आठ प्रकारात विभागलेल्या मायेमुळे त्रैलोक्य उत्पन्न होते
भगवंत म्हणाले, आत्मज्ञान मिळवावे असे अनेकांना वाटते पण लक्षावधी लोकांमध्ये एखादा आत्मज्ञानाच्या सिद्धीसाठी यत्न करतो. त्या यत्न करणाऱ्या सिद्ध मनुष्यांमध्ये एखादाच मला खऱ्या अर्थाने जाणतो ह्या अर्थाचा
लक्षावधित एखादा मोक्षार्थ झटतो कधी। झटणाऱ्यात एखादा तत्त्वता जाणतो मज।।3 ।।
हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार, लाखो मनुष्यांमध्ये एखाद्यालाच आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय हे जाणण्याची इच्छा होते व अशी इच्छा करणाऱ्या अनेक लोकांमधील एखाद्यालाच आत्मज्ञान प्राप्त होते. भगवंत पुढे म्हणाले, आत्मज्ञान ही सामान्य गोष्ट नसल्याने ते मिळवणे सोपे नाही हे आत्तापर्यंतच्या माझ्या सांगण्यानुसार तुझ्या लक्षात आले असेलच. त्याचबरोबर ह्याबद्दल काही सांगावं म्हंटलं तर तेही कठीण आहे कारण ज्याला आत्मज्ञान होते तो स्वत:चे अस्तित्व विसरून त्यात विलीन होतो त्यामुळे तो आत्मज्ञानाबद्दलचे स्वत:चे अनुभव सांगायला मागे उरतच नाही. म्हणून तूर्त तुला मी विज्ञानाची, म्हणजे समोर दिसणाऱ्या विश्वाच्या निर्मितीची आणि पसाऱ्याची माहिती सांगतो. त्यासाठी शिव आणि शक्ती ही माझीच दोन रूपे मी तयार केली. शिव आणि शक्ती मिळून विश्वाची निर्मिती करतात. शक्ती म्हणजे माया ही माझीच सावली आहे असे समज.
पुढील श्लोकात मायेबद्दल सविस्तर सांगताना भगवंत म्हणाले, पृथ्वी, पाणी, तेज, वायु, आकाश, मन, बुद्धी व अहंकार अशा आठ प्रकारात माझी माया विभागलेली आहे. हिला अष्टधा प्रकृति असेही म्हणतात.
पृथ्वी आप तसे तेज वायु आकाश पाचवे। मन बुद्धि अहंकार अशी प्रकृति अष्ट-धा ।।4।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, माया आठ प्रकारात विभागलेली आहे. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार हे ते आठ वेगवेगळे भाग आहेत. ही माझी अपरामाया होय. जेव्हा हे आठ विभाग सारख्या प्रमाणात असतात तेव्हा तिला प्रकृतीची साम्यावस्था असते. तिला जीवमाया किंवा परामाया असे म्हणतात. ती निर्जीवाला सजीव करते, सज्ञान करते व मनाला शोक, मोह मानावयास लावते. बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे, ती हिच्यामुळे आहे व तिने अहंकाराने जगत धारण केले आहे. सर्व प्राणीमात्र या जीवमायेपासून निर्माण झाले आहेत असे जाण. सर्व जगाची निर्मिती आणि शेवट माझ्या इच्छेनुसार होतो. जेव्हा जीवमाया निर्जीवाला सजीव करते तेव्हा प्राणीवर्गरूपी नाणी पाडण्याची टांकसाळ सुरु होते. अंडज, स्वेदज, जरायुज, उद्भिज अशा चार प्रकारच्या आकृती त्या टांकसाळीतून आपोआप तयार होऊ लागतात. त्या चारही आकृती सारख्याच किंमतीच्या असतात परंतु त्यांचे आकार मात्र वेगवेगळे असतात. चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे किती आकार त्या टांकसाळीत तयार होतात त्यांची गणती नाही. त्या सर्व प्राणीमात्ररूपी नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. त्यांची गणती प्रकृतीच ठेवते.
क्रमश: