Kolhapur : सत्तेत आलेले तीन पक्ष केवळ ईडीमुळे एकत्र ; आ. सतेज पाटील यांची टीका
गुडाळ येथे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा संपन्न
आवळी बुद्रुक : महाराष्ट्राच्या सत्तेत आलेले तीन पक्ष मनाने एकत्र आलेले नाहीत ते ईडीमुळे एकत्र आलेले आहेत. सध्या सत्तेत आलेल्या या सरकारला शेतकऱ्यांची व सामान्य जनतेची अजिबात काळजी नाही. त्यांची नाळ उद्योगपती व व्यापाऱ्यांशी जुळली आहे. असे प्रतिपादन विधानपरिषदेचे गटनेते व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राधानगरी तालुका राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथे संपन्न झाला. अध्यक्षस्थानी खासदार श्रीमंत शाहु महाराज छत्रपती होते.
सतेज पाटील पुढे म्हणाले, आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीत नेटक्या नियोजनाची चर्चा गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक ए. डी. पाटील, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत पाटील यांनी या मेळाव्याचे नियोजन नेटके केले. याची चर्चा उपस्थितानी केली.
काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक भोगावतीचे संचालक अभिजीत पाटील यांनी केले. यावेळी गुडाळेश्वर पतसंस्थेत दिवाळीच्या एकाच दिवशी एक कोटी पंच्याऐंशी लाखांची ठेव जमा केल्याबद्दल पिग्मी एजंटांचा गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार शाहु महाराज म्हणाले, बंटी पाटलांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान चोरीचा घोळ समोर आला आहे. आता आपण दक्ष राहुन काम करूया.
यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, आर. के. मोरे, राहुल देसाई, सत्यजित जाधव, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, नितीन पाटील यांची भाषणे झाली. मेळाव्यास गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक ए. डी. पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा सुप्रिया साळोखे, युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष वैभव तहसीलदार, तालुका समन्वयक सुशील पाटील कौलवकर, सुधाकर साळोखे, पांडुरंग भांदिगरे, तौफिक मुलानी, मधुकर रामाणे, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष संभाजीराव कांबळे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.