे दिसून आले. लागलीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. बी. बी. बडीगेर, सी. एस. हिरेमठ, गिरीश यळमल्ले, सोहेल जमादार आदी बंबासह घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचे फवारे मारून जवानांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. मार्केट पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बर्निंग कारच्या या थरारामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम जाणवला.