For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हायुद्धाचे संकट : ट्रम्प यांच्यापुढे नवीन संभ्रम

06:41 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
हायुद्धाचे संकट   ट्रम्प यांच्यापुढे नवीन संभ्रम
Advertisement

मोठ्या नेत्यापुढे प्रश्नही मोठे असतात. अमेरिकेचे अध्यक्षपद जगात सर्वात श्रेष्ठ पण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर चालू असलेला संभ्रम मोठा चिंताजनक आहे. इराण सोबतच्या तीव्र युद्धामध्ये लष्करी बळ वाढवून आरपारची लढाई करावयाची की तडजोड करून राजकीय कुटनिती व डावपेचांचा मार्ग स्वीकारावा असा गंभीर धोरणात्मक पेच निर्माण झाला आहे.

Advertisement

अमेरिकेच्या इतिहासातील वादळाचा प्रवाह एवढा जबरदस्त असतो की अध्यक्षाच्या मनात जे असते आणि अमेरिकन जनतेच्या मनात जे लपलेले असते ते प्रत्यक्षात घडतेच असे नाही या सत्त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकिर्दीत आला आहे. पहिल्या महायुद्धापूर्वी अध्यक्षपदावर अरुढ झालेले कायद्याचे प्राध्यापक वुडरोव्ह विल्सन म्हणाले होते की, मला परराष्ट्र धोरणात रस नाही पण जर मला परराष्ट्र धोरणातील गुंतागुंत सोडवावी लागेल तर ते मी माझे दुर्दैव समजेल. पण नेमके तसेच झाले. विल्सन यांना केवळ परराष्ट्र धोरण करावे लागले नाही तर पहिल्या महायुद्धात उडी घेऊन त्यांना मित्र राष्ट्रांना विजय मिळवून द्यावा लागला. तशीच गत डोनाल्ड ट्रम्प यांची झाली आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात ते खरेच आहे. व्हाईट हाउसमध्ये पाऊल ठेवल्यानंतर 21 जानेवारी 2024 रोजी महोदय म्हणाले होते की अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच 8 दिवसाच्या आत दोन्ही युद्ध थांबवीन. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. रशिया-युक्रेन युद्ध गेल्या पाच वर्षांपासून चालू आहे तसेच इराण व इस्रायलमधील संघर्षात खुद्द अमेरिकेला उतरावे लागले आणि 28 फेब्रुवारी 2026 ला सुरू झालेले युद्ध अजूनही थांबलेले नाही. रशियाची लोकसंख्या एक दशांशने कमी झाली. आता तेथे अधिक मुलांना जन्म देणाऱ्या मातांचा सन्मान केला जात आहे.

Advertisement

 शांततेचे मृगजळ दूरच

अखंड रशियाचे पुतीन यांचे स्वप्न साकार झाले नाही तसेच अमेरिकेने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ची घोषणा करून इराणवर युद्ध लादले. खुद्द इस्रायलने सुद्धा ‘रोरिंग लायन’ या नावाने युद्ध मोहिमेची गर्जना केली पण अंतिम निकाल काय लागला हे कळायला मार्ग नाही. पाकिस्तान, कतार, ओमान यांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले. कलमांची तुर्रेबाजी झाली पण प्रत्यक्षात शांतता करार मात्र अमलात आला नाही. आता इराणने आठ कलमी तोडगा दिला आहे पण अमेरिका त्यावर राजी होत नाही. नुकताच युक्रेनने 1000 ड्रोनच्या साह्याने रशियावर मोठा हल्ला केला. हल्ले प्रतिहल्ले चालूच आहेत. दबलेल्या बंडखोरांनी पुन्हा डोके वर काढले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवर ताबा ठेवण्याचा इराण आणि अमेरिकेचा प्रयत्न संघर्षाला तोंड फोडत आहे. आखातामधील अमेरिकन नौदलाच्या तळावर इराण सतत लक्ष करत आहे. त्यामुळे या युद्धात आखाती देशांच्या पायाभूत संरचनेचे मोठे नुकसान होत आहे. उभय पक्षांना युद्ध परवडणारे नाही पण अहंकाराचा भोपळा फोडून माघार कोणी घ्यायची हा खरा प्रश्न आहे.

 बाका पेचप्रसंग

मोठ्या नेत्यापुढे प्रश्नही मोठे असतात. अमेरिकेचे अध्यक्षपद जगात सर्वात श्रेष्ठ पण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर चालू असलेला संभ्रम मोठा चिंताजनक आहे. इराण सोबतच्या तीव्र युद्धामध्ये लष्करी बळ वाढवून आरपारची लढाई करावयाची की तडजोड करून राजकीय कुटनिती व डावपेचांचा मार्ग स्वीकारावा असा गंभीर धोरणात्मक पेच निर्माण झाला आहे.

 युद्ध की तडजोड

रशियन लेखक टॉलस्टॉय यांची एक कादंबरी फार गाजली. तिचे नाव वॉर अँड पीस अर्थात युद्ध आणि शांतता असे होते. ती त्यांनी सहावेळा लिहून काढली होती. आता ट्रम्प यांच्यापुढे ही कादंबरी नव्याने उभी आहे. इराणसोबतचे युद्ध फक्त काही आठवडे चालेल अर्धा विजय तर आम्ही मिळविला आहे. लवकरच पूर्ण विजय मिळवू अशी दर्पोक्ती ट्रम्प महोदय प्रकट करत होते पण त्यांचा अंदाज खोटा ठरला. आता युद्धाला सहा महिने पूर्ण झाली आहेत परंतु विजयाचा तराजू अजूनही अमेरिकेकडे झुकलेला नाही. तेल वाहतुकीत व्यत्यय येत असल्यामुळे सारे जग या युद्धावर नाराज आहे. त्यामुळे जगात पुरवठा साखळी तुटली आणि महागाईचा आगडोंब उसळला. यासाठी सुद्धा लोक अमेरिकेला शिव्या शाप देत आहेत. मग अशावेळी युद्ध किती ताणून धरावे याचे, शिवाय अमेरिकेमध्ये येऊ घातलेली मध्यावधी निवडणूक ही सुद्धा ट्रम्प यांच्यापुढे डोकेदुखी ठरू शकते.

 युद्धाचा मार्ग परवडेल का

सहा महिन्यांपासून अंगलट आलेले आखाती युद्ध आणखी किती दिवस चालू ठेवायचे याबद्दल खुद्द अमेरिकेत टीकाटिप्पणी होत आहे. इराणवरील हल्ले अधिक तीव्र करावेत किंवा आखातात लष्करी बळ वाढवावे. त्यामुळे अमेरिका एका मोठ्या आणि निर्णायक दीर्घकालीन लष्करी संकटात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा अनिर्णित दीर्घकालीन युद्धात अडकल्यामुळे अमेरिकेचा फायदा होण्याऐवजी युद्ध सामग्री, दारूगोळा, तंत्रज्ञान, मनुष्यबळ यांचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा दीर्घकालीन युद्धामध्ये स्पष्ट विजयाची कोणतीही हमी देता येत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे हे लक्षात घेऊन ट्रम्प महोदय आजूबाजूची परिस्थिती चाचपडून पहात आहेत.

 संवाद आणि कूटनीतीचा तोडगा

आता इराण एवढे चतुर झाले आहे की धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशा अवस्थेत आहे. इराणबरोबर तडजोड कोणाच्या मध्यस्थीने करावयाची हा अमेरिकेपुढे प्रश्न आहे. सध्या ओमानच्या मध्यस्थीने होणारा संभाव्य तात्पुरता शांतता करार स्वीकारल्यास तेहरानला म्हणजेच इराणला वेळ मिळेल आणि या काळात तो आपली ताकद अधिक वाढवू शकेल हाही एक धोका आहे. होर्मुझ खाडीवर त्यांचे नियंत्रण प्रस्थापित होऊ शकते हा धोका ट्रम्प यांना त्रस्त करत आहे. त्यामुळे इराणचा प्रभाव पूर्णपणे मोडून काढण्याचा ट्रम्प प्रशासनाचा मूळ उद्देश कोलमडून पडू शकतो. आपल्या मूळ उद्देशाला धक्का बसू नये म्हणून शांतता तडजोड स्वीकारता कामा नये असे ट्रम्प यांना वाटते.

 शांती दूत की युद्ध खोर

भावी इतिहासात आपली प्रतिमा शांतीदूत म्हणून कायम ठेवावयाची की युद्धखोर म्हणून उभी करावयाची या विचित्र संभ्रमावस्थेत ट्रम्प सापडले आहेत. आपल्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये ट्रम्प यांनी सामर्थ्यातून शांतता अर्थात पीस थ्रू स्ट्रेंथ हे सूत्र घेऊन या सिद्धांताच्या आधारे जगात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार अनेक जागतिक वादविवाद उदाहरणार्थ गाझापट्टीतील संघर्ष आणि दक्षिण आशियातील संघर्ष सोडविण्याचे श्रेय ट्रम्प यांनी वारंवार घेतले. असे श्रेय लाटण्याचे अनेक प्रयत्न केल्यानंतरही प्रत्यक्षात लष्करी गुंतागुंतीमुळे त्यांच्या या प्रतिमेला इराणसोबतच्या संघर्षात मोठा धक्का बसला आहे. ते शांतीदूत नसून युद्धखोर संधी साधू आहेत अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस ट्रम्प यांच्या दृष्टीने मोठी परीक्षा पाहणारा आहे किंबहुना ही अग्निपरीक्षा आहे असे म्हटले पाहिजे. कारण युद्ध चालू ठेवले त्यात यश निश्चित काळात मिळाले नाही तरीही प्रतिष्ठा कमी होऊ शकते आणि शांतता स्वीकारली तरीही त्यातून शत्रू बळावण्याची शक्यता अधिक आहे. अशा विचित्र कोंडीत सापडल्यामुळे ट्रम्प यांची गत ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे.

जागतिक आणि देशांतर्गत वादळे

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुहेरी संकटात सापडले आहेत. एक तर जागतिक वातावरण त्यांच्या जकात धोरणामुळे अमेरिकाविरोधी बनले आहे आणि दुसरे म्हणजे देशांतर्गत विरोधी पक्ष सतत जनमत तापवित आहे. येणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला धूळ चारण्याची भाषा करत आहे. त्यामुळे कोणते पाऊल टाकावे याबाबत ट्रम्प सध्या एकदा दूध पडल्यामुळे आता ताकही फुंकून पीत आहेत. संयुक्त राष्ट्र महासभेतील अलीकडच्या उपस्थितीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एकाच वेळी कठोर इशारे दिले आणि दुसरीकडे व्यावसायिक कराराचे प्रस्ताव सुद्धा मांडले. एकीकडे युद्धाच्या धमक्या द्यावयाच्या आणि दुसरीकडे शांततेचे प्रस्ताव पुढे ठेवावयाचे हे ट्रम्प यांचे दुहेरी राजकारण आहे. यातच त्यांच्या संभ्रमाची बीजे सापडतात. आंतरराष्ट्रीय समुदायाची शंकास्पद नजर पाहता या दोन्हींमध्ये समतोल कसा साधावयाचा अशा विचित्र अवस्थेतून ते जात आहेत. ट्रम्प यांची ही तारेवरची कसरत आहे. थोडासा तोल सरकला तर त्यांना अपयशाचे धनी व्हावे लागेल ते त्यांना मुळीच नको आहे.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.